नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेल्या सपशेल अपयशामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पाचही राज्यातील पक्षाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला.
त्यात पंजाबचेही राज्य कॉंग्रेसला गमवावे लागले. सोनिया गांधी यांनी या राज्यात पक्षाची पुनर्रचना सुलभ करण्यासाठी हे राजीनामे देण्यास सांगितले आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. पाचही राज्यांच्या विधासभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागला होता, त्यानंतर आज म्हणजेच अवघ्या पाच दिवसांमध्ये सोनिया गांधींनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत.
चोडणकर यांचा राजीनामा
गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाला विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची नैतीक जबाबदारी स्वीकारून काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. अपयशाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देणार असल्याचे आपण यापूर्वीच स्पष्ट केले होते, असे काल चोडणकर म्हणाले. पक्ष जो निर्णय घेईल तो आपणाला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा व एल्विन गोम्स आदी नेते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे.