>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा दावा; प्रचारासाठी मोदी, शहा येणार
माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांनी भाजप सोडण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांच्या राजीनाम्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही आणि फरकही पडणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
मांद्रे मतदारसंघात जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पार्सेकर यांना दोन वेळा अध्यक्षपद दिले, मुख्यमंत्रीपद दिले. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी उमेदवारी नाकारली म्हणून पक्ष सोडणे दुर्दैवी असल्याचे तानावडे यांनी सांगितले.
उत्पल पर्रीकर यांनी सुद्धा पक्षात थांबणे गरजेचे होते. आपण आमदार असताना सुद्धा २०१२ मध्ये पक्षाने आपणास उमेदवारी नाकारली, तरीसुद्धा आपण पक्षामध्ये राहिलो, याची आठवण तानावडे यांनी यावेळी करून दिली.
प्रचाराला केंद्रातील
दिग्गज नेते येणार
भाजपचा निवडणूक प्रचार सध्यात जोरात सुरू आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, गोवा प्रभारी सी. टी. रवी यांच्याकडून उमेदवारांशी चर्चा केली जात आहे. भाजपच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सहभागी होणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे पाच मतदारसंघातील उमेदवार जाहीर होणे अद्याप बाकी आहे. त्यात कळंगुट, सांताक्रूझ, कुंभारजुवे, कुठ्ठाळी आणि कुडतरी मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील उमेदवार सोमवारी जाहीर होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले…
२००२ मध्ये मनोहर पर्रीकर यांनी बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपद दिले होते. तसेच, २०१७ मध्ये पीडीएचे अध्यक्षपद देखील दिले होते. मनोहर पर्रीकर यांनी भाजपला फायदा व्हावा, याच उद्देशाने हे निर्णय घेतले होते. मनोहर पर्रीकर यांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे भाजपने पालन केले आहे.
कॉँग्रेस पक्षाचा स्वतःच्या उमेदवारांवर विश्वास नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांना मंदिर, चर्च आणि मशिदीत नेऊन पक्षनिष्ठेची आणि पक्षांतर न करण्याची शपथ घ्यायला लावली. राज्यात कॉंग्रेसने चुकीचा पायंडा घातला आहे.
दिलीप परुळेकरांची नाराजी दूर करण्यात यश
माजी आमदार जयेश साळगावकर यांना भाजपमध्ये प्रवेश आणि भाजपची उमेदवारी दिल्याने नाराज बनलेल्या माजी मंत्री दिलीप परुळेकर यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश प्राप्त झाले आहे. दिलीप परुळेकर यांची भाजपच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवडणूक व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.