- – डॉ. सीताकांत घाणेकर
ज्याच्या जीवनात गुरुत्व असते तोच दुसर्याच्या आकर्षणाचे कारण बनू शकतो. गुरुत्व गुणांनी येते. माता धरतीने स्वतःचे धैर्य- क्षमा- सहनशीलता- नम्रता… इत्यादी गुणांनी हे गुरुत्व प्राप्त केलेले आहे. म्हणूनच ती मनुष्यमात्राच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिली आहे.
भारत एक महान देश आहे. या राष्ट्राला देवभूमी, पुण्यभूमी मानतात. इथे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात जे ज्ञान संपादन केलं आणि ‘कृण्वन्तो विश्वं आर्यम्’ असे मानून हजारों वर्षांपासून सर्व जगभर या ज्ञानाचा प्रचार- प्रसार केला आणि आताही होत आहे हे बघून सर्व जग भारताला जगद्गुरू मानताहेत, ही गोष्ट आम्हा प्रत्येक भारतीयासाठी भूषणावह आहे. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात –
- दुर्लभं जन्म भारते!
अनेक ऋषींनी या पवित्र भूमीत वेळोवेळी तप केले. ज्ञान मिळवले. थोर जंगलात असलेल्या आश्रमातून विद्या दान समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना आवड व योग्यतेप्रमाणे केले. कारण एक तत्त्व पक्के होते… - न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते |
भारतीय तत्त्ववेत्त्यांनी पंचमहाभूतांना ‘देव’ मानले. पृथ्वी, जल (आप), वायू, तेज (अग्नी), आकाश. कारण देवाबद्दल अगदी साधी, सरळ… सर्वसामान्यांना समजणारी व्याख्या म्हणजे – * जो देतो तो देव.
म्हणून अनेकांना देवस्वरूप मानले. * मातृदेवो भव, * पितृदेवो भव, - आचार्यदेवो भव, * वैद्यो नारायणो हरिः
तसेच आपले महान संत – त्यांची तर पंढरपूरला पालखीच उचलतात. विठ्ठल- पांडुरंगाबरोबर त्यांच्या नामाचा गजर केला जातो. - निवृत्ती – ज्ञानदेव – सोपान – मुक्ताबाई – एकनाथ – नामदेव – तुकाराम
याशिवाय प्रत्येक वर्णातली अनेक जण आहेत - सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार…
- मिराबाई, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, सखुबाई, शारदादेवी, अक्का महादेवी, गंगासती…
ही नावे वाचावीत आणि त्यांच्या जीवनाचा थोडादेखील अभ्यास केला की लगेच लक्षात येते – या सर्व व्यक्ती महान आहेत. देवासमानच आहेत. त्यांच्या आयुष्यात कितीतरी महान संकटे आलीत. त्यांच्यावर भयानक असे अत्याचार झालेत. पण त्यांची भगवंतावर एवढी श्रद्धा होती की त्यांनी अगदी हसत- खेळत या सगळ्या घटनांचा सामना केला. त्यामुळेच हे सर्व देवत्वाला पोचले. हा विषयच अत्यंत हृदयगम्य आहे.
खरे म्हणजे आजच्या कराल कलियुगात आमच्यातील प्रत्येक व्यक्तीकरता अत्यंत मार्गदर्शक आहे. आपल्यातील बहुतेकजण प्रखर भाव व आत्मशक्ती नसल्याने आपल्या जीवनातील छोट्या छोट्या समस्यांमुळे दुःखी होतात. भयभीत होतात. तसे पाहिले तर या सर्व संतांना आलेल्या समस्या फारच प्रखर होत्या. पण त्यांच्या विशिष्ट मानसिकतेमुळे ते त्यांना सामोरे गेले व महान ठरले.
योगसाधनेचा हाच हेतू आहे- भारतीय संस्कृतीची ओळख व या ज्ञानाचा जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी तसेच जीवन विकासाप्रीत्यर्थ संपूर्ण उपयोग!
पंचमहाभूतांचा विषय निघालाच आहे तेव्हा त्यातील पहिल्याच घटकावर आपण संपूर्ण ज्ञान मिळवू या.
- भूमी – जिला अनेक नावे आहेत जसे पृथ्वी, धरती, सर्वसहा (सर्व सहन करणारी), वसुंधरा, धरणीमाता (मातेसारखे सर्वांचे प्रेमाने पोषण करणारी…)
भारतात सकाळी उठल्याबरोबर हाताचे दर्शन घेऊन एक ज्ञानपूर्ण – भावपूर्ण श्लोक म्हणायचा असतो… - कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती |
करमूले तू गोविन्दः, प्रभाते करदर्शनम् ॥ - हाताच्या अग्रभागावर – बोटांवर लक्ष्मीचा वास असतो. मध्यभागावर सरस्वती राहते आणि हाताच्या मूळभागावर गोविंदाचे वास्तव्य आहे म्हणून सकाळी हातांचे दर्शन घ्यावे. असे दर्शन घेण्यामागे फार मोठे तत्त्वज्ञान आहे.
१. सकाळीच देवाचे शुभदर्शन होते.
२. हातावर एवढ्या प्रमुख देवतांचे वास्तव्य असले तर आपले हात पवित्र झाले. मग या हातांनी आम्ही वाईट कार्य करणारच कसे?
३. अत्यंत शक्तिमान तीन दैवी शक्ती आपल्या प्रत्येक कार्यात सहभागी आहेत. त्यामुळे सत्कर्म करताना व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.
तद्नंतर दुसरा श्लोक म्हणजे…
२. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले |
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व में॥
- समुद्ररूपी वस्त्रे परिधान केलेल्या, पर्वतरूपी स्तन असलेल्या आणि भगवान विष्णूची पत्नी अशा हे पृथ्वीदेवी! तुला मी नमस्कार करतो. माझ्या पायाचा तुला स्पर्श होतो त्याबद्दल क्षमा कर.
या श्लोकांतदेखील भाव व ज्ञान पुष्कळ प्रमाणात आहे. पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात सांगतात – ‘‘पृथ्वी ही सर्व प्राणिमात्रांची माता आहे. जड, चेतन सर्वच पदार्थांना ही आपल्या प्रेमळ मांडीवर स्थान देते. प्रेमाने भरलेले स्वतःकडील पीयूष पाजून आई वसुंधरा सर्व जगाला पोसते. जगत्जननी वसुंधरेच्या प्रेमाचे असे अजब आकर्षण आहे की गगनात विहार करायला गेलेला मानव शेवटी पुन्हा पृथ्वीच्या प्रेमळ अंगावरच स्थान प्राप्त करून विसाव्याचा अनुभव घेतो. आई वसुंधरेच्या या आकर्षणालाच वैज्ञानिकांनी गुरुत्वाकर्षण असे सुंदर नाव दिले आहे. ज्याच्या जीवनात गुरुत्व असते तोच दुसर्याच्या आकर्षणाचे कारण बनू शकतो. गुरुत्व गुणांनी येते. माता धरतीने स्वतःचे धैर्य- क्षमा- सहनशीलता- नम्रता… इत्यादी गुणांनी हे गुरुत्व प्राप्त केलेले आहे. म्हणूनच ती मनुष्यमात्राच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिली आहे.’’
वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार आम्हाला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे माहीत होते. पण शास्त्रीजींनी याच शक्तीला एक भावपूर्ण आध्यात्मिक पैलू प्रदान केलेला आहे त्यामुळे या अत्यंत प्रचलित शब्दाचा एक नवाच अर्थ डोळ्यासमोर येतो.
लहान मूल आपल्या आईच्या अंगाखांद्यावर खेळते. मातासुद्धा अत्यंत प्रेमाने आपल्या लाडक्या मुलाचे सर्व वजन झेलते. अगदी तसेच आपण वयस्कर माणसेसुद्धा या धरतीमातेच्या अंगावर चालतो, नाचतो, बागडतो, धावतो, उड्या मारतो. एकदम सहज आणि नैसर्गिक व्यवस्थेप्रमाणे हे आवश्यकही आहे.
पण आपण त्यापुढे जाऊन पृथ्वीवर विविध अत्याचार करतो. ज्यांपैकी अनेक गोष्टी आपण स्वार्थापोटी करतो- विशिष्ट दृष्टिकोन ठेवून – तिला खणतो, नांगरतो, जाळतो… तिच्यावर गगनचुंबी इमारती उभारतो. पण आई वसुंधरा सर्व कष्ट व ओझे सहज पेलते.
एवढेच नव्हे तर भूगर्भातील विविध संपत्ती आपण अक्षरशः ओरबाडून काढतो – पाणी, तेल, खनिजे(विविध प्रकारची). हेही नैसर्गिकच आहे. भगवंतानेच आपल्या जीवनासाठी या अत्यावश्यक गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत.
म्हणूनच मानवता म्हणून प्रत्येक व्यक्तीने पृथ्वीमातेप्रति कृतज्ञता क्षणोक्षणी व्यक्त करायला ही. म्हणून हा श्लोक- कृतज्ञतेपोटी नमस्कार’’. पण तो म्हणताना उगाच कर्मकांडात्मक न म्हणता – भावपूर्ण व आध्यात्मिक अर्थ समजून म्हणजे अपेक्षित आहे नाहीतर आपण कृतघ्न ठरू.
दुर्भाग्याने बहुतेकांना ही जाणीवच नाही. आपण हे सर्व गृहीत धरतो.
तत्त्ववेत्त्यांनी पृथ्वीवरील पर्वतांना स्तनांची उपमा दिली आहे. आईच्या स्तनांतून बालकाला पौष्टिक दूध मिळते. कित्येक महिन्यांपर्यंत मूल या दुधावरच वाढते. तसेच या पर्वतात विविध पौष्टिक व औषधी वनस्पती असतात.
पू. पांडुरंग शास्त्री या विषयावर छान विवेचन करतात- ‘‘संस्कृतात ‘पय’ शब्दाचे दूध व पाणी दोन्ही अर्थ होतात. त्या दृष्टीने ‘पयोधर’ म्हणजे ‘दूध धारण करणारे स्तन व पाण्याच्या झर्यांना धारण करणारे पर्वत’ असे दोन्ही अर्थ होतात. म्हणून पर्वतांना पृथ्वीमातेच्या स्तनांची उपमा दिली आहे. पुराणात पर्वतातून फुटून निघालेल्या दुधाच्या झर्यांचे वर्णनही वाचायला मिळते. शिवाय या पर्वतरूपी स्तनमंडलातून गंगा, यमुना वगैरे शेकडों नद्या उगम पावल्या आहेत’’.
‘जल’ हे तर जीवन आहे. आईच्या दुधामुळे जसा बालक पुष्ट होतो तसे आपणही धरती मातेच्या स्तनातून गोड निर्मळ तसेच तृप्ती देणारे जल प्राप्त करून पुष्ट होत असतो. नवे जीवन प्राप्त करीत असतो. संस्कृतात पाण्याला ‘जीवन’ असेही म्हणतात.
खरेंच आपल्या ज्ञानवान ऋषी-महर्षींंची कल्पनाशक्ती एवढी प्रबळ होती की विश्वात जे काही आहे अथवा घडते आहे त्यांना सुंदर, सोप्या उपमा देऊन प्रत्येक विषय ते छान रीतीने समजावत असत. भारतीय साहित्यातील प्रत्येक प्रार्थना अत्यंत भावपूर्ण, ज्ञानपूर्ण, बोधप्रधान आहे. गरज आहे ती सर्वांनी शास्त्रशुद्धरीत्या अभ्यासून चिंतन करण्याची. जीवनाची दिशाच बदलून जाईल.
(संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृती पूजन)