Home बातम्या कलेकलेनं विकसित झालेली कलावती…

कलेकलेनं विकसित झालेली कलावती…

0

– प्रा. रमेश सप्रे

‘गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जगातील एक श्रीमंत माणूस होता हेन्‌री फोर्ड. मोटारींचा त्याला सम्राट म्हणायचे. अजूनही त्याचं साम्राज्य आहेच.. तर एकदा त्याची स्वतःची गाडी बंद पडली. टॅक्सीनं जावं लागलं. उतरल्यावर मीटरप्रमाणे पैसे देऊन तो टॅक्सीवाल्याकडून परत मिळावयाच्या पैशांची वाट पाहत थांबला. यावर तो टॅक्सीवाला म्हणाला, ‘आपण श्री. हेन्‌री फोर्ड ना?’ यावर होकार मिळताच तो म्हणाला, ‘‘तुमचा मुलगा कधी टॅक्सीनं गेला तर असा थांबत नाही. ‘उरलेले पैसे तुम्हीच ठेवा(कीप द चेंज)’ असं म्हणून चालायला लागतो.’’ हेन्‌री फोर्ड लगेच म्हणाला, ‘बरोबर आहे कारण त्याचा बाप श्रीमंत आहे. माझा नाही.’ याचा अर्थ समजून सत्यवान मनापासून हसला. म्हणजे त्याला गोष्टीचं तात्पर्य कळलं होतं. शिकवण समजली होती. आता पुढचं सांगायला हरकत नव्हती.

‘तशीच आमची संस्था श्रीमंत असेल, पण शाळा गरीब आहे. तुम्ही मोडलेली बाकं तुमच्या सोयीनं रविवारी (काम नसलेल्या दिवशी) येऊन दुरुस्त केलीत. सामानाचे सर्व पैसे आम्ही दिले. आता तुमची स्वतःची मजुरी इतर सुतारांपेक्षा जरा अधिकच मागत आहात, याची गंमत वाटते. या बोलण्याचा अर्थ न कळल्यानं सत्यवानानं विचारलं, ‘म्हणजे काय?’ ‘अगदी सोपं आहे. आपल्या तीन मुलांच्या शिक्षणाचा व इतरही खर्च जी शाळा करते तिच्यासाठी कृतज्ञता म्हणून थोडं श्रमदानही करायचं नाही? त्या ऋणातून थोडं तरी मुक्त होण्याची इच्छाच नाही? प्रश्‍न पैशाचा नाही आहे. माणूस म्हणून वृत्तीचा (ऍटिट्यूड) आहे.-’

हे बोलणं त्याला कळावं अशी अपेक्षा नव्हती. पण त्याच्याबरोबर त्यादिवशी आलेल्या त्याच्या पत्नीला कळलं असावं. काही बोलली नाही. पण तिचे डोळे पाणावलेले दिसले. काही दिवसांनी तिच्या नवर्‍यानं त्या दिवशीच्या कामाचे घेतलेले पैसे स्वतःच्या कामाच्या पैशातून वाचवून परत करण्यासाठी घेऊन आली. म्हणाली, ‘माझ्या नवर्‍याला माणुसकी म्हणून नाही. फक्त पैसा..पैसा..पैसा! त्यापायीच घरात कायम बेचैनी असते.’ तिची ही कृती पाहून आमचे डोळे पाणावले. ‘प्रश्‍न पैशाचा नाहीये. संस्कारांचा आहे.’ आता समजलं की कलावतीवर इतके सुसंस्कार कुणामुळे झाले. ‘तुम्ही हे पैसे आनंदानं परत न्या. तुमच्या या कृतीला व शिकवणुकीला आमचा सलाम!’

हा प्रसंग प्रत्यक्ष घडलेला असला तरी प्रातिनिधिकसुद्धा आहे. म्हणून एवढ्या विस्तारानं लिहिला. बर्‍याच वेळी पालकांपेक्षा मुलांचं वागणं-बोलणं अधिक सुसंस्कृत असतं. एका पालकानं – आईनं किंवा वडलांनी – संस्कार घडवले तरी त्यात मुलांचं खूप कल्याण असतं. त्यांच्या विकासाला त्याची खूपच मदत होते.

कलावती-गुणवती व महीपाल अशी तीन मुलं होती सत्यवान-सावित्री या जोडप्याला. सत्यवान सुतार होता. सावित्री काही घरी स्वयंपाकाचं व मुलं सांभाळण्याचं काम करायची.

कलावती तिच्या आईसारखी होती. कर्तृत्ववान, स्वाभिमानी नि सेवाभावी. शाळेत आली तेव्हाच ती चिमुरडी सर्वांनाच एका वेगळ्या तेजामुळे आवडली. आवडत राहिली. चपचपीत तेल लावून घातलेल्या दोन वेण्या. त्यांना आकर्षक रीतीनं बांधलेल्या रंगीबेरंगी रिबिनी. पाणीदार डोळे. बोलत होती कमीच पण संथ, शांत, प्रत्येक शब्दावर आवश्यक तो जोर देत. अत्यंत स्पष्ट, इतकं की तिचं बोलणं शब्द न् शब्द शुद्धलेखनासारखं (डिक्टेशन) लिहून घ्यावं. मुख्य म्हणजे ते असायचंही त्याच तोलाचं.

‘नाव काय तुझं?’ ‘कलावती सत्यवान रजपूत.’ हे वाक्य नसलं तरी तिच्या बोलण्यातून व्यक्त झालेला पूर्णविराम (फुलस्टॉप) चमकदार वाटला. ‘बाप रे, रजपूत? म्हणजे तू खूप ऐतिहासिक व्यक्ती आहेस तर!’ ‘म्हणजे?’ या प्रश्‍नावर म्हणालो, ‘म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे!’ कलावतीही कमी नव्हती. लगेच म्हणाली, ‘म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. तुमचं बोलणं आम्हाला काय समजे?’ लक्षात आलं की हे पाणी काही वेगळंच आहे. हे नाणं काही और आहे! स्पष्ट करून सांगितल्यावर म्हणते कशी, ‘‘तसं काही नाही. ‘रजपूत’ फक्त आडनाव आहे. राजस्थानशी आमचा काहीही संबंध नाही. फक्त देवी एकवीरा आहे. पण तिच्याही दर्शनाला कधी गेलो नाही.’’ किती मुद्देसूद व पोक्त पद्धतीनं बोलत होती कलावती! अगदी अपवादानं मुलं अशी वयाच्या मानानं परिपक्व (प्रीमॅच्युअर) असतात. पण अतिशय मार्मिक विचार करतात व बोलतात. अशा मुलांना मानसशास्त्रात ‘प्रिकॉशिअस..वेळेपूर्वी पिकलेली (पिकवलेली नव्हेत.), काहीशी ज्ञानी’ असं म्हणतात. अशा मुलांना सहजतेनं व प्रेमानं, समजून घेऊन वागवलं नाही तर त्यांच्यात वेगवेगळे गंड (कॉंप्लेक्सेस) निर्माण होतात. अहंगंड (सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स) तर होतोच नि वर्तनातल्या समस्या (बिहेवियरल् प्रॉब्लेम्स) निर्माण होतात.

कलावतीला घरच्या परिस्थितीची जाण नि आपल्या आई-वडलांच्या परस्पर विरुद्ध स्वभावाची जाणीव खूप लवकर झाली होती. तिच्या बोलण्याचालण्यातून हे सतत दिसून येई. पाचवीतली छोटी मुलगी असूनही चालायची एका संथ फेरीबोटीसारखी. खळखळत धावणार्‍या लॉंचसारखी नाही. तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेली तिची बहीण मात्र खट्याळ, खोडकर होती.

कलावतीचं हसणंसुद्धा मंदमृदू असे. इतकं की तिला विनोदाचं वावडं(ऍलर्जी) आहे असं वाटावं. आजुबाजूची मुलंच नव्हेत तर शिक्षकही जरा वचकूनच असायचे कारण ती त्यांचीही चूक लगेचच स्पष्टपणे सांगायची. एकदा आली म्हणाली, ‘एक पिरियड संपून दुसरा पिरियड सुरू होऊन दहा मिनिटं झाली तरी अनेक वर्गांत शिक्षक नाहीत. स्टाफरूममध्ये शिक्षक आहेत सारे. हे असं का?’ अनेक मजली शाळा असल्यानं प्रत्येक मजल्यावर शिस्त, स्वच्छता, शांतता राखली जावी म्हणून त्या दिवसात आम्ही एक प्रयोग राबवत होतो. ‘फ्लोअर मॅनेजमेंटचा! मोठ्या हॉटेलमध्ये जसे फ्लोअर मॅनेजर असतात तसे. एक शिक्षक व त्या मजल्यावर असणार्‍या वर्गातला एखादा हुशार, जबाबदार विद्यार्थी हे काम करायचे. कलावती तिच्या मजल्याची व्यवस्था पाहणारी होती. इतर मजल्यासाठीही हीच व्यवस्था होती. पण कलावती सोडून कुणीही आपलं काम गंभीरपणे व पद्धतशीर करत नव्हते. हिच्या वहीत प्रत्येक घटनेची, निरीक्षणाची, निरीक्षणाची तारीख-वेळेसह नोंद असायची.

कलावतीच्या एकूणच बोलण्यात समज असायची. पण वयानं खूप लहान असल्यानं तिला बर्‍याच गोष्टी समजायच्या नाहीत. शाळेतल्याच नव्हे तर घरातल्या व बाहेरच्या देखील. म्हणून तिचे सतत प्रश्‍न असत. नि शेवटी हमखास असायचं- ‘असं का?’ आम्ही गमतीनं तिला ‘असं का-बाई’ असं म्हणायचो. ते ऐकून ती मनातल्या मनात खूष व्हायची. तिला ते आपलं कौतुक वाटायचं. अन् ते कौतुक असायचंही. तिच्या काही ‘असं का?’- प्रश्‍नांचे काही नमुने पाहू या.

‘महीपाल हा माझा भाऊ म्हणून मी त्याच्यावर खूप प्रेम करते. घरातली सर्व मंडळीही त्याचे खूप लाड करतात. हे ठीक आहे. भाऊ म्हणून गोष्ट वेगळी, पण केवळ तो एक मुलगा आहे, आमच्यासारखी मुलगी नाही, म्हणून त्याचं जास्त कौतुक करतात. असं का?’

‘ज्यांच्याकडे गुण असतात त्यांना कमी महत्त्व दिलं जातं. आणि जे वाईट असतात त्यांच्याकडे खूप पैसा, शक्ती(तिला ‘सत्ता’ म्हणायचं असे) असते. असं का?’ ‘देवळात जाते तेव्हा तिथं पैशाचंच वातावरण दिसतं. बाहेर देवीला वाहिलेले हार, दिलेल्या साड्या इ. गोष्टी पुन्हा पुन्हा विकल्या जातात. हा व्यापार आहे. असं का?’ तिला म्हणायचं असायचं की मंदिरात भक्तिभावापेक्षा बाजारभाव का महत्त्वाचे असतात. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव (पावणी) ही कल्पना तिला कुठं तरी खटकत असे. शब्द तिला ती लहान असल्यामुळे सुचत नसत पण तिचे विचार मात्र तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा खूप प्रगल्भ, पुढचे असत.

तिच्या बर्‍याच प्रश्‍नांना उत्तरं नसत. म्हणजे जी असत ती तिला समजावून सांगणं अवघड असे. अशावेळी नेहमी तिला एक प्रसिद्ध गाणं ऐकवायचो, ‘बोरी बाभळी खुशाल जगती, चंदनमाथी कुठार (कुर्‍हाड)|… पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार… उद्धवा अजब तुझे सरकार’ कधी कधी ‘विठ्ठला तू वेडा कुंभार…मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार…देशी डोळे परि निर्मिसी तयापुढे अंधार…’ तिला गाणी आवडायची पण तो उद्धव कोण व वेडा कुंभार कोण हे मात्र कळायचं नाही. अर्थ समजावून, उदाहरणं देऊन सांगितलं की खूण पटल्यासारखं हास्य तिच्या डोळ्यात-चेहर्‍यावर चमके पण क्षणभरच. कलावती लगेच गंभीर व्हायची पुढचा ‘असं का?’ प्रश्‍न विचारण्यासाठी. असो.

‘गरिबी वरदान आहे पण दारिद्—य हा शाप आहे.’ याचं जिवंत उदाहरण म्हणजे कलावती. आर्थिक स्थिती गरिबीची होती. पण दारिद्य्र ही मनाची वृत्ती आहे. ते दारिद्र्‌य, दीनता, लाचारी मात्र तिच्या वर्तनात कधीही दिसली नाही. आत्मसन्मानाला (सेल्फ रिस्पेक्ट), स्वतःच्या वेगळेपणाला(युनिकनेस) ती खूप जपायची. यामुळे ती केवळ वर्गाची प्रमुख (क्लास मॉनिटर) नव्हती तर तिच्या उपजत नेतृत्वाचे अनेक गुण असायचे. तिला आंतरशालेय स्पर्धेसाठी शाळेची प्रतिनिधी किंवा गटप्रमुख पाठवताना एक ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ आम्ही घ्यायचो. अपेक्षेप्रमाणे त्या संस्थेकडून कौतुक वजा तक्रार नि तक्रारीतलं कौतुक तिच्याआधी आमच्याकडे पोचायचं.

कलावती तत्त्वाची खूप पक्की होती. नियमानुसार वागण्याबाबत ती आग्रही असायची. स्पर्धेच्या परीक्षकांना (जजेस्) त्यांच्या परीक्षणातील योग्य चुका तिथंच सांगायची. पण चुका दाखवण्यापूर्वी तुमच्या ज्ञानाबद्दल व तुम्ही दिलेल्या निर्णयाबद्दल (जजमेंट) आपली काहीही तक्रार नाही हे मुद्दाम स्पष्ट करायची. अन् ते योग्यच असायचं. त्या तिघा भावंडांचा गणवेश, वह्या, पुस्तकं इतर शैक्षणिक साहित्य यांचा खर्च शाळेमार्फत होत असे याची पूर्ण जाणीव कलावतीला होती. तिघंही अभ्यासू होती. आज्ञाधारक होती. कलावतीचा प्रभाव इतर दोघांवर होताच. पहिल्या पाच क्रमांकात सर्वजण आपापल्या वर्गात यायची. पण कलावतीची गोष्टच वेगळी होती.

वर्गात गणिताच्या तासाला बँकेच्या व्यवहाराबद्दल शिकवल्यावर ती येऊन विचारते कशी, ‘मला बँकेत अकौंट सुरू करायचा असेल तर काय काय करावं लागेल?’ कौतुक वाटलं तिच्या या चौकशीचं. एक बचत खातं सुरू करूनही दिलं. त्यात ती आपल्याला वरखर्चासाठी म्हणून दिलेल्या पैशातील (पॉकेटमनी) थोडे पैसे साठवू लागली. आम्हीही तिला छोटी छोटी कामं – कामगिरी देऊन त्याचा मोबदला तिच्या खात्यात जमा करू लागलो. पिकनिकसाठी, गणवेशातल्या बुटांसाठी, पुस्तकातल्या शब्दकोश (डिक्शनरी), नकाशासंग्रह (ऍटलस) अशा विशेष गोष्टींसाठी त्या बचतीतून पैसे देण्यासाठी तिचा आग्रह असायचा. आम्ही तिला तिच्या मनासारखं करू द्यायचो. नंतर वेगवेगळ्या मार्गांनी तिच्या खात्यात पैसे जमा करायचो. सुटीत शाळेची स्वच्छता, ग्रंथालयातील पुस्तकांची रचना, त्यांना कव्हर्स इ. कामं ती मन लावून करायची. असो.

कलावतीकडून काही गोष्टी शिकण्यासारख्याच होत्या. सर्वांना! स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा – गणवेश, वह्या, पुस्तकं, एकूणच जीवनासंबंधी. स्वाभिमान, तत्त्वांबद्दल आग्रह, मूल्यांनुसार (व्हॅल्यूज) वर्तन. स्वतःचं महत्त्व राखून इतरांबद्दल आदर व प्रेम. सेवाभाव, स्वार्थत्याग, स्वावलंबन व श्रमदानाची आतून आवड. कर्तव्याविषयी जागरूकता व सर्व नीतिनियमांचं कटाक्षानं पालन.

या गोष्टी आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंसारख्या वाटतील. पण कलावती होतीच तशी आदर्श! आमची एक मोठी असहायता(हेल्पलेसनेस असायची). दहावीनंतर मुलं दहा वाटांनी उडून जायची – पक्ष्यांसारखी. अधूनमधून संपर्क, भेट व्हायची. पण आम्ही विशेष काही त्यांच्यासाठी करू शकायचो नाही.

कलावतीचे वडील गेले. त्या धक्क्यानं आई भ्रमिष्ट झाली. तिला वेडाचे झटके येऊ लागले. पण त्याचे चटके कलावतीनं स्वतः सोसायला सुरुवात केली. आपलं बी.कॉम.चं शिक्षण अर्धवट सोडून भावंडांचं शिक्षण चालू राहण्यासाठी दोन-तीन ठिकाणी छोटी-मोठी कामं करत होती. काही महिन्यांपूर्वी भेटली तेव्हा प्रकृतीनं खंगलेली दिसली पण धैर्यानं खचलेली वाटली नाही. जीवनाच्या, माणसांच्या एकूणच रूपा-स्वरूपाबद्दल शांतपणे काही ‘असं का?’-प्रश्‍न तिनं नकळत विचारले. तिच्यासाठी एखाद्या आर्थिक संस्थेत किंवा आस्थापनांत (फर्ममध्ये) नोकरीही जमवून दिली. आता ती अधून-मधून भेटते. स्वतःचं शिक्षण तिनं पूर्ण करायचं ठरवलंय. ती समोरून येते तेव्हा कलावती असते. विशीतली तरुणी! पण जाते तेव्हा एक समीकरण शिकवून जाते. – आई = ताई + माई + बाई. अन् आई ही प्रत्येक मुलीत जन्मतः असतेच. असं का?