निवडणूक कायद्याचा भंग करणारे काही एसएमएस सध्या वितरित केले जात असल्याचे निवडणूक आयोगाला आढळून आल्यावर भ्रमणध्वनिवरून पाठविण्यात येणार्या एसएमएसवर निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचार थांबवण्यात आल्यानंतर मतदानाच्या ४८ तास अगोदर राजकीय स्वरूपाचे एसएमएस पाठविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
पोलिसांनी एका विशेष भ्रमणध्वनी क्रमांक ठेवावा व आक्षेपार्ह एसएमएस समजा कुणाला आला तर तो एका विशिष्ट क्रमांकावर मूळ पाठविणार्याच्या क्रमांकासहीत त्यावर पाठवता येईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. अशा एसएमएसवर व तो पाठविणार्यांवर पोलिसांनी निवडणूक कायदा व भा.दं.सं.च्या संबंधित कायद्यांनुसार कारवाई करावी, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय एखाद्या उमेदवाराबाबत मोठ्या प्रमाणावर एसएमएस पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले तर अशा एसएमएसच्या सरासरीनुसार संबंधित उमेदवाराच्या खर्चाला जोडण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.
वेळ्ळी कारवाईत आयोग नाही
दरम्यान, वेळ्ळी येथील चर्चमध्ये जाऊन केलेल्या पोलीस कारवाईत निवडणूक आयोगाचा संबंध नसून पोलिसांनीच ही कारवाई स्वतंत्रपणे केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आयोगाने या प्रकाराची दखल घेतल्याचेही आयोगाने म्हटले आहे.