उत्पल पर्रीकर यांचा भाजपला रामराम

0
21

>> पणजी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय; पार्सेकर, पाटणेकर, प्रतापसिंह राणेही लढणार

भाजपने पणजी मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने नाराज बनलेल्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी काल अखेर पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उत्पल पर्रीकरांच्या या निर्णयाने भाजपला मात्र जोरदार धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात उत्पल पर्रीकर यांनी पणजीतूनच निवडणूक लढणार असे सांगितल्यानंतर भाजपसमोर मोठे संकट उभे राहिले होते. वडील स्व. मनोहर पर्रीकर यांनी ज्या पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तिथूनच आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा उत्पल पर्रीकरांनी पक्षाकडे व्यक्त केली होती. मात्र, त्यांना डावलून पक्षाने बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उत्पल पर्रीकरांनी काल सायंकाळी पणजीत पत्रकार परिषद घेत भाजपला सोडचिठ्ठी देण्याबरोबरच अपक्ष लढण्याचे जाहीर केले.

आपण आमदारकी किंवा कुठलेही पद मिळविण्याच्या आकांक्षेने निवडणूक रिंगणात उतरत नाही, तर वडील स्व. मनोहर पर्रीकर यांनी जपलेल्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी, पणजीतील नागरिकांना चांगला पर्याय देण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. वडिलांसोबत ३० वर्षे कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचा आपणाला पाठिंबा आहे. भाजपने पणजी मतदारसंघात दिलेल्या उमेदवाराबद्दल बोलायला सुद्धा आपणास लाज वाटते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी मतदारसंघातील मागील पोटनिवडणुकीच्या वेळी त्या उमेदवाराच्या चारित्र्याचा पाढा वाचला होता, त्यालाच आता उमेदवारी दिली आहे, असेही पर्रीकर म्हणाले.
भाजप सोडल्यानंतर आता इतर पक्षात प्रवेश करण्याचा विचारही मनात येत नाही. निवडणुकीत निवडून आल्यानंतर पुढील निर्णय नागरिकांना विश्वासात घेऊन घेणार आहे, असेही ते म्हणाले.

राजकीय भवितव्य मतदारच ठरवतील
पणजी मतदारसंघातील भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष संघटनेला आपणाला मिळणार्‍या पाठिंब्याबाबत पटवून देण्याचे काम केले; मात्र भाजपमध्ये दोन वर्षांपूर्वी प्रवेश केलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या वडिलांनी दोन दशके पणजीकरांची सेवा केली. त्यांच्यावर लोकांनी सातत्याने विश्वास दाखवला. यात मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो. तेच विश्वासाचे नाते मला पुढे न्यायचे असून, माझे राजकीय भवितव्य आता पणजीकरच ठरवतील, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

केवळ मला आमदार व्हायचे आहे म्हणून आपण निवडणूक लढत नाही. पणजीत चांगला उमेदवार द्या आणि आपण निवडणुकीतून माघार घेतो. त्यानंतर मी स्वत: पुन्हा मतदारांपर्यंत जाईन आणि त्यांना त्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगेन.

  • उत्पल पर्रीकर,
    अपक्ष उमेदवार, पणजी.

पाऊसकर, पालयेकर, फर्नांडिस
यांचा आमदारकीचा राजीनामा

भाजपने आगामी विधानसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर व काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस, तसेच निवडणूक आघाडीमुळे उमेदवारी न मिळालेल्या गोवा फॉरवर्डचे शिवोलीतील आमदार विनोद पालयेकर या तिघांनी काल आमदारकीचा राजीनामा दिला.

भाजपने उमेदवारी नाकारल्याने दीपक पाऊसकर यांनी सावर्डे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच आपल्याला भाजपची उमेदवारी मिळणार नाही, याची कल्पना वर्षभरापूर्वीच आली होती, असा गौप्यस्फोट देखील पाऊसकर यांनी केला.

विनोद पालयेकर यांना कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड यांच्या निवडणूक आघाडीमुळे उमेदवारी मिळू शकलेली नाही. शिवोली मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाला देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इजिदोर फर्नांडिस यांनी सुद्धा काल आमदारकीचा राजीनामा दिला असून, त्यांनी देखील अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आत्तापर्यत १५ जणांनी आमदारकीचे राजीनामे दिले आहे. परिणामी गोवा विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ २५ वर आले आहे.