>> प्रवासी बसखाली चिरडल्या पाच दुचाकी
>> वीज खांबाला धडक; चार महिला जखमी
चालकाला चक्कर आल्यामुळे प्रवासी बसवरील नियंत्रण सुटून काल सायंकाळी बाजार-शिरोडा येथे मोठा अपघात घडला. या घटनेत बसखाली पाच दुचाकी चिरडल्या. तसेच बसची वीजखांबाला धडक बसून तो वीजवाहिन्यांसह रस्त्यावर कोसळण्याचा प्रकार घडला. या घटनेत चार महिला देखील किरकोळ जखमी झाल्या.
याबाबत माहिती अशी की, जीए-०४ टी-४२८९ या क्रमांची प्रवासी बस फोंड्याहून सावर्डेच्या दिशेने जात होती. चालकाला चक्कर आल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच दुचाकींचा चुराडा करीत या बसची वीजखांबाला धडक बसली. त्यात वीजवाहिन्यांसह खांब रस्त्यावर कोसळला. हा अपघात मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडला.
या अपघातात चार महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातावेळी रस्त्यावर अन्य कुणीच उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर लोकांनी प्रसंगावधान राखत बचावकार्यास मदत केली. या घटनेची माहिती फोंडा अग्निशामक दल व पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
असा केला बचाव…
बाजार-शिरोडा येथे मासेविक्री करणार्या महिलांना प्रवासी बस आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला, अन्यथा जीवितहानी झाली असती. तसेच बसने ज्या पाच दुचाकींना धडक दिली होती, त्यापैकी एका चालकाने दुचाकीवरून उडी घेत तो बाजूला झाला; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, असे उपस्थितांनी सांगितले.