कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्तेची दिवास्वप्ने पाहू नयेत

0
16

>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा टोला

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिवसाढवळ्या सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. कॉंग्रेसचे नेते दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांना हल्ली वायफळ बडबड करण्याची सवय लागली आहे. राज्यात चांगले मतदान झाले म्हणजे ते भाजपा विरुद्ध झाले, असा जावईशोध त्यांनी लावला आहे. येत्या १० मार्च रोजी निकाल लागल्यानंतर कौन जीता कौन हारा, हे कळेलच, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे.
विधानसभेसाठी विक्रमी मतदान झाल्याने लोकांनी कॉंग्रेसला मतदान केले असून, भाजपा एकेरी संख्याही गाठणार नाही, असे ट्विट गिरीश चोडणकर यांनी काल केले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानावडे यांनी हल्ला चढवला.

राज्यात नुकतेच मतदान झाले असून, मतमोजणीस अजून महिनाभराचा कालावधी आहे. मात्र सत्तेच्या खुर्चीची हाव कॉंग्रेसला आत्तापासूनच लागली आहे. लोकांनी कोणाच्या पारड्यात आपले दान टाकले आहे, याची प्रतीक्षा करण्याचीही त्यांची तयारी नाही. अर्थात, आमचा पक्ष जिंकेल हे म्हणण्याचा त्यांचा अधिकार आहे; पण भाजपला एकेरी संख्याही गाठता येणार नाही वगैरे असल्या भंपक गोष्टी त्यांनी बोलू नयेत. कॉंग्रेसचा भ्रष्टाचार लोकांनी पहिला आहे. त्यामुळे पुढील सत्ता कॉंग्रेसची येईल, अशी दिवास्वप्ने पाहणे त्यांनी सोडून द्यावे, असा सल्ला देखील तानावडे यांनी दिला.

या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल, यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे निकाल लागेपर्यंत कॉंग्रेसच्या दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांनी हव्या तेवढ्या शाब्दिक गमजा माराव्यात. सदानंद शेट तानावडे,
प्रदेशाध्यक्ष, भाजप.