>> अंतरिम आदेश ८ आठवडे लागू राहणार
ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता वाराणसी जिल्हा न्यायालयात होणार आहे, असे आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले. यापुढे जिल्हा न्यायाधीश ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करतील. ज्ञानवापी प्रकरणाची काल सर्वोच्च न्यायालयात तिसर्यांदा सुनावणी झाली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आता जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
सर्वोच्चा न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नमूद केले की, हे प्रकरण आमच्याकडे आहे, पण आधी त्याची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयात झाली पाहिजे. तसेच, अंतरिम आदेश (१७ मे रोजीच्या सुनावणीचे निर्देश) ८ आठवडे लागू राहतील. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. जिल्हा न्यायाधीशांकडे २५ वर्षांचा मोठा अनुभव आहे. या प्रकरणात सर्व पक्षांचे हित सुनिश्चित केले जाईल. आम्ही खटला रद्द करत आहोत, असा विचार कोणी करू नये, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली.