व्हायरस इन्फेक्शन घरा-घरात

0
43
  • डॉ. मनाली म. पवार
    सांत इनेज, पणजी

आयुर्वेदात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे सेवन केल्यास सर्दी, खोकला, ताप यांपासून आराम मिळतो. तुळशीचा चहा किंवा काढा प्यावा. आजकाल तुळशीचे ड्रॉप बाजारात मिळतात. त्याचाही वापर चहामध्ये करू शकता.

गेल्या १५ दिवसांपासून म्हणजे मकर संक्रांतीपासून हवामानात आमूलाग्र बदल झाला आहे. या बदलाचा थेट परिणाम सगळ्यांच्या आरोग्यावर झालेला दिसतो आहे. प्रत्येक घरात सर्दी-खोकला-ताप यांसारखे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण आढळत आहेत. घरातील प्रत्येक सदस्य आजारी पडतो आहे. कोरोनाची भीती डोकं वर काढते आहे. मिश्र प्रतिक्रिया सगळीकडे ऐकायला मिळताहेत. सर्दी-खोकला-ताप असलेला रुग्ण घरी कीट आणून कोरोनाची तपासणी करतो आहे आणि रिपोर्ट (पॉझिटिव्ह) मिळत आहेत. काही औषधोपचार घेत आहेत तर काही गुपचूप औषधोपचार घेत आहेत. पण सर्वसाधारण हे इन्फेक्शन गोवा, कोकण संपूर्ण राज्यात दिसते आहे.

कडाक्याची बोचरी थंडी, गार वारे, अधिक दाट धुके यामुळे वातावरण अधिकाधिक थंड होत आहे. शरीरात कफदोष साठायला लागला आहे. थंडीबरोबर वातावरणात कोरडेपणाही वाढत असल्याने शरीरात वातही वाढतो आहे.

सर्वत्र आढळणारी लक्षणे ः-

  • अंगदुखी किंवा अंग मोडून ताप येणे
  • तापाची तीव्रता एखादा दिवस असते. पण अंगदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, प्रत्येक हाड मोडल्यासारखे दुखणे हे विशेष लक्षण सध्या सगळ्या रुग्णांमध्ये पाहायला मिळते आहे.
  • हात-पाय गार पण पोटातून थंडी वाजून येणे हेही विशेष लक्षण आढळते आहे.
  • घसा खवखवणे किंवा घसा बसणे किंवा घशाला चावा घेतल्याप्रमाणे दुखणे, गिळताना त्रास होणे.. यांसारखी लक्षणेही जास्त प्रमाणात दिसत आहेत.
  • सर्दी
  • खोकला विशेषतः सुका खोकला.
  • सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे अशक्तपणा. तोंडाला चव नसल्याने भूक लागली तरी जेवण जात नाही. त्याचप्रमाणे वात वाढल्याने, अस्थिधातूमध्ये दोष असल्याने अशक्तपणा जास्त प्रमाणात आढळतो.

साधारण अशा प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण सध्या घराघरांत दिसतात. अचानक वाढलेली थंडी आरोग्याला बाधक ठरते आहे. या आजारावर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळावण्याची शक्यता आहे.
काय काळजी घ्याल?

  • हवेच्या संपर्कात आल्यामुळे किंवा थंड वातावरणामुळे हे त्रास उद्भवताना दिसतात. त्यामुळे आपलं शरीर उबदार ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे. तसेच आपले घर, आपल्या सभोवतालचे वातावरणही उबदार हवे.
  • गरम कपडे वापरणे या काळात महत्त्वाचे आहे. कानटोपी वापरणे किंवा कान बांधणे गरजेचे आहे.
  • घरामध्ये धूपन करणे. धूपनासाठी गोवर्‍यांचा वापर करावा. निम्ब, लसणाची सालं, वेखंड, तुळशीची पाने, धूप इत्यादींचा वापर करावा जेणेकरून जंतूसंसर्गही नष्ट होतो व घरात थोडासा उबदारपणाही येतो. रोज शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेल्या औषधी तेलाने अभ्यंग करावे.
  • डोक्यालाही तेल लावावे.
  • उटणे लावून गरम पाण्याने स्नान करावे.
  • सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
  • वाहनातून प्रवास करताना गार वार्‍यापासून उबदार कपड्यांनी शरीराचे रक्षण करावे.
  • वयाला, प्रकृतीला व शरीरशक्तीला अनुरूप असा भरपूर व्यायाम करावा.
  • विविध प्रकारचे खेळ खेळावेत.
  • रोज कमीत कमी १२ सूर्यनमस्कार घालावेत.
  • पायात नेहमी मोजे किंवा पादत्राणे घालावीत.
  • वरील उपायांबरोबरच नियमित मास्कचा वापर करणे हे चालूच ठेवावे. – गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • बाहेर सॅनिटायझरचा वापर करावा व घरात साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
  • त्याचबरोबर दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. गरम पाण्यात मीठ व हळद टाकून गुळण्या केल्यास जास्त फायदा मिळतो.
  • तीळ तेल तोंडात धारण करून राहिल्यानेही फायदा होतो.
  • नाकामध्ये दोन-दोन थेंब अणू तेल, तिळतेल किंवा जुनाट तूप घातल्यानेही फायदा होतो. सर्दी बाहेर पडते.
  • मीठ मिसळलेल्या पाण्याचे थेंब नाकात टाकल्यानेही (साधारण २ थेंब) म्युकस बाहेर पडण्यास मदत मिळते.
  • वरील उपायांबरोबरच आहारातही थोडा बदल करावा.
  • दूध तसेच दुधाचे पदार्थ म्हणजे लोणी, तूप, ताक यांचे रोज सेवन करावे. कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्यास सर्दी आणि खोकल्याशी लढण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात हळद मिसळून प्या. सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.
  • आल्याचा चहा प्या. आल्याचा चहा सर्दी आणि खोकल्याच्या उपचारात मदत करतो. या चहामुळे कफ कोरडा होण्यास आणि तो शरीरातून बाहेर पडण्यास मदत मिळते.
  • हिवाळ्यात दररोज लसूण खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो.
    साधारण सगळ्या भाज्या व आमट्या लसणीची फोडणी देऊनच कराव्यात.
  • आयुर्वेदात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे सेवन केल्यास सर्दी, खोकला, ताप यांपासून आराम मिळतो. तुळशीचा चहा किंवा काढा प्यावा. आजकाल तुळशीचे ड्रॉप बाजारात मिळतात. त्याचाही वापर चहामध्ये करू शकता. तुळशीच्या चहामध्ये लवंग, मिरी, आले अत्यंत औषधी ठरते. याचे सेवन केल्याने इन्फेक्शन लवकर दूर होते. एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा आल्याची पावडर मिसळावी. हे मिश्रण मंद आचेवर आटवून त्याचा काढा करावा. त्यानंतर ते कोमट असता त्याचे सेवन करावे.
  • भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही.
  • ताज्या व पोषक अन्नाचे सेवन करणे हितावह आहे.
  • रोजच्या आहारात सुका मेवा व फळांचा समावेश करावा. सुक्यामेव्यापैकी बदाम, खजूर, खारीक, काजू, अंजीर, मनुका, जर्दाळू, अक्रोड योग्य प्रमाणात खावेत.
  • डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, तिळाचे लाडू, मुगाचे लाडू यांचाही आहारात समावेश करावा.
  • चवीसाठी हिरवी चटणी खावी.
  • च्यवनप्राश, धात्री रसायन यांसारख्या रसायन द्रव्यांचा वापर करावा.
  • सुंठ, गूळ व तूप याची बोराएवढी गोळी करून दिवसातून दोन वेळा खावी.
  • अशक्तपणा, निरुत्साह जास्त जाणवत असल्याने शतावरी कल्प दुधाबरोबर घ्यावे.
  • अश्‍वगंधा, सुवर्ण कल्पाचा वापर करावा.
  • गुडूची, सितोपलादी चूर्ण, ज्येष्ठमध, वासा कल्प, महासुदर्शन काढा- चूर्ण या प्रकारच्या औषधी कल्पांचा या व्हायरस इन्फेक्शनमध्ये उपयोग होतो. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
    अशा प्रकारे वर सांगितलेल्या सगळ्या नियमांचे पालन काटेकोरपणे केल्यास भयाचे कारण उरणार नाही.