मोदींचे यशापयश

0
116

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आज तीन वर्षे पूर्ण करीत आहे. आजवरच्या सरकारांपेक्षा हे सरकार वेगळे आहे अशा तर्‍हेचे वातावरण निर्माण करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे यात शंका नाही, परंतु खरोखरच जे ‘अच्छे दिन’ आणण्याचा वायदा करीत हे सरकार सत्तेवर आले ते आले आहेत का, या प्रश्नाचे उत्तर ज्याच्या – त्याच्या धारणेनुसार अनेक परींनी मिळू शकते. एका गोष्टीबद्दल मोदी सरकारला श्रेय द्यावेच लागेल ते म्हणजे हे सरकार आजवरचे सर्वाधिक जनताभिमुख सरकार आहे. सोशल मीडियाचा व डिजिटल तंत्रज्ञानाचा, रेडिओसारख्या प्रसारमाध्यमाचा त्यासाठी केला गेलेला वापर प्रभावी ठरला आहे. अर्थात, भारत हा खेड्यापाड्यांत राहणारा देश आहे आणि येथील सर्वसामान्य जनता फेसबुक आणि ट्वीटरच्या क्रांतीपासून कोसों योजने दूर आहे हेही विसरता येणार नाही, पण तरीदेखील सरकार आणि जनता यामध्ये दुहेरी संवाद साधण्याचा जो काही प्रयास मोदींनी केला आहे तो अनोखा आहे. मोदी सरकारची सर्वांत मोठी कामगिरी कोणती असेल तर ती म्हणजे त्यांनी उजळवलेली भारताची जागतिक प्रतिमा. गेल्या तीन वर्षांत ५४ विदेश दौर्‍यांमधून यूएसएपासून यूएईपर्यंत आणि मंगोलियापासून मालदीवपर्यंत त्यांनी जग पिंजून काढले आणि भारताचा एक नवा प्रगतीशील चेहरा जगापुढे ठेवला. कधी नव्हे एवढ्या आक्रमक रूपातील ही विदेश नीती प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरली, तिने किती थेट विदेशी गुंतवणूक आणली, किती निर्यात वाढवली, भारताच्या संरक्षणसज्जतेस ती किती साह्यकारी ठरली, अन्य देशांशी तिने कसे सांस्कृतिक आणि मैत्रिपूर्ण अनुबंध जोडले याची आकडेवारी त्याचे यशापयश सांगून जाते. परंतु पाकिस्तान, चीन, रशिया यासारख्या देशांशी दाखवली गेलेली जवळीक मैत्रीमध्ये मात्र रूपांतरित होऊ शकलेली नाही. चीन आणि रशिया आजही पाकिस्तानच्याच गळाभेटी घेत आहेत. विस्तारवादी चीनच्या वन बेल्ट वन रोड म्हणजे ‘ओबोर’ महायोजनेतून केवळ भारत अलग पडलेला आहे. रशियाकडून भारताचा कल अमेरिकेकडे वाढण्यास काही वर्षांपूर्वीच सुरूवात झाली होती, परंतु मोदी आणि ओबामा यांच्या कार्यकाळात हे संबंध अधिक दृढ झाल्यासारखे भासत होते, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या राजवटीनंतरचे दोन्ही देशांचे संबंध अद्याप काळाच्या कसोटीवर उतरायचे आहेत, परंतु एवढे असूनही मोदींनी सत्तेवर आल्यापासून अन्य देशांशी संबंध सुधारण्याचे केलेले व्यापक प्रयत्न प्रामाणिक होते यात शंका नाही. नेबरहूड फर्स्ट असो, नरसिंहरावांच्या ‘लूक ईस्ट’ चे ‘ऍक्ट ईस्ट’ मध्ये केलेले रुपांतर असो अथवा सर्व खंडांतील संचाराद्वारे बळकट केलेले मैत्रिबंध असोत, भारताविषयीची पूर्वीची नकारात्मक प्रतिमा पुसून टाकण्यात मोदी सफल ठरले आहेत. केवळ विविध देशांशीच नव्हे, तर तेथील जनतेशी थेट संवाद साधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्नही अनोखा होता. मोदी सरकारचे सर्वांत मोठे यश कोणते असेल तर गेली तीन वर्षे दिलेले भ्रष्टाचारविरहित प्रशासन. मागील यूपीए राजवटीतील घोटाळ्यांच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर त्याचे महत्त्व अधिक ठसते. नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईकसारखे धाडसी निर्णय या सरकारने घेतले. तीन वर्षांत दीडशे नव्या योजना लागू केल्या. सगळ्याच क्षेत्रांत यश मिळाले असे नव्हे. उत्पादनक्षेत्रातील मंदी, रोजगारनिर्मितीतील अपयश, काश्मीरमधील बिघडती परिस्थिती ह्या या सरकारच्या त्रुटी आहेत आणि त्यावर मात करायची आहे. परंतु एवढे असूनही सरकारप्रती एक सकारात्मक वातावरण देशामध्ये दिसते आहे. हे काही तरी करू इच्छिणारे सरकार आहे अशी ही प्रतिमा आहे. फक्त ‘टीम मोदी’ने या प्रतिमेचे कैदी होण्यात धन्यता मानू नये अशी अपेक्षा आहे. अजून खूप काम करायचे आहे. स्वतःवरच खूष होण्याची ही वेळ नक्कीच नाही!