>> पंतप्रधान साधणार बुधवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद
>> रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे पाहून केंद्र सरकारने कोरोनासंदर्भातील अनेक निर्बंध हटवले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या थोडी वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने राज्यांना या संदर्भात पत्रही लिहिले होते.
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी दुपारी १२ वा. कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत कोरोनासंदर्भातील आढावा घेण्यात येणार असून सर्व राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशात २ हजार ५२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी नुकतेच वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे खबरदारी म्हणून मास्क व अन्य उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केेले होते.
देशात दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तसेच पंजाब सरकारनेदेखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरू करणे, कार्यक्रमांवरील बंधने हटवल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी कोविशील्ड, कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्यांच्या शरीरात तयार होणार्या अँटिबॉडीज सहा महिन्यांनंतर कमी कमी होत जातात. त्यामुळे ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटचा धोका वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यामुळे कोविशील्ड, कोव्हॅक्सिन या लशी घेतलेल्या नागरिकांनी बुस्टर जोस जास्तीत जास्त लवकर घ्यावा असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लशींची चाचणी केली. लस घेण्यास पात्र असलेल्या लोकांना लगेचच बुस्टर डोस देण्यात यावेत, असे त्यांनी यानंतर सांगितले. कोविशील्ड, कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण ६ महिन्यांनंतर कमी होत जाते. त्यामुळे बुस्टर डोसची त्यांना आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागात ओमिक्रॉन जास्त वेगाने पसरत असल्याचे निरीक्षणही यावेळी आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी नोंदवले.
सक्रिय रुग्ण १५ हजार ८७३
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ८७३ इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात १७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे ५ लाख २२ हजार १९३ इतक्या जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २५ लाख १९ हजार ४७९ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
१८७ कोटींहून अधिक लशी
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत १८७ कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लशी देण्यात आल्या आहेत. शनिवारी दिवसभरात देशात १९ लाख १३ हजार २९६ कोरोना लशी देण्यात आल्या आहेत.
बुस्टर डोस घेण्याचे आवाहन
देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढत आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या प्रकारामुळे देशात चौथ्या लाटेची भीती वाढली आहे. दरम्यान, सध्या वापरात असलेल्या बहुतांश लशी ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात पुरेशा प्रभावी नसल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी बुस्टर डोसची गरज असल्याचे म्हटले आहे. बुस्टर डोस घेतला तरच कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून बचाव करता येईल, असे शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे.
बाधितांच्या संख्येत वाढ
देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत २,५९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात १७५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल भारतात कोरोनाचे २,५२७ नवे रुग्ण सापडले आणि ३३ रुग्णांचा मृत्यू झाला.