– डॉ. सीताकांत घाणेकर
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘तीन गोष्टी फार काळ लपून राहू शकत नाहीत – सूर्य, चंद्र व सत्य.’’
खरेच किती सत्य आहे बुद्धांचे हे मत. पण तरी देखील सामान्य माणूस स्वार्थ, प्रलोभन, भीती, अज्ञान… यामुळे सत्यापासून दूर राहतो. एवढेच नाही तर सज्ञान व्यक्ती ह्याबद्दल ज्ञान असूनसुद्धा असत्याच्या मार्गाने जातात. अनेक वेळा आपण असे का वागलो ह्याचे समर्थन करतात. बहुधा त्यांचा स्वतःचा स्वार्थच इथे जास्त डोकावतो.
या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात येते की काही व्यक्ती आपण करतो तेच सत्य असे समजून प्रतिज्ञा करतात. तद्नंतर केव्हा केव्हा त्या प्रतिज्ञेला अगदी चिकटून राहतात. त्या क्षणी धर्माला अनुसरून सत्य काय आहे ह्याबद्दल ते विचार करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे व इतरांचे फार नुकसान होते. अनेकांना कष्ट व हाल भोगावे लागतात.
अशा घटनांची उदाहरणे अनेक असतील पण एक महापुरुष सहज लक्षात येतात- ते म्हणजे पितामह भीष्म व त्यांची भीष्मप्रतिज्ञा. तरुण युवराज देवव्रत आपले पिता शंतनुमहाराज ह्यांना सत्यवतीकडे लग्न करण्याची इच्छा झाल्याने व तिने घातलेल्या अटीमुळे आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा करतात. त्याचबरोबर आपण गादीवर न बसता गादीचे रक्षण करण्याचे वचन देखील देतात.
नंतरच्या काळात भीष्म आपल्या प्रतिज्ञेचे तंतोतंत पालन करताना दिसतात. त्यामुळे स्वार्थी, दुष्ट व कपटी कौरवांच्या गादीचा सांभाळ करताना त्यांनी सत्य आड केले व आपल्या प्रतिज्ञेपोटी असत्य व अधर्माला आपला पाठिंबा दिला. ह्याचा कळस म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण होताना आपल्या क्षात्रधर्मालाही ते विसरले. एवढेच नव्हे तर आपल्या वृद्धपणाच्या कर्तव्याचे पालनही त्यांनी
केले नाही. एका स्त्रीवर अन्याय होताना त्यांनी अपेक्षित कृती केली नाही.
खरे म्हणजे आपल्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहून त्यांनी सत्याची प्रतारणाच केली असे दिसते.
महाभारताचा अभ्यास करताना हेही लक्षात येईल की परिस्थितीला अनुसरून त्यांच्या प्रतिज्ञेचे सत्य पडताळून पाहिले नाही, त्यामुळे हे सर्व महाभारत घडले. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. अनेक शूरवीर अभिमन्यूसारखे कोवळे राजपुत्र व सैनिक मृत्युमुखी पडले.
ह्या घटनांबद्दल सर्वांनी एकच धडा घ्यायला हवा – आपल्या चुकीच्या निर्णयामुळे संस्कृतीचे, देशाचे नुकसान तर होत नाही ना? इतर कपटी व्यक्ती आपला फायदा तर घेत नाही ना? आपली प्रतिज्ञा मोठी की इतरांचे कल्याण मोठे?
ह्याउलट पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्णाचे चरित्र बघितले तर त्यांनी प्रतिज्ञेला चिकटून राहता देशाचा व संस्कृतीचा विचार करून आपली प्रतिज्ञा मोडली. तसेच दर घटनेप्रमाणे सत्य कुठले ह्यावर चिंतन करून त्याप्रमाणे ते वागले. काही ठिकाणी त्यांचे वागणे अधार्मिक व असत्य वाटते पण त्यावेळी ते आवश्यक होते. तो खरा धर्म होता.
सर्वप्रथम भीष्मासारखीच श्रीकृष्णांनी देखील प्रतिज्ञा केली होती की कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडवांच्या युद्धात ते शस्त्र हाती घेणार नाही. पण त्यानंतर एक घटना घडली – दुर्योधन भीष्म पितामहांना टोचून बोलला की पांडवांवरील त्यांच्या प्रेमामुळे ते त्यांचा वध करीत नाहीत. ते लढतात कौरवांच्या बाजूने पण त्यांना न्याय देत नाहीत. त्यामुळे भीष्मांच्या भावना दुखावतात व ते अर्जुनाकडे सर्वशक्तीनिशी युद्ध करतात. त्याला अगदी नामोहरम करतात. असे वाटत होते की, ते आता अर्जुनाचा वध करतीलच.
त्याक्षणी श्रीकृष्ण आपली प्रतिज्ञा मोडून सुदर्शन घेऊन भीष्मावर चालून जातात. पितामह भीष्म धनुष्य खाली ठेवून श्रीकृष्णाच्या हातून मृत्यू यावा अशी इच्छा व्यक्त करतात. ते म्हणतात- ‘भक्तासाठी वचन आपुले, प्रभू तू मोडियले, धन्य मजसी केले’.
खरें म्हणजे भीष्मांनी देखील प्रतिज्ञा केली होती की ह्या युद्धात श्रीकृष्णाला प्रतिज्ञा मोडायला लावीन. ह्या घटनेमुळे विविध बोध मिळतात. सर्वप्रथम श्रीकृष्णांचा मोठेपणा इथे दिसतो. तो हा की, त्यावेळी अर्जुनाचे जिवंत राहणे अत्यंत आवश्यक होते. त्यांची प्रतिज्ञा गौण होती. कारण अर्जुनाचा वध झाला असता तर पांडव युद्ध हरले असते. त्यामुळे जनमानसात सत्य, धर्म, ईश्वर ह्यावरचा विश्वास उडाला असता. त्यांना वाटले असते की, आम्ही कितीही ‘‘सत्यमेव जयते’’ म्हटले तरी जगात असत्याचा, अधर्माचाच विजय होतो. त्यावेळी भगवंत देखील हस्तक्षेप करीत नाहीत आणि असे घडणे भारतीय संस्कृतीला व स्वतः पूर्णपुरुषोत्तमाला भूषणावह नव्हते.
दुसरी गोष्ट इथे प्रस्थापित होते की, ती म्हणजे सत्याने जाणार्यांचे भगवंत आपले वचन मोडून देखील रक्षण करतात. त्यामुळे सामान्य माणसाला सत्यमार्गाने जाण्याची निश्चित प्रेरणा मिळते.
ह्या भीष्म- अर्जुन युद्धामध्ये आणखी एक विचित्र घटना म्हणजे शिखंडीला रथावर पुढे ठेवून अर्जुनासारख्या महायोध्याने भीष्माकडे युद्ध करणे. खरे म्हणजे शिखंडी म्हणजे शिखंडिनी ही कन्या होती. तसेच पूर्वजन्मीची भीष्माने अपहरण केलेली अंबा होती. त्यावेळी भीष्माचा सूड घेण्याची शपथ घेऊन तिने अग्निप्रवेश केला होता.
इथे देखील फक्त श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन तसे युद्ध करायला तयार झाला होता. ह्या घटनेत श्रीकृष्ण व्यावहारिक सत्य लक्षात ठेवून अर्जुनाला तसा उपदेश करतात. नाहीतर भीष्माचा वध करणे असंभव होते.
श्रीकृष्णाच्या संदर्भात दुसरी घटना द्रोणपर्वात दिसते. भीष्मानंतर द्रोण कौरव सेनापती झाले. त्यांचाही दुर्योधनाने अपमान केला की तुम्ही देखील पक्षपाती आहात. अर्जुनाला तुम्ही मारीत नाहीत. त्यादिवशी द्रोण देखील क्रोधाने अर्जुनावर बाणवर्षा करतात. आता ह्या भीषण युद्धात अर्जुनाचा वध नक्की होणार असेच सर्वांना वाटत होते.
अशावेळी श्रीकृष्ण धूर्तपणाने केव्हाही असत्य न बोलणार्या युधिष्ठिराला खोटे बोलायला लावतात – ‘‘अश्वत्थामा हतायती. नरो वा कुंजरो वा’’. खरे म्हणजे मेला होता अश्वत्थामा नावाचा हत्ती. पण धर्मराज केव्हाही असत्य बोलणार नाहीत ह्याची खात्री असल्यामुळे द्रोणांनी त्यांनाच विचारले होते. कदाचित आपला प्रिय मुलगाच युद्धात मेला असेल म्हणून त्यांना अत्यंत दुःख झाले. त्यांची मनःस्थिती व्यवस्थित नव्हती. त्यामुळे नर वा जनावर हे धर्मराजांनी तोंड वळवून हळू बोललेले त्यांना ऐकू गेले नाही. लगेच धनुष्य खाली ठेवून त्यांनी मृत्यू पत्करला.
तिसरी घटना म्हणजे जांघेखाली गदा मारून भीमाने केलेला दुर्योधनाचा वध. महायुद्धाच्या नियमांप्रमाणे हा अधर्म होता. पण ह्यासाठी देखील श्रीकृष्णाने आधीच आयोजन केले होते. दुर्योधन विवस्त्र अवस्थेत आपले शरीर वज्रासारखे करण्यासाठी गांधारीकडे जाताना श्रीकृष्ण त्याची मस्करी करतात व त्याला कंबरेखालचा भाग झाकून जाण्यास सांगतात. त्यामुळे तोच भाग वज्रासारखा न होता कोमल राहिला म्हणून तिथे गदा मारल्यावर अजिंक्य
दुर्योधनाचा वध करणे भीमाला शक्य झाले.
ह्या घटनेनंतर श्रीकृष्णाचे वडील बंधू बलराम आणि दुर्योधन व भीम ह्यांचे गदायुद्धाचे गुरु श्रीकृष्णाला नियमांविरुद्ध वागल्यामुळे दोष देतात. व जाब विचारतात. त्यावेळी श्रीकृष्ण शांतपणे कौरवांनी केलेल्या अनेक भयानक, अधर्माची जाणीव करून देतात व आपल्या वागण्याचे समर्थन करतात.
इतिहासकार सांगतात, की कौरव-पांडवांच्या युद्धाच्यावेळी बलराम तीर्थयात्रेला गेले होते व त्याचवेळी राज्यात आले होते. घरच्या युद्धाचे वेळी तीर्थयात्रेला जाणे शहाणपणाचे असते का?
ह्या सर्व घटनांवर चिंतन केले की पूर्णावतार श्रीकृष्ण सत्याच्या व धर्माच्या मार्गाने जाणार्यांचे रक्षणदाता आहेत. हे लक्षात येते. हे बघून अशा व्यक्तींना दिलासा मिळतो की जग चालवणारी शक्ती आपल्या बरोबर आहे.
‘‘सत्यमेव जयते’’ हे पटते. सत्याचे महत्त्व वाढते व सत्यवादींना प्रोत्साहन मिळते.