- – गजानन यशवंत देसाई
धालो गीतांचे पुस्तक तयार करायचे मी सूतोवाच करताच माझ्यापेक्षा प्रेमाआईचा उत्साह दांडगा झाला. धालोगीते, झमाडे, फुगडी, झिनोळे, जात्यावरील ओव्या, हळदी समारंभाच्या वेळी म्हणायची गीते… हे सर्व लोकवाङ्मय तिच्या ओठावर होतं.
जीवनात शिकण्यासारखं खूप काही आहे. कुणाकडून काय-काय शिकावं हे ज्याचं त्यानं ठरवावं. शिकण्यातूनच माणूस जगत जातो. शेवटी जगणं महत्त्वाचं! कसं जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं.
मला ज्यावेळी कसं जगावं, असा प्रश्न पडतो, त्यावेळी आठवतात कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी- ‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा…’ अवघी चार उदाहरणे! पण संपूर्ण जीवन जगण्याचे सार कवितेत दडलेले.
प्रेमावती आईने ही कविता वाचली आहे की नाही हे मला माहीत नाही. बहुतेक करून वाचलेलीच नसावी. पण ती ही कविता प्रत्यक्ष जगली आहे, हे मात्र नक्की!
ती माझ्या आईची मैत्रीण. दोघी भेटल्या की एकमेकींना घट्ट मिठी मारायच्या, मग त्या कुठेही भेटोत! भर बाजारात चारचौघांत अशाप्रकारे भेटण्यात त्यांना अजिबात गैर वाटत नाही. लहान असताना मी बरोबर असलो की मला थोडं अवघडल्यासारखं व्हायचं. त्यांच्यापेक्षा मलाच संकोच अधिक वाटायचा. काय चारचौघांत मिठ्या मारायच्या त्या… मैत्रिणी असल्या म्हणून काय झाले? कालांतराने जसं माझं वय वाढत गेलं तसं संकोचाची जागा कौतुकानं घेतली.
शिगमोत्सवात गडेउत्सवाच्या रात्री आईची मैत्रीण आईला शोधत यायची आणि ‘भयणी गे माजे…!’ म्हणत तिथेसुद्धा गळाभेट घ्यायची. आणि मग इकडच्या-तिकडच्या चार गोष्टी. शिगम्यात गडेउत्सवात त्या रात्री आई कुठल्या मंदिरात भेटेल हे तिला पक्के ठाऊक असायचे.
धालो उत्सवाच्या वेळी तर काय सांगायचे? मेणकुरे गावातील देवाच्या विहिरीभोवताली भरणार्या ‘मालिनी’ पुनवेला आल्यानंतर लगेच आठवड्याभरात सुरू होणार्या धालो उत्सवाला येण्याचा तिचा आग्रह कमालीचा असायचा. धालो खेळण्याचा तिचा उत्साह अमाप. धालांच्या मांडवात म्हटल्या जाणार्या फुगड्या, झंम्पा, ओव्या, झिनोळ्या व धालोगीतं यांत आईची ही बालमैत्रीण सर्वांच्या पुढे!
रंगाने सावळ्या असलेल्या आईच्या या मैत्रिणीचे नाव सौ. प्रेमा नामदेव महाले-उगवेकर. नऊवारी साडी नेसलेली, मजबूत बांध्याची, बायकांमध्ये थोडीशी उंच असलेली, कपाळावर ठसठशीत चार आण्याएवढं कुंकू लावणारी आणि चारचौघांत उठून दिसणारी ही माझ्या आईची बालमैत्रीण होती. माझ्या आईचं माहेर मेणकुरे गावातलं आणि सासर साळ गावात. प्रेमा आईचं माहेर साळ गावात अन् सासर मेणकुरेत, अगदी आमच्या मामाच्या शेजारी! माझ्या आईचे आजोळ साळ गावात, त्यामुळे आईची आणि तिची दोस्ती एकदम बालपणातली.
माझं प्रेमा आईबद्दलचं निरीक्षण फक्त एवढंच होतं.
ज्या वेळेस मी ‘धालो, स्त्रीमनाची अभिव्यक्ती’ हे पुस्तक लिहिण्याचे ठरविले, तेव्हा माझी आई मला पहिल्यांदा घेऊन गेली ती प्रेमाआईकडे. ‘पेमला तुका सगळी गाणी व्यवस्थित सांगतलां’ हा आईचा प्रेमाआईवर असलेला विश्वास होता आणि तो सार्थ होता.
धालो गीतांचे संग्रहित पुस्तक तयार करायचे मी सूतोवाच करताच माझ्यापेक्षा प्रेमाआईचा उत्साह दांडगा झाला होता. उत्साहाच्या भरात कुठून सुरुवात करायची? काय काय सांगायचं? कुठली गाणी म्हणायची ही तिची लगबग पाहण्यासारखी होती. धालोगीते, झमाडे, फुगडी, झिनोळे, जात्यावरील ओव्या, हळदी समारंभाच्या वेळी म्हणायची गीते… हे सर्व लोकवाङ्मय तिच्या ओठावर होतं.
प्रेमा ही पूर्वाश्रमीची प्रेमा आत्माराम राऊत. मधलावाडा, साळा येथील. मेणकुरे येथील श्री. नामदेव महाले-उगवेकर हे भारतीय सैन्यदलात होते. सैन्यदलात म्हटल्यावर मिलिटरी खाक्या आला. बेळगाव इन्फंट्रीमधून त्यांनी देशसेवा बजावली आहे. गोवा मुक्तिलढ्यात भारतीय सैन्यदलाद्वारे त्यांनी आपली सेवा बजावली आहे. १९-१२-२०२२ गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. या नामदेव महाले-उगवेकर यांच्याशी लग्न होऊन प्रेमा नामदेव महाले-उगवेकर बनली.
१९७१-७२ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले त्यावेळी श्री. नामदेव उगवेकर प्रत्यक्ष युद्धात सहभागी झाले होते. त्यामुळे गावात चर्चा सुरू झालेली. आता नामदेव परत कसला येतोय? पण प्रेमाआईचा पक्का विश्वास की तिचा नवरा परत येणारच. ती अजिबात डगमगली नाही. युद्धाच्या बातम्या समजण्याचे फक्त रेडिओ हे एकमेव माध्यम होते आणि वाड्यावर फक्त एकच रेडिओ आणि तोसुद्धा शेजारच्या घरात. वाड्यावरील लोकं वीरगती प्राप्त झालेल्यांमध्ये नामदेवचं नाव येतंय का? म्हणून ऐकायची. तर प्रेमाआईचा दृढ विश्वास होता की आपलं कुंकू खूप बळकट आहे. आणि झालंही तसंच… युद्ध संपल्यावर नामदेव सुखरूप परत आले!
कलाकार जन्माला यावा लागतो. पुस्तकामधून तयार होत नाही. इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रेमाआईने गावातील हौशी नाटकांतसुद्धा अभिनय केलेला आहे.
शिगम्यात साळ गावात गडेउत्सव असतो. रात्री उत्सव सुरू झाला की होळीच्या बाजूलाच एका पायावर उभे राहून गावातील काही लोक ‘नमन’ म्हणत असतात. ‘नमन’ म्हणजे गडेउत्सवात भाग घेतलेल्या गड्यांना दिलेले ते सूचनावजा मार्गदर्शन असते. लक्षपूर्वक ऐकले, तर या गोष्टीचे आकलन होत जाते.
‘आज गडे आरंभीले कुणीकडे गेले’ म्हणत रात्री बरोबर १२.०० वाजता सुरू होणारे हे नमन सकाळी ४.०० वाजता संपते. गोमंतकातील बहुतेक करून सर्व देवांना सर्वांच्या सुरक्षेसाठी साकडे घातले जाते. प्रेमाआईला हे सर्व तोंडपाठ!
लोकवाङ्मयाची प्रचंड आवड असलेल्या प्रेमाआईने कविता लिहिण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित कवयित्री म्हणून नावही मिळवलं असतं. वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर आजही दररोज वर्तमानपत्रे वाचल्याशिवाय तिला चैन पडत नसते.
अशी अमाप उत्साह असलेली माणसे सर्वांनाच आवडतात. धालोंच्या मांडवात उत्साहाने वावरणारी प्रेमाआई पाचही रात्री मांडव जागवत असते. मागे एकदा तिला सहज विचारलं होतं, ‘आज तुम्ही धालोंचा हा उत्सव उत्साहाने साजरा करीत आहात, पण तुमच्या नंतरची पिढी करील का?’ ‘कित्याक करचीना? वर्षातून पाच रात्री जागरण करूक जाता काय? माजी सून करतली. सुनेक सांगान दवरलंय, माज्या फाटल्यान परंपरा तू चलवक जाई!’
धालोगीतांच्या संग्रहाचे पुस्तक तयार करण्यापूर्वी मला वाटायचं, काय ही धालोगीतं… कितीशी असतील? एखादे छोटेसे पुस्तक तयार होईल. एखाद्या आरती संग्रहाएवढे. पण संग्रह करत असताना माझ्या लक्षात आलं की हे लोकवाङ्मय खूप मोठा ठेवा आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सुपूर्द करत असताना त्या-त्या वेळेला आपापल्या प्रतिभेने त्यावेळच्या सामाजिक जीवनातील बर्याच गोष्टी त्यावेळेच्या भगिनी आणि माता त्या लोकगीतांमध्ये समाविष्ट करीत गेल्या. प्रेमाआईसारख्या अगणित असतील ज्या समाजापासून अलिप्त होऊन जगलेल्या आहेत!
गडेउत्सवात येणार्या लोकांचा कल चमत्कार आणि मशाल बघण्याकडे जास्त असतो. नमनाच्या रूपाने उपलब्ध असलेल्या लोकवाङ्मयाच्या पूर्वसंचिताचा अनमोल ठेवा जपून ठेवण्याचे कार्य काही मूठभरच माणसं करत आलेली आहेत.
‘आबोल्यांचा आबोला माझा कशाने झडपलां गे… कशाने झडपलां गे…वारा जां सुटला वत जा लागला, पडलां भूमीवरी गे… पडलां भूमीवरी गे… हातान् उखल्ला माथ्यान् खोयलां, भोगीला अहेव पण गे, भोगीला अहेवपण गे…’ अशा वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या विषयांवरील धालोगीतं मी ज्यावेळी ऐकतो, तेव्हा मला अनेक प्रश्न पडतात ज्यांची उत्तरे मिळतातच असे नाही. त्यातला एक प्रश्न म्हणजे, लोकगीतं ओठावर असलेल्या भगिनी लोकगीतं ऐकूनच जीवनाच्या वाटेवर चालल्या की त्यांचं जगणंच हे लोकगीतांचा स्त्रोत बनलं? काहीही असेल, पण सांस्कृतिकदृष्ट्या मात्र त्या नवीन पिढ्यांना सुजलाम्-सुफलाम् करून गेल्या.
देवकीला दिवस जातात आणि डोहाळे लागतात, त्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म होतो. हे झिनोळ्यांतून ऐकताना खरोखरच मन हेलावून जातं. त्या काळात आपले अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम लेखन थोडेच होते? आपणच आपल्या व्यथा गीतांच्या सूत्रांत गुंतून त्यांना समाजापुढे सादर करण्याचे अतुलनीय कार्य पूर्वीच्या स्त्रियांनी लोकवाङ्मयाद्वारे केले आहे, आणि हा ठेवा पुढे नेण्याचे कार्य प्रेमाआईसारख्या आजच्या माता करत आहेत. हा ठेवा पुढे नेण्याचा वसा जर आजच्या तरुण भगिनींनी घेतला नाही तर त्यांची पुढची पिढी त्यांना कधीही माफ करणार नाही.
धालो उत्सवाची आठवण झाली की मला प्रेमाआईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ‘फातोडीच्या पारा राया सूर्या माझ्या ध्यानी गे… कपाळाच्या कुंकवासाठी तुळशी घाली पाणी गे… माथ्यातल्या फुलांसाठी तुळशी खाली पाणी गे… हातातल्या चुड्यासाठी तुळशी खाली पाणी गे…. गळ्यातल्या मणयासाठी तुळशी घाली पाणी गे….’ हे धालोगीत ज्यावेळी मी प्रेमाआईच्या मुखातून ऐकतो त्यावेळी धालोच्या माध्यमातून ती स्वतःच्याच भावना व्यक्त करतेय की काय असा भास मला क्षणभर झाल्याशिवाय राहत नाही. आज श्री. नामदेव म्हणजेच प्रेमाआईच्या पतीने वयाची ऐंशी वर्षे तरी पार केलेली आहेत. वयानुरूप स्मृतिभ्रंश झालेल्या नवर्याला सांभाळणे म्हणजे दिव्य असते. पण धालोंच्या मांडावर वरील गीत म्हणणारी प्रेमाआई हे दिव्यही व्यवस्थित पार पाडत आलेली आहे.
शेवटी जीवन म्हणजे काय आहे? तर नियतीने लिहिलेला एक ग्रंथ, ज्याचं एकेक पान आपोआप उलगडत जात असतं. जीवनाची ही पाने उलगडत असताना कधीतरी मागची पाने चाळत जावीत, जेणेकरून जीवन जगण्याचं माधुर्य वाढत जाईल. आपल्या जीवनात कुठेतरी स्पर्शून गेलेली प्रेमाआईसारखी माणसं, ज्यामुळे जीवन सुंदर असल्याचा निदान भास तरी होईल!
परवा कविमित्र विनय बापटने सुंदर चारोळी लिहून पाठवली.
शिशिरातील पानगळीसारखे दिवस झडून जातात…
लवलवणारे कोंब आठवणींचे फक्त शिल्लक राहतात…
घडलं काय? हे बघण्यापेक्षा शिल्लक फुलणं बघावं…
फुलावं भरभरून आनंदाने अन् वसंत होऊन जगावं…
मी ज्यावेळी संग्रही असलेले लोकवाङ्मय सवडीने वाचतो, त्यावेळी भर ग्रिष्मातसुद्धा मला वसंत बहार आल्याचा भास होतो…