महिला व बालकल्याण खात्याने बडतर्फ केलेल्या ७ अंगणवाडी सेविकांनी येथील आझाद मैदानावर कालपासून आंदोलन सुरू केले आहे. बडतर्फी मागे घेऊन पुन्हा सेवेत सामावून न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी काही महिन्यांपूर्वी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो-पणजी येथील सरकारी बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर महिला व बालकल्याण खात्याने कर्मचार्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र अंगणवाडी कर्मचार्यांच्या आंदोलनासाठी पुढाकार घेतलेल्या सात जणांना बडतर्फ केले होते.
त्यानंतर अन्य अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्या ७ कर्मचार्यांची बडतर्फी मागे घेण्याची विनंती केली होती. तथापि, बडतर्फी मागे घेण्यात न आल्याने अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, सदर सेविकांवर सूड भावनेने कारवाई केली आहे, असा आरोप ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी केला.