तरुण नेतेच विजयश्री खेचून आणतील

0
23

>> पी. चिदंबरम; समितीसह नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे कार्यभार सोपवला

कॉंग्रेसने गोव्यात आता पक्षाची धुरा नव्या पिढीतील तरुण नेत्यांकडे सोपवली असून, हेच तरुण नेते आता येत्या काळात पक्षासाठी विजयश्री खेचून आणतील, असा विश्‍वास काल कॉंग्रेस पक्षाचे नेते पी. चिंदबरम यांनी व्यक्त केला. पक्षाने काल नवा प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या नेतृत्त्वाखालील नव्या प्रदेश समितीकडे कार्यभार सोपविण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तरुणांकडे जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे. लवकरच पंचायत निवडणूका येणार असून, पक्षाने खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागावे, असा सल्लाही चिदंबरम यांनी दिला. पंडित जवाहरलाल नेहरू हे केवळ २९ वर्षांचे असताना इलाहाबादचे महापौर बनले होते. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनले होते. तेव्हा पं. नेहरूंचे वय हे केवळ ४० वर्षे एवढे होते, असे चिदंबरम यांनी सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील ६७ टक्के लोकांनी भाजपविरोधात मतदान केले होते. या लोकांना बदल हवा होता; मात्र सत्ताधारी भाजपच्या विरोधात कित्येक पक्षांनी निवडणूक लढवल्याने मतांची विभागणी झाली व त्याचा फायदा भाजपला मिळाल्याचे चिदंबरम यांनी सांगिते. ४० मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघात तर भाजपचा पराभव होता होता अवघ्या काही मतांच्या फरकाने टळला, याकडेही चिदंबरम यांनी लक्ष वेधले. आता पुढील काळात भाजपविरोधात नव्या जोमाने लढा देण्यासाठी कॉंग्रेला तरुण अशा नेत्यांची गरज असून, युवक-युवतींना पक्षाकडे आकृष्ट करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत, अशी सूचनाही चिदंबरम यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष गिरीश चाडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार नवे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे सोपवला.
यावेळी अमित पाटकर यांचे भाषणे झाले. आपण राजकारणात नवा असलो, तरी नव्या जोमाने पक्षासाठी काम करणार आहे. कॉंग्रेस पक्षाची विचारसरणी घेऊन लोकांकडे जाण्याचे काम आपण हाती घेणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी कॉंग्रसचे सर्व आमदार व्यासपीठावर हजर होते.