‘ती’च्या घराला वडाचा वेढा; घरबांधणीसाठी हवाय आधार

0
31

कुणावर महापूर, कुणावर भूकंप, तर कुणावर अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे बेघर होण्याची वेळ ओढवते; मात्र म्हाऊस-सत्तरी येथील एका कष्टकरी महिलेच्या बाबतीत एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका झाडामुळे तिच्यावर बेघर होण्याची वेळ ओढवली आहे. म्हाऊस येथील संध्या रोहिदास म्हाळशेकर यांच्या घराला वडाच्या झाडाने वेढले असून, त्याच्या पारंब्या आता घरात घुसू लागल्या आहेत. परिणामी हे घर कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, तिला हे घरबांधणीसाठी दानशूर व्यक्तींच्या आधाराची गरज आहे.

म्हाऊस-सत्तरी येथे संध्या म्हाळशेकर यांचे साधे कौलारू घर आहे. या घराजवळ वडाचे एक झाड आहे. हा वड बराच विस्तारला असून, त्याच्या फांद्या त्यांच्या घरावर आल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी वडाच्या झाडाने तिच्या घराला वेढा घालण्यास सुरुवात केली. आता तर या झाडाने संध्या यांचे संपूर्ण घर वेढले आहे. तसेच वडाच्या पारंब्या कौलांमध्ये घुसू लागल्या आहेत. परिणामी तिच्या कुटुंबाला या घरात राहणे कठीण होऊन बसले आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर या कुटुंबाचे अधिकच हाल होतात. कौले फुटलेली असल्याने आणि त्यावर फांद्या व पारंब्या आल्याने त्याची दुरुस्ती देखील करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे धो-धो पावसात पाणी घरात घुसून नुकसान होते.

संध्या म्हाळशेकर यांच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी असून, त्या रोजंदारीवर कामावर जातात. त्यातूनच त्या आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. त्यांच्या कुटुंबात पती आणि तीन मुले असा परिवार आहे. संध्या यांचे पती बेरोजगार आहेत, तसेच त्यांची तिन्ही मुले शिक्षित असूनही अद्याप नोकरी न मिळाल्याने बेरोजगारच आहेत. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने उदरनिर्वाह करावा की घराच्या दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद करावी या विवंचनेत त्या सापडल्या आहेत. संध्या म्हाळशेकर यांचा बेकरीचा व्यवसाय होता; पण तो सुध्दा गेल्या पाच वर्षांपूर्वी बंद पडला. नवीन घर बांधायचे तर पैसा नाही. त्यामुळे त्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या घराची दुरुस्ती न झाल्यास त्यांचे घर कधीही कोसळू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कुटुंबाला त्यांच्या हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे.