>> मुख्यमंत्र्यांचे आदेश; खाणींतील पाणी उपसा करण्याची सूचना
राज्यातील अनेक खाणींमध्ये साचलेले पाणी पावसाळ्यात धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तातडीने खाण परिसरात पाहणी करून धोका आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला. मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस या संदर्भात बैठका घेऊन आढावा घेतला. दरम्यान, अधिकार्यांनी धोकादायक खाणींच्या पाहणीचे काम सुरू केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी मुख्य सचिव, जलस्रोत खाते, खाण खाते आणि इतर खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला.
या बैठकीत राज्यातील धोकादायक खाणींची पाहणी करून अहवाल तयार करावा. जिथे गरज आहे, तिथे तातडीने पंप आणि जलवाहिनी टाकून खाणींतील पाणी खाली करावे. मातीचा भराव कोसळण्याचा धोका असेल, तिथे आच्छादन व सुरक्षा कवच तयार करावे. देखरेखीसाठी जलस्रोत खात्यातील कर्मचार्यांची नियुक्ती करावे. जिथे पंप नाहीत, ते बसवावेत. तसेच जिथे अजून पंप व अन्य सामुग्री आहे, ती ताब्यात घेऊन तेच वापरावी, याबाबत सूचना देण्यात आल्या.
खाण खाते, जलस्रोत खाते व इतर खात्यांच्या पथकांकडून खाणींना भेटी देण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष करून शिरगाव, मुळगाव, डिचोली, लामगाव, पैरा, साखळी व पाळी भागातील काही खाणी धोकादायक ठरू शकतात, त्याची पाहणी करून सुरक्षात्मक उपाययोजना आखण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी तालुका पातळीवर नियंत्रण कक्ष नियुक्त केले आहेत. तसेच प्रत्येक तालुका व पंचायत पातळीवर केंद्र सुरू करून जिथे गरज भासेल त्या ठिकाणी तात्काळ मदत करण्याचे निर्देश आपण दिलेले आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सर्व खबरदारी घ्या : मुख्यमंत्री
या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ज्या खाणी धोकादायक ठरू शकतात, त्या ठिकाणी पावसापूर्वीच सर्व त्या उपाययोजना आखण्याची सूचना केली आहे. जिथे गरज आहे. तिथे तातडीने पंप बसवावेत, असा आदेश आपण वरिष्ठ अधिकार्यांना दिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी दिला.