कृतज्ञतेचा भाव महत्त्वाचा

0
25
  • (योगसाधना – ५४१योगमार्ग – राजयोग अंतरंग योग – १२६)
  • – डॉ. सीताकांत घाणेकर

आपल्या भारतीय संस्कृतीत जे रीतीरिवाज रोजच्या जीवनात अगदी सहजपणे पाळले जातात, पूर्ण वर्षभर जी विविध व्रतवैकल्ये आपण करतो, जे सण आपण साजरे करतो त्यामागे उच्च असे गूढ तत्त्वज्ञान आहेच. पण मुख्य आहे तो म्हणजे कृतज्ञतेचा भाव!

सकाळी उठल्याबरोबर श्लोक म्हणून धरतीमातेला आपण प्रेमपूर्वक नमस्कार करतो – हे त्याचेच द्योतक आहे. विविध ठिकाणी हात लावून नमस्कार करण्याची सुंदर पद्धत भारतात आहे. खरेच ती हृदयगम्य आहे.
उदा. * वडीलधार्‍यांची कुठेही भेट झाली तर विवाहानंतर वाकून, पायांना हात लावून नमस्कार करणे.

  • कुठल्याही मंचावर पाय ठेवताना मंचाला हात लावून नमस्कार करणे – मग तो मंच नाटकाचा असो, कसल्याही स्पर्धेचा असो. अर्थात तो नमस्कार नाट्यदेवतेला, सरस्वती मातेला, गुरुजनांना , परीक्षकांना असतो. पण मुख्य मुद्दा म्हणजे त्या कृतीमागील तत्त्वज्ञान व भाव.
    काहीही कारणांमुळे म्हणा- आजचा मानव स्वतःला पृथ्वीचा मालक मानतो. तिला भोगाचे साधन मानतो. तिच्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित करतो. तो पृथ्वीचा मुलगा शोभत नाही.

प्रथेप्रमाणे कर्मकांडात्मक भूमीपूजन केले जाते. मुख्यत्वेकरून घर, बंगला, फॅक्टरी, हॉटेल, मंदिर… पण त्यामागे श्रेष्ठ भाव असतो का? प्रत्येक मानवाला माहीत आहे की आपण प्रती पृथ्वी तयार करू शकत नाही. उपलब्ध आहे त्याच धरतीचा उपयोग त्याला पिढ्यान्‌पिढ्या वर्षानुवर्षे करायचा आहे. हे अगदी सत्य आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की त्या उपयोगामागील भाव.
मानवाने स्वतःच्या स्वार्थापोटी पृथ्वीतील सर्व रस जबरदस्तीने खेचून काढले आहेत, काढतो आहे- जसे जल, तेल… पण त्यांचा उपयोग तो सांभाळून आदरपूर्वक करीत नाही. सर्व प्रकारचे मौल्यवान खनिजंसुद्धा खोदून काढली जातात.

पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्रात असे अनेक राजे होऊन गेले की त्यांनी स्वार्थ व अहंकारामुळे लढाया केल्या. शेवटी या धरतीमातेचा, तिच्या संपत्तीचा छोटासा भागसुद्धा ते सोबत घेऊन गेले नाहीत. हे सत्य माहीत असूनही ते मूर्खपणाने वागले. आजही वागताहेत.

काहींना जीवनाच्या शेवटच्या वेळी त्याबद्दल थोडी जाणीव झाली पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता. विश्‍वाच्या इतिहासात कितीतरी उदाहरणे या संदर्भात आहेत. त्यातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे – ग्रीक राजा सिकंदर (तथाकथित अलेक्झांडर – द ग्रेट). भारताला जिंकून त्याच्यावर राज्य करण्याची त्याला फार इच्छा होती. म्हणून तो फार मोठे सैन्य घेऊन भारतावर चाल करून आला. काही राजांनी शरणागती पत्करली. तर काहींनी देशप्रेमापोटी वीर मरण पत्करले. पण तरीसुद्धा त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तो परत मायदेशी निघाला. वाटेत तो फार आजारी पडला. मृत्यू अगदी समीप होता. परत आपल्या घरी पोचण्याची आशाच त्याला नव्हती.

अशावेळी त्याने आपल्या सैन्याच्या जनरलला बोलावून सांगितले, ‘‘मी आता जिवंत घरी पोचणेच शक्य नाही. तेव्हा माझ्यासाठी एक शवपेटी बनवा आणि माझे दोन्हीही हात बाहेर काढून ठेवा म्हणजे सर्व लोकांना कळेल की जगज्जेता सिकंदर परत जाताना रिकाम्या हातांनीच गेला.
खरेच, ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. पण त्यात जीवनाचे सत्य आहे. आपल्यातील कितीजण या घटनेपासून बोध घेतात?
अर्थात स्मशानात गेल्यावर तात्पुरते स्मशानवैराग्य येते पण आपण लगेच ते विसरतो. सत्य हेच आहे की प्रत्येक आत्मा आपल्यासोबत आपले कर्मच घेऊन जातो.
पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात भोजाची छान गोष्ट सांगतात-

  • राज्याच्या लालसेने अंध झालेला मुंज स्वतःच्या पुतण्याला, राज्याच्या खर्‍या वारसाला, भोजाला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी बालक भोज त्याला यथार्थ उपदेश करतो…
    ‘मांधाता स महीपति कृतयुगेऽलंकार भूतो गतः |
    सेतुर्येन महोदधौ विरचितः क्वासौ दशास्यन्तकः|
    अन्ये चापि युधिष्ठिरप्रभृतयः यातादिवं भूपते |
    नैकेनापि समं गता वसुमती मुञ्ज त्वया यास्यति ॥
  • सत्ययुगात अलंकाररूपी बनलेला महीपति मांधाता निघून गेला.
    समुद्रावर सेतू बांधून रावणाला मारणारा राम कोठे आहे?
    दुसरेही धर्मराज युधिष्ठिरासारखे मोठमोठे राजे स्वर्गवासी झाले पण कोणाबरोबरही ही पृथ्वी गेली नाही. परंतु हे मुंजकाका, मला असे वाटते की पृथ्वी तुमच्यासोबत अवश्य येईल.
    (कारण तिच्यासाठी तुम्ही माझ्यासारख्या निर्दोष बालकाला मारायला तयार होत आहात.)
    यापुढे शास्त्रीजी एक अत्यंत मौल्यवान मुद्दा पुढे आणतात. ते पुराणातील वर्णन कथन करतात.
  • शेष नागाने पृथ्वीला स्वतःच्या मस्तकावर धारण केले आहे. एकदा शेष नागाला विचारण्यात आले – तुला या धरतीचे, तिच्यावर असलेल्या पर्वतांचे किंवा वृक्षवनस्पतींचे ओझे वाटत नाही?
    शेषनागाने खूपच मार्मिक उत्तर दिले…
    ‘ न भूमिपर्वतानां न च मे भारो वनस्पते |
    विष्णुभक्तिर्विहीनस्य तस्य भारो सदा मम॥
  • विष्णुपत्नी पृथ्वी विष्णुभक्ती न करणार्‍या मानवावर का खुश होते?
  • कृतज्ञतेने भूमीपूजन किंवा भावाने विष्णुभक्ती न करणारा माणूस पृथ्वीवर भाररूप बनून फिरतो.

शास्त्रीजी त्याच्यासाठी म्हणतात –
‘ ते मृत्युलोके भूमिभारभूता मनुष्यरूपेण मृगश्चरन्ति’
खरेच, सर्व सूज्ञ लोक या विषयावर अभ्यास- चिंतन करून आपल्या स्वतःच्या आचरणात आणून सामान्यांसाठी उदाहरण बनू शकतील का?
शास्त्रकार म्हणतात – * तत्र सा गन्धवती पृथ्वी

  • पृथ्वीला वेगळा सुवास आहे.
    भगवान श्रीकृष्णदेखील म्हणतात –
  • पृथ्वीमध्ये असलेला मधुर सुवास माझी विभूती आहे.
    पू. पांडुरंगशास्त्रींनी या संदर्भात सखोल चिंतन केले आहे. ते काय म्हणतात बघुया…
  • खलील जिब्रानने म्हटले आहे – ‘‘धरतीच्या हृदयात कविता स्फुरली व तिने अवकाशात वृक्ष-लता उभ्या केल्या. आपण मात्र त्यांना पाडून सपाट मैदान तयार केले. आपली शून्यता कोरून ठेवण्यासाठी.
  • सद्गुणांच्या सुवासाने आपल्या जीवनातील फुलबाग दरवळून उठली पाहिजे. पृथ्वीचे गुण आपल्यात यावेत, आपले जीवनही सुगंधित बनावे अशा अभिलाषेबरोबर पृथ्वीला भाववंदना करायची आणि निवेदन करायचे –
    ‘‘हे पृथ्वीमाते! माझ्या पायांचा स्पर्श तुला होतो. त्यासाठी मला क्षमा कर. तुझ्या लाडक्या मुलांचा स्पर्श तर तुला आनंददायक वाटतो.’’
  • धन्यास्तदङ्गरजसा मलिनी भवन्ति|
    संतांच्या चरणस्पर्शामुळे तू स्वतःला पवित्र मानतेस. ‘वसुंधरा पुण्यवती च येन|’
    परंतु मी असा महापुरुष नाही. माझा पदस्पर्श तुला त्रासदायक होत असेल तरीही – हे आई! – ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति|’
    अशा विश्‍वासामुळेच तुझ्याजवळ क्षमा मागण्याची हिम्मत करतो.
    ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ – अशा रीतीने तू क्षमा करण्यास योग्य आहेस. मीसुद्धा वीर बनण्याचा प्रयत्न करीन याची खात्री देतो.
    शास्त्रीजी या विषयाचे योग्य रीतीने समापन करतात…
  • भूमिपूजनाच्या मागे कृतज्ञतेचे प्रकटीकरण
  • भावजीवनाची स्थापना
  • सुगंधी जीवनाचे सतत चिंतन
  • क्षमायाचनेचा भाव
    आपले योगसाधक आपल्या मातेचे गुण पालन करून जीवन सुगंधित बनवतील याची खात्री आहे. (संदर्भ ः संस्कृती पूजन- भूमीपूजन- पू. पांडुरंगशास्त्री आठवले)