आनंदयात्री

0
45

भोवती नुसती पडझड चालली आहे. पुष्पाग्रज गेले, सीताराम टेंगसे गेले, आणि आता मराठीतील ज्येष्ठ लेखक अनिल अवचटांच्या निधनाची बातमी येऊन थडकली आहे. अवचट आणि गोव्याचे नाते तसे म्हटले तर होतेही आणि नव्हतेही. त्यांच्या गावच्या – ओतूरच्या नदीचे नावही मांडवीच. त्यामुळे दूरदेशीच्या या लेखकाचे गोव्याशी अनुबंध सहजगत्या जोडले गेले यात नवल नाही. केप्याला गोवा मराठी अकादमीने भरवलेल्या दुसर्‍या महामराठी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आलेले होते. गोव्यातील अनेक साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय होता. निवडक अनिल अवचट या ग्रंथाचे संपादन तर आपल्या डॉ. सोमनाथ कोमरपंत सरांनीच केलेले आहे. अवचट एक अवलियेच. त्यांच्या त्या जाड चष्म्याआडच्या मोठ्‌ठ्या डोळ्यांतून जगाकडे सदैव कुतूहलाने पाहत आलेले. नित्य जगण्याचा पुरेपूर आनंद घेत जगणारे आणि दुसर्‍यांना भरभरून देणारे. अत्यंत सुबोध, परंतु उत्कट शैलीदार हातखंडा लेखन तर होतेच, परंतु जोडीने बासरी काय, चित्रे, ओरिगामी काय, लाकडावरचे कोरीवकाम किंवा रुचकर स्वयंपाक, बागकाम काय, नाना कलांमध्ये ते सहजगत्या रमायचे आणि इतरांनाही त्याचा भरपूर आणि भरघोस आनंद द्यायचे. एक रसरसते चैतन्यपूर्ण जीवन आता संपले आहे. ती त्यांच्यासोबतची जादूच्या वस्तू बाहेर काढणारी पिशवी आता कधीच उघडणार नाही.
हस्तिदंती मनोर्‍यांतील लेखणीबहाद्दराचे आयुष्य अवचट कधीच जगले नाहीत. सार्वजनिक कार्यामध्ये ते अगदी तरुणवयापासून हिरीरीने भाग घेत आलेले. युक्रांदसारख्या स्वप्नाळू चळवळीत वावरलेले. सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारे. त्यांचे पहिले पुस्तक वयाच्या पंचविसाव्या वर्षी आले ते होते बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातल्या जमीनदारी आणि वेठबिगारीवर. विविध विषयांना भिडणारे लेखन करताना अत्यंत साधे सोपे शब्द वापरत, परंतु अत्यंत मनोवेधक आणि थेट ह्रदयाला स्पर्श करणारे लेखन अवचट करीत गेले. त्यातूनच रिपोर्ताज हा विस्तृत, तपशीलवार, परंतु अनौपचारिक वृत्तांतलेखनाचा नवाच प्रकार मराठीत रुजला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. आपल्या लेखनातून नाना वादळेही त्यांनी स्वतःवर ओढवून घेतली. किर्लोस्करमधील डॉक्टर जगवतात की नागवतात या त्यांच्या लेखाने त्या काळात फार मोठे वादळ उठले. त्यांची डॉक्टरकीची पदवी काढून घ्यायचा प्रयत्न झाला. सी. आर. दळवींसारखे निष्णात विधिज्ञ तेव्हा त्यांच्या बाजूने उभे राहिले. परंतु अशी वादळे अवचटांना अडवू शकली नाहीत. ते एकेक प्रश्न मांडत गेले. वाचा फोडत गेले. दिवाळी अंकांमधील त्यांचे सुंदर शैलीतील दीर्घलेख वाचण्यासाठी अंक घेतले जात. ते वाचल्यावर दिवाळी सत्कारणी लागल्यासारखे वाटे.
केवळ लेखनकामाठी करूनच अवचट थांबले नाहीत. भारतामध्ये अमली पदार्थांचा प्रश्न जटील बनू लागलेला दिसताच व्यसनग्रस्तांसाठी त्यांनी मुक्तांगण उभे केेले, ज्यातील कळकळ पाहून पु.ल. देशपांडेंसारखा पाठीराखा उभा राहिला. सत्पात्री दान केल्याचे समाधान पुलंना मिळाले. दुर्दैवाने या कामातील त्यांची सहचरी सुनंदा लवकर गेली. पत्नीनिधनानंतर दोन मुलींना वाढवताना त्यांनी त्यांनाही जीवनातील वास्तवाचे सहजदर्शन घडविले. भोवतालच्या जगाकडे संवेदनशीलतेने पाहायला शिकवले. यशो – मुक्ताचे बाबा हे सगळ्यांचेच बाबा होऊन गेले. अहो-जाहोच्या काळामध्ये मुलींचे दोस्त होऊन ए बाबा म्हणायला लावणारे अवचट आपल्या वागण्या बोलण्यातील अनौपचारिकतेने सर्वांनाच आपलेसे करीत राहिले. आज त्यांच्या जाण्याने किती घरांतील बाबा हरवले असतील कल्पनाही करवत नाही. कानाकोपर्‍यातील कार्यकर्ते ते शोधत राहिले, त्यांच्यावर लिहित राहिले. अनेकदा नकळत भाबडे उदात्तीकरणही त्यांच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांवरील लेखनातून दिसायचे. परंतु भोवतालच्या अंधारातील प्रकाशाची बेटे शोधण्याची त्यांची आस सच्ची होती यात शंकाच नव्हती. जीवनातील प्रत्येक गोष्टीविषयी जातिवंत कुतूहल घेऊन ते वावरले. त्यांच्या नव्या पुस्तकाचे नावही कुतूहलापोटी असेच आहे. भूतकाळाचे उसासे टाकत किंवा भविष्यकाळाचे स्वप्नांचे मांडे रचत जगण्यापेक्षा वर्तमानामध्ये, समकालीन वास्तवाला भिडून कसे जगावे आणि त्यातील भेसूरता अनुभवत असतानाही स्वतःभोवती आनंदबाग कशी फुलवावी आणि जगाला तिचा आनंद कसा द्यावा हे अवचटांकडून शिकावे. त्या अर्थी ते खरेखुरे आनंदयात्रीच होते. त्यांनीच लिहिले आहे –
भूतकाळ तर होऊन गेला, झाले गेले जावे विसरून |
भविष्य अजुनि घडायचे ते, कसली चिंता, द्यावी सोडून ॥
वर्तमान तर हाती अपुल्या, क्षणाक्षणाचे करशील सार्थक |
जगायचे ते आज नि आत्ता, प्रसन्न, उत्कट आणि समर्पित!