>> दिनेश गुंडू राव यांच्याकडून विश्वास व्यक्त
मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज हे खरे ठरण्याची शक्यता ही कमी व धुसरच असते. मतदानोत्तर चाचण्यांतून वेगळा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काल व्यक्त केला.
पक्षाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वत: प्रत्येक मतदारसंघात झालेले मतदान, तसेच तेथे कॉंग्रेसला किती मते मिळतील, याचा योग्य तो अभ्यास केलेला आहे. त्यानुसार या निवडणुकीत आम्हालाच स्पष्ट बहुमत मिळेल, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असेही राव म्हणाले.
मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर आम्ही निवडणूकपूर्व युती केलेली असून, कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीला बहुमत मिळेल आणि आम्हाला सरकार स्थापन करता येईल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला.
‘ती’ चूक पुन्हा
करणार नाही : राव
संपूर्ण मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती आले की आम्ही आमच्या विधिमंडळ नेत्याची निवड करणार आहोत. हे काम पूर्ण होताच आम्ही राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठीचा दावा करणार आहोत. २०१७ साली आमच्याकडून जी चूक झाली होती, त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही, असे दिनेश गुंडू राव म्हणाले.