विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी भाजप निरीक्षक आज गोव्यात

0
20

भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अनुक्रमे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर (केंद्रीय कृषिमंत्री) व सहनिरीक्षक एल. मुलगन (मस्त्योद्योग व पशुसंवर्धन मंत्री) यांचे आज बुधवारी राज्यात आगमन होण्याची शक्यता असल्याचे काल काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

काल गोवा विधानसभेत नवनिर्वाचित ३९ आमदारांचे शपथग्रहण झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. केंद्रीय निरीक्षक गोव्यात आल्यानंतर विनाविलंब भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

आम्ही सगळे एकसंघ ः राणे
राज्यातील सर्व भाजप नेते एकसंघ असून नेतपदासाठी कोणतीही स्पर्धा नसल्याचे काल विश्‍वजित राणे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा असून आमदारांमध्ये वेगवेगळे गट निर्माण झाले असल्याचे वृत्त हे निराधार असल्याचे राणे म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत दिल्लीला
राज्यात नवे सरकार लवकरच सत्तेवर येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रीय नेत्यांची भेट घेण्यासाठी काल नवी दिल्लीकडे प्रयाण केले.

३९ आमदारांचे शपथग्रहण
आठव्या गोवा विधानसभेच्या काल झालेल्या एक दिवसीय अधिवेशनात ३९ नवनिर्वाचित आमदारांचे शपथग्रहण झाले. विधानसभेचे हंगामी सभापती गणेश गावकर यांनी ह्या आमदारांना शपथ दिली. गणेश गावकर यांना सोमवारी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांनी शपथ दिली होती. १७ आमदारांनी इंग्रजीतून, १५ आमदारांनी कोकणीतून तर ७ आमदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.

इंग्रजीतून शपथ घेतलेल्यांत मगोचे जीत आरोलकर, भाजपचे प्रवीण आर्लेकर, नीळकंठ हळर्णकर, जोशुआ डिसोझा, बाबुश मोन्सेर्रात, जेनिफर मोन्सेर्रात, दिव्या राणे, विश्‍वजित राणे, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, माविन गुदिन्हो व नीलेश काब्राल, कॉंग्रेसचे आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, कार्लुस फेरेरा, तसे आपचे आमदार अपक्ष आमदार आंतानियो वाझ, क्रुझ सिल्वा यांचा समावेश होता.

कॉंग्रेसच्या डिलायला लोबो, केदार नाईक, रूडाल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, दिगंबर कामत, युरी आलेमाव व एल्टन डिकॉस्टा, भाजपचे डॉ. प्रमोद सावंत, कृष्णा साळकर, रोहन खंवटे तसेच आम आदमी पक्षाचे व्हेन्झी व्हिऐगस, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर व अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कोकणीतून शपथ घेतली. अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, भाजपचे प्रेमेंद्र शेट, गोविंद गावडे, उल्हास तुयेकर, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर व मगोचे सुदिन ढवळीकर या सात आमदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.

विधानसभेत दोन आमदार दुचाकीवरून

दोघा नवनिर्वाचित आमदारांनी काल विधानसभा परिसरात येण्यासाठी दुचाकीचा वापर केला. रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर हे काल आपल्या पक्षाचे प्रमुख मनोज परब यांच्याबरोबर त्यांच्या बुलेटवरून तर कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ हे कुठ्ठाळीहून आपल्या दुचाकीने विधानसभा परिसरात आले.