>> नगरनियोजन खात्याचा निर्णय; मंत्री राणेंची माहिती
नगरनियोजन खात्याने कळंगुट-कांदोळी, हडफडे-नागवा-पर्रा आणि वास्को हे तीन बाह्यविकास आराखडे निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पणजी, कदंब पठार, म्हापसा, मडगाव आणि फोंडा या पाच बाह्य विकास आराखड्याचा मसुदा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
नव्याने तयार करण्यात आलेल्या बाह्यविकास आराखड्यात आणि बाह्यविकास आराखड्याच्या मसुद्यात विसंगती आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे राणे यांनी सांगितले.
कळंगुट-कांदोळी, हडफडे-नागवा-पर्रा आणि वास्को नियोजन विभागाचा ओडीपी निलंबित करण्यात आल्याने त्यांना प्रादेशिक आराखडा २०२१ लागू होणार आहे. नवीन बाह्यविकास आराखड्यानुसार ज्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांना त्रास दिला जाणार नाही. मात्र, ज्यांनी कामाला सुरुवात केलेली नाही. त्यांनी प्रादेशिक आराखडा २०२१ चे पालन करावे, असे राणे यांनी सांगितले.
या बाह्यविकास आराखड्याचा फेरआढावा घेण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून, सदर समिती सहा महिन्यात अहवाल सादर करणार आहे. पणजी, कदंब पठार, म्हापसा, मडगाव आणि फोंडा येथील बाह्यविकास आराखड्याचा कच्चा मसुदा नव्याने तयार केला जाणार आहे. राज्य सरकार आणि नगर नियोजन मंडळाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या सहकार्यातून नवीन मसुदा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे राणे यांनी सांगितले.