दर ६ महिन्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा

0
36

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती; सुकाणू समितीच्या बैठकीत मंत्री आणि भाजप आमदारांना ‘बुस्टर डोस’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून दर सहा महिन्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. भाजपचे गोवा राज्य प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत भाजप सुकाणू समिती, मंत्री आणि आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका भाजप मुख्यालयात काल घेण्यात आल्या, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडेंनी ही माहिती दिली.

राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर गाभा समिती, मंत्री आणि आमदारांची प्रथमच बैठक घेण्यात आली. या बैठकांमध्ये राज्यातील पंचायत निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्यात येणार नसली, तरी भाजपचे कार्यकर्ते पंचायतीवर निवडून आणण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच पंचायत निवडणुकीबाबत रणनीती निश्‍चित करण्यात आली, असे तानावडे यांनी सांगितले.

३० मेपासून सेवा पर्व
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला ३० मे २०२२ रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ३० मे ते १५ जून दरम्यान राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सेवा, सुशासन आणि कल्याण पर्व असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे, असेही तानावडेंनी सांगितले.

मंत्री, आमदारांना प्रशिक्षण
राज्य कार्यकारिणी समितीची बैठक जून महिन्यात घेतली जाणार आहे. ही बैठक पणजीच्या बाहेर घेतली जाणार आहे. राज्य कार्यकारिणीसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे. भाजपचे मंत्री, आमदार यांच्यासाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे. कार्यकर्त्यांची गार्‍हाणी ऐकून घेण्यासाठी महिन्यातून एकदा भाजप प्रदेश कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात उपस्थित राहण्याची सूचना मंत्र्यांना करण्यात आली आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

पंचायत निवडणुकीबाबत चर्चा
भाजपच्या बैठकीमध्ये राज्यातील आगामी पंचायत निवडणूक, लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा निवडून आणण्यावर चर्चा करण्यात आली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पुन्हा एकदा ‘सरकार तुमच्या दारी’
तसेच सरकार तुमच्या दारी या उपक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात केली जाणार आहे. राज्यात रोजगार निर्मितीच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोचविण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच स्वयंपूर्ण गोवा उपक्रमातून कौशल्यविकास, शेती, फलोत्पादन आदींवर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील संस्कृती, बंधुभाव आणि सलोखा कायम राखण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

जनतेला लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन द्या

राज्यातील मंत्र्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन देण्याबरोबरच खात्याच्या वाटचालीचा पथदर्शक दस्तऐवज तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांच्या हितार्थ अंत्योदय तत्त्वावर काम करण्याची सूचना सुकाणू समितीच्या बैठकीत केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्री आणि आमदारांनी व्यक्ती केंद्रित नव्हे, तर लोकहितार्थ कार्य करावे. लोकांशी चांगला स्नेहसंबंध ठेवावा, असा सल्ला भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन करताना काल दिला. भाजपने निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता केली जाणार आहे. नागरिकांसाठी चांगले कार्य केल्यास आमचा विजय निश्‍चित आहे. गैरकारभार केलेला नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही, असेही रवी यांनी सांगितले.