>> पेडणे पोलिसांची कर्नाटकात कारवाई; संशयितांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
आश्वे, मोरजी, मांद्रे आणि हरमल या भागात घरफोडीसह देशी-विदेशी पर्यटकांकडील मौल्यवान वस्तू चोरी झाल्याच्या तक्रारी मागच्या दोन महिन्यांत पेडणे पोलीस स्थानकात नोंद करण्यात आल्या होत्या. मात्र चोरट्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर या चोरी प्रकरणातील दोघा चोरट्यांना कर्नाटक येथे अटक करण्यासह त्यांच्याकडून २५ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात पेडणे पोलिसांना यश आले. लतीफ खान (वय २८, म्हैसूर, कर्नाटक) आणि के. एस. अजीज (वय ४६, कोडगू, कर्नाटक) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दरम्यान, संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही संशयित चोरटे घरफोडीसह परदेशी पर्यटक आणि भारतीय पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल, टॅब्स, डीएसएलआर कॅमेरा यासारख्या मौल्यवान वस्तूंची चोरी करत होते. या चोरट्यांनी अनेक पर्यटकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पेडणे पोलिसांत या प्रकरणी अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
या संशयित चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पेडणे पोलीस प्रयत्नशील होते; परंतु हे चोरटे वारंवार आपली ठिकाणे बदलत होते. त्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे कठीण होऊन बसले होते. तपासादरम्यान पेडणे पोलिसांना संशयित चोरटे हे केरळ आणि कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कर्नाटक आणि केरळ पोलिसांच्या मदतीने आंतरराज्य कारवाईत अनेक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी लतीफ खान आणि के. एस. अजीज या दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून तब्बल २५ लाखांचा माल जप्त करण्यात आला. आंतरराज्य कारवाईदरम्यान पेडणे पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला, त्यात विविध ब्रँडचे १३ लॅपटॉप, विविध ब्रँडचे १५ मोबाईल फोन, २ टॅब्स, ३ डीएसएलआर कॅमेरे आणि अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. हस्तगत केलेल्या सामानाची आणि ते कुठून चोरी केले याची माहिती संशयितांकडून मिळवण्याचा पेडणे पोलीस करत आहेत.
संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक श्री. सक्सेना आणि पेडणे पोलीस उपधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सुमेधा नाईक, कॉस्टेबल राजेश ए. सी., सागर खोर्जुवेकर, प्रज्योत मयेकर, विशाल नाईक, श्री. परब यांनी ही कारवाई केली.