>> १८ वर्षांवरील ९९.९३ टक्के लोकांनी घेतले दोन्ही डोस; डॉ. बोरकर यांची माहिती
१०० टक्के कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती राज्य लसीकरण मोहिमेचे प्रमुख अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल दिली. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील लोकांची टक्केवारी ही सध्याच्या घडीला ९९.९३ टक्के एवढी आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.
राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली त्याला एक वर्ष व एक महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेल्या १८ वर्षांवरील लोकांना राज्यात विक्रमी वेळात लस देण्यात आलेली आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांची टक्केवारी तब्बल ९९.९३ टक्के एवढी आहे, असेही डॉ. बोरकर म्हणाले.
राज्यात १५ ते १८ वर्षे या वयोगटातील लसीचा एक डोस घेतलेल्या मुलांची टक्केवारी ही ८७ टक्के एवढी आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्या मुलांची टक्केवारी ६७ टक्के एवढी आहे, असे डॉ. बोरकर म्हणाले. तसेच लसीकरणाला आणखी गती देता यावी, यासाठी आता बुधवार दि. १६ फेब्रुवारीपासून राज्यातील नियमित लसीकरण केंद्रांबरोबरच राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांतूनही लसीकरण केले जाणार आहे, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजारांच्या खाली
राज्यात काही महिन्यांपूर्वी आलेली कोविडची तिसरी लाट आता हळूहळू ओसरू लागल्याचे संकेत मिळू लागले असून, गेल्या २४ तासांत राज्यात केवळ ८५ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली आली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत २०१२ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील केवळ ८५ नमुने बाधित सापडले. नव्या रुग्णांपैकी केवळ ५ जणांना इस्पितळांत दाखल केले आहे. तसेच गेल्या २४ तासांत तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परिणामी बळींची एकूण संख्या ३७७७ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांत ४६९ रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णसंख्या आता १७५४ पर्यंत खाली आली आहे.
राज्याने कोविड-१९ लसीच्या पहिल्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट यापूर्वीच गाठले आहे. १ वर्ष आणि ३० दिवसांची लसीकरण मोहीम पूर्ण केल्यानंतर गोवा ९९.९३ टक्केवारीसह कोविड-१९ लसीच्या दुसर्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याच्या अगदी जवळ आहे. १८ वर्षांवरील लोकांना एवढ्या मोठ्या संख्येने कोविडचे दोन्ही डोस दिलेले गोवा हे देशातील पहिल्या तीन राज्यांपैकी एक आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.