>> मुख्यमंत्र्यांची माहिती; आयुष इस्पितळाचे दोन महिन्यांत उद्घाटन
केंद्र सरकारच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय या योजनेखाली दक्षिण गोव्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. पेडणे तालुक्यातील आयुष मंत्रालयाच्या इस्पितळाचे येत्या जून-जुलै महिन्यात उद्घाटन केले जाणार आहे, तर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ वर्षाच्या कार्यकाळातील कार्याचा आढावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत घेतला. डबल इंजिन सरकारचा गोव्याला मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून, यापुढेही मिळणार आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी २२ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. झुआरी पुलाच्या एका चौपदरी मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यातील पर्यटन सुविधा, सुपर स्पेशालिटी इस्पितळासाठी सहकार्य मिळाले आहे. संसद ग्राम योजनेखाली उत्तर गोव्यातील सुर्ला गावाचा विकास केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या गेल्या आठ वर्षांत विविध योजनांचा लाभ राज्यातील नागरिकांना मिळवून देण्यात आला आहे. सरकारच्या योजना गरजू नागरिकांपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या सरकारी पातळीवरील योजनांची योग्य पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी भाजपच्या एका सदस्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळ पूर्ततेनिमित्त राज्यातील चाळीस मतदारसंघात गरीब कल्याण मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. तसेच यानिमित्त भाजपतर्फे १५ दिवस सेवा, सुशासन व गरीब कल्याण कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत. त्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देऊन लाभार्थींना योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. केंद्राच्या योजनांची माहिती देणार्या पत्रकांचे वितरण दोन लाख घरात केले जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
आपल्याच मतदारसंघातील लोकांना
नोकर्या देण्याची सवय नाही : मुख्यमंत्री
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नोकर्या १०० टक्के पेडणेकरांनाच दिल्या जात आहेत. साखळीतील लोकांना मोपा विमानतळावर नोकर्या दिल्याच्या आरोपात तथ्य नाही. मला फक्त आपल्याच मतदारसंघातील लोकांना नोकर्या देण्याची सवय नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित प्रश्नावर बोलताना दिले.