सावधान! कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय

0
24

>> गेल्या २४ तासांत नवे ४७ कोरोनाबाधित; जून महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत ८९ रुग्णांची नोंद

तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत गेला होता; मात्र आता जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून, गेल्या चोवीस तासांत नवीन ४७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात जून महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात ८९ कोरोनाबाधित आढळून आले असून, सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १८५ वर पोहोचली आहे, तर राज्यातील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ५.३७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

देशात साधारणपणे जून महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह अनेक शहरांत बुधवारपासून हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर गोव्यातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. कधी २९, कधी २०, तर कधी १८ या प्रमाणे गेल्या आठवड्यात दरदिवशी रुग्ण सापडले होते. परिणामी २८ मे रोजी १०१ वर असणारी सक्रिय रुग्णसंख्या आता पुन्हा एकदा दोनशेच्याजवळ येऊन ठेपली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत नवीन ८७५ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यात ४७ नमुने बाधित सापडले. चोवीस तासांत आणखी ११ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३७ टक्के एवढे आहे.

राज्यात एप्रिल महिन्यात नवीन १२९ कोरोनाबाधित आढळून आले होते. मे महिन्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ झाली. या महिन्यात नवीन ३७८ बाधित आढळून आले होते. राज्यात मे महिन्याच्या अखेरच्या दिवसात दरदिवशीच्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. राज्यातील सध्याचे स्वॅब तपासणीचे प्रमाण एक हजारांपेक्षा कमी आहे. मे महिन्यात सुमारे १९ हजार स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी इस्पितळात दाखल होणार्‍या बाधितांचे प्रमाण कमी आहे, हीच एक दिलासादायक बाब आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन आरोग्य खात्याने नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कोविड लसीकरणाला गती देण्यात आली आहे. येत्या ५ जून रोजी राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून खास टिका उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिका उत्सवात बूस्टर डोसावर भर दिला जाणार आहे. तसेच, आठवड्यातून तीन दिवस कोविड लस देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.