देवळे – रावळे

0
73
  • – मीना समुद्र

कोरोनाच्या महाविळख्यातून सुटका झाल्याने १४, १५, १६, १७ एप्रिलला सुट्टीत घराबाहेर पडून मोकळा श्‍वास घेण्याची गरज सार्‍यांनाच वाटू लागली. कुठे नातेवाईकांच्या भेटीसाठी, तर कुठे पर्यटनस्थळी जाण्यासाठी माणसांची गर्दी वाटू लागली. कुणी आप्तेष्ट, पाहुणे रावळे सुट्टीला येणार असल्याने आमचाही रत्नागिरी गणपतीपुळ्याचा बेत ठरला. लाटांचे हात उंचावत, फेननिल फुले उधळत हसर्‍या चेहर्‍याने निळ्याशार समुद्राने केलेले स्वागत, पाण्यात थांबून मंदिराची येऊन रांगेत राहून देवदर्शन ४०-२५ मिनिटांची ती डोंगर-प्रदक्षिणा आणि प्रसाद असे सगळे यथासांग पार पडल्यावर आणखी एका मोठ्या आकर्षणस्थळाकडे मालगुंडल कवी केशवसुत स्मारकाकडे वळलो.

अत्यंत शिस्तबध्द रीतीने जपलेली त्यांची कविताशिल्पे, जन्मस्थळ (घर), शाळा, वाड्या तिथे लावलेली जुन्या नव्या कवी – कवयित्रींची माहिती ऐकणे आणि कविता, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांचे नाव दिलेले सभागृह हे सारे पाहिले. यापूर्वी ‘गोफ’ या आमच्या कवितांच्या कार्यक्रमाचे स्मरण प्रत्येक क्षणी झाले. इथले पुळ्याचे गणपती मंदिर एक दैवी उर्जा देेते आणि तिथून फक्त २ कि. मी. वरचे हे साहित्यमंदिर साहित्याची प्रेरणा देते. लेखनाचे महत्कार्य करणार्‍या साहित्यिकाची बूज कशी राखावी हेही हे स्मारक शिकवते. सूर्यास्ता समयीचा मालगुंडचा सागरकिनारा म्हणजेही एक भव्य अतिभव्य निसर्गमंदिरच. मंदिरात यावा तसा चैतन्यदायी, शांतीचा अनुभव तिथेही येतोच येतो.
प्रवासातून येताना देवळे-रावळे हा शब्द मनात घुमत होता. डॉ. इरावती कर्वे यांच्या ललितनिबंधांचे पुस्तक नुकतेच वाचले. स्थळाचा हा परिणाम असावा. लहानपणी कृष्णेच्या काठी देवळा – रावळांची दाटी तिच्या घाटावर अनुभवली होती. कृष्णामाई, शिवशंभू, दत्त, मारुतीची अनेक देवळं तिथं घाटावर आहेत. नाशिकला नंतर प्रत्येक देवळापुढे माथा नमवून कपड्यांची गुंडाळी काखेत लपेटून घरी यायचं असा कार्यक्रम असे. आता आणखी काही साधुसंतांची, महात्म्यांची मंदिरेही झाली आहेत. आपला देश डोंगर नद्यांचा, साधुसंतांचा तसेच मंदिरांचा, देवळा-रावळांचाही आहे. ३३ कोटी देव तर आपण मानलेच आहेत. ग्रामीण भागात तर झाडाबुडी एखाद्या धोंड्याला शेंदूर फासून त्याचा देव केलेला आढळतो. एखादी शिळा हळदकुंकू वाहून देवी म्हणून पुजलेली आढळेल. एखादा वाड्यात शिरण्याआधी देवळीत समईच्या उजेडात ‘ताईबाई’ पुजलेली दिसेल. रानावणात शिवपिंडी आढळतील. गणेशाची सोंड असलेल्या शिला श्रीगणेश म्हणून पुजलेल्या आढळतील. कधी झाडाखाली देवळीत एखाद्या तसबिरीची स्थापना करून वर झेंडा फडकलेला दिसेल.

निरनिराळ्या प्रदेशांत, निरनिराळ्या नावांची, निरनिराळ्या रूपात देवाची स्थापना होते. पूजाअर्चा होते आणि जनतेत त्याची चर्चा झाली की भक्तीचा, श्रध्देचा वा अंधश्रध्देचा महापूर लोटतो. माणसांची दाटी होते. उत्सव, समारंभ सुरू होतात. पवित्र, भक्तिभावाने, श्रध्देने हे चालते तिथवर ठीक आहे. तिथे देवाच्या नावाखाली भ्रष्टाचार, अनाचार माजला तर मात्र ‘देऊळ’ चित्रपटातल्याप्रमाणे देव आणि त्याचा निर्माणकर्ता दोघांनाही बुडून नष्ट होण्याची पाळी येते. देऊळ पार उद्ध्वस्त होतेच. देऊळ म्हणजे देवस्थान किंवा देवाची राहण्याची जागा. त्यालाच देवालय, मंदिर, देव्हारा, देवघर, देवळी असे अनेक पर्यायची शब्द आढळतात. त्याचा उपयोग उपासनेसाठी, प्रार्थनेसाठी होतो म्हणून त्याला उपासना मंदिर, प्रार्थनामंदिर, चर्च, मशीद, गुरुद्वारा, बुध्दमंदिर अशाही वेगवेगळ्या, विशिष्ट संज्ञा आहेत.

लहानमोठ्या देवळांना ‘देवळं-रावळं’ म्हणत असतील असं पूर्वी वाटे. हे जोडशब्द आम्ही प्रथम ऐकले ते चातुर्मासाच्या गणपतीच्या प्रारंभीच्याच कहाणीत. ‘निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे-विनायकाची देवळे रावळे असा तो उल्लेख होता. ‘देवळे’ शी यमक जुळणारा म्हणून ‘रावळे’ हा शब्द येत असेल असे पूर्वी वाटे. भाजी-बिजी, भाकरी बिकरी या शब्दांसारखाच तो निरर्थक जोडशब्द असावा अशी कल्पना होती. पण नंतर कळत गेले की देऊळ म्हणजे देवाचे घर आणि राऊळ म्हणजे राजाचे घर. (राव किंवा राऊ या शब्दाचा अर्थ राजा असा आहे)
डॉ. इरावतींनी लेखात नगररचना शास्त्रावरच्या १३ व्या १४ व्या शतकातल्या संस्कृत पुस्तकाचा उल्लेख केला आहे. दिशा ठरवून चौकोन, त्याच्या बाजूचे आठ भाग, आत पुन्हा ६४ चौकोन, एकेकाला एकेका देवतेचे नाव, सर्वात मोठे देऊळ मध्यभागी. नंतर राऊळ म्हणजे राजकुलाची राहण्याची जागा नंतर आपली दुकाने इतर वगैरे लोक असा नगर मंदिर आणि घररचनेचा आराखडा त्यांना त्या पुस्तकात आढळला. सर्वात उंच, सर्वात मोठे देऊळ मध्यभागी. त्याचा उपयोग स्थाननिश्‍चितीसाठी केला जाई. अरूपाला रूप देणारे हे श्रध्दास्थान, आशा – आकांक्षांचे प्रतीक, अनंताची प्राणप्रतिष्ठा पुढे अनंताचे विसर्जन अशा क्रियाप्रक्रिया देवळात चालतात.

आपल्या आर्ततेत जे सत् असते ते देतो तो देव. या देवापाशी आपण आसरा मागतो, अन्यायातून सुटका, निवास, आधार, शांती मागतो. आपल्या यश, सुख, आनंदप्राप्तीसाठी प्रार्थना करतो. संकटातून सोडविण्यासाठी साकडे घालतो. मनासारखे व्हावे म्हणून त्याच्यावर भरवसून कौल मागतो, गगनाला भिडणार्‍या आशा- आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त करतो, नवे संकल्प करतो, त्यांच्या सिध्दीसाठी सहाय्यभूत व्हावे म्हणून सारे मनोभावे एकवटतो. अशा प्रकारे आपल्यापेक्षा सर्वस्वी श्रेष्ठ, सर्वसमर्थ, कल्याणकारक अशा देवाची प्रतीकरूपाने जिथे स्थापना करततो ते देऊळ. चिंताक्लेश विसरून प्रसन्नतेचे वरदान देणारे ते स्थान.

देऊळ हे प्रबोधनाचे, लोकांनी जत्राउत्सवानिमित्त कथाकीर्तन, भजनपुराणाचे,नृत्यगायन, नाटक इत्यादी सकल कलांची उपासना आणि जोपासना करण्याचं ते सर्वांच्या हक्काचे ठिकाण. समाजाला एकत्र आणणारी खूण. तिथे स्वच्छता, पावित्र्य, आचार-विचार पाळण्याचे देवळांचे आपले असे खास नियम आहेत. शुभाशुभाचे संकेत आहेत. स्नानादि शारीरिक स्वच्छतेबरोबर रागद्वेष, क्रोधमोहांचे विसर्जन करून मानसिक पावित्र्यही पाळायचे आहे. खळबळ, चिंता दूर ठेवून देवाठायी चित्त लीन करायचे आहे. देवाचिये द्वारी क्षणभर उभे राहून चारी मुक्ती साधायच्या आहेत. उत्फुल्लता, चैतन्य, ताजेपणा, श्रध्दा, सकारात्मक उर्जा, विश्‍वास यांच्या बळावर शांती मिळवायचे आहे.

देव रक्षणकर्ता, तारणकर्ता, सहाय्यकर्ता आहे. राजा हा लोकनायक आहे. आता लोकप्रतिनिधी आहे. त्यानेही प्रजाहित सहाय्याचे, प्रजारक्षण करायचे. कर्तव्यदक्ष राहून लोककल्याण करायचे. देव आणि राजा हे एक उच्च पातळीवरचे म्हणून त्यांचा मानसन्मान. त्यांच्या पायी विनम्रता. कोरोनाच्या काळात अन्न औषधपाणी आणि सेवासुश्रुषा करणारेही देवच. माणुसकी जपणारे देवच.
‘देवळाविना गावात घर असू नये’ अशी एक तामीळ म्हण मराठीतून लेखात इरावतीबाईंनी उद्धृत केली आहे. मानवी संस्कृतीचे उन्नयन करणारी देवळे रावळे तिथे नसतील तिथे निवास करू नये, हाच त्यांच्या श्रध्दाळू मनाचा संदेश आहे. मंदिरांचा प्रवास घडतो तेव्हा याचा पुरेपूर प्रत्यय येतो.