राज्यात वीज भारनियमन नाहीच : वीजमंत्री

0
16

>> भारनियमन होत असल्यास त्वरित कारवाई करणार

राज्यात वीज भारनियमन (लोडशेडिंग) केले जात नाही. कुठेही भारनियमन केले जात असेल, तर मला वैयक्तिकरीत्या एसएमएसद्वारे माहिती कळवा. आपण त्यावर त्वरित कारवाई करू, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

राज्यात वीज भारनियमनाबाबत काही जणांकडून चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. राज्यात वीज भारनियमन टाळण्यासाठी खुल्या बाजारातून १२० मेगावॅट विजेची खरेदी केली जात असून, वीज खरेदीवर प्रति युनिट ८ ते १२ रुपये खर्च केले जात आहेत, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

वीज खात्याकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेतली जात आहेत. त्यामुळे विविध ठिकाणचा वीजपुरवठा बंद ठेवण्याबाबत आगाऊ माहिती दिली जाते. पावसाळ्यात वीज सामानाची कमतरता भासू नये म्हणून ५ हजार वीज खांब, वीज तारा व इतर साहित्याची खरेदी करण्यात आली आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
केंद्रीय वीज मंत्री राजकुमार सिंग यांच्यासोबत ३ जूनला नवी दिल्ली येथे एक बैठक होणार आहे. या बैठकीत गोव्यातील वीज समस्या व उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.