>> राष्ट्रीय हरित लवादाचा दणका
सीआरझेड परवाना नसलेल्या मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनो जहाजांना आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांच्या याचिकेवर आपला आदेश देताना लवादाने कॅसिनोंना हा दणका दिला.
सीआरझेडचा परवाना नसलेल्या तरंगत्या कॅसिनो कंपन्यांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाने भरपाई वसूल करून पर्यावरणाची हानी भरून काढावी, अशी सूचनाही लवादाने केली आहे. त्याचबरोबर मांडवी नदीतील सर्व तरंगत्या कॅसिनो कंपन्यांसाठी घनकचरा विल्हेवाटीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देशही लवादाने दिले आहेत.
‘डेल्टीन कारावेला’ या मांडवीतील कॅसिनोकडे सीआरझेड परवाना नसल्याने सदर कंपनी जोपर्यंत सीआरझेड परवाना आणत नाही तोपर्यंत त्यांना मांडवीतील आपला कॅसिनो बंद ठेवावा लागेल. सदर कंपनीने मांडवी नदीत कॅसिनो सुरू करून पर्यावरणाचे जे नुकसान केलेले आहे त्याची पाहणी करून त्यांच्याकडून भरपाई वसूल करावी, असा आदेशही लवादाने दिला आहे.