गोवा डेअरीचे दूध ४ रुपयांनी महागणार

0
40

>> दरवाढीच्या प्रस्तावाला सरकारकडून मान्यता; नवे दर लवकरच लागू

गोवा राज्य दूध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) प्रति लीटर ४ रुपये दूध दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल दिली. दरम्यान, नवी दूध दरवाढ कधीपासून लागू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ती आठवडाभरात गोवा डेअरीकडून लागू होण्याची शक्यता आहे.

दूध उत्पादनातील वाढलेला खर्चाच्या पार्श्‍वभूमीवर दुधाच्या दरात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वाढीव ४ रुपयांपैकी २ रुपये थेट दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिले जाणार आहे, तर २ रुपये गोवा डेअरीला वाढीव खर्चाच्या वापरासाठी मिळणार आहेत, असे सहकार मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय मंडळाने प्रति लीटर ४ रुपये दूध दरवाढीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. या प्रस्तावावर सर्व अंगांनी विचार विनिमय करून मान्यता देण्यात आली आहे. दूध उत्पादनातील वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पशुखाद्य व इतर वस्तूंच्या दरात वाढ झालेली आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक समस्येमध्ये सापडून दूध उत्पादन बंद करू नये म्हणून दूध दरवाढीला मान्यता देण्यात आली आहे. वाढविलेल्या ४ रुपयांपैकी २ रुपये गोवा डेअरीच्या वाहतूक खर्च, दूध खरेदी आणि व्यवस्थापनासाठी वापरले जाणार आहेत, असेही मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.