>> कुडतरी मतदारसंघातून मोरेन रिबेलो, शिवोलीतून डिलायला लोबोंना उमेदवारी; रेजिनाल्ड यांचा अपक्ष लढण्याचा निर्णय
कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काल आणखी ५ उमेदवारांची नावे जाहीर केली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुडतरी मतदारसंघात मोरेन रिबेलो यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या बाता मारणार्या आलेक्स रेजिनाल्ड यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या धक्क्यानंतर आता रेजिनाल्ड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून कुडतरीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉंग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना कुडतरी मतदारसंघात उमेदवारी दिली होती; परंतु त्यानंतरही रेजिनाल्ड यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वीच रेजिनाल्ड यांनी मतदारांच्या दबावामुळे तृणमूल कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये परतण्याचा विचार बोलून दाखवला होता. मात्र मोरेन रिबेलो यांना उमेदवारी जाहीर करत पक्षाने त्यांना जोरदार धक्का दिला आहे.
मोरेन रिबेलो यांनी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले होते. त्यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र रेजिनाल्ड यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रिबेलो यांनी भाजपमधून पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यानच्या काळात दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पुत्र शॅलोम सार्दिन याला कुडतरीतून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले होते. आता त्यांची देखील निराशा झाली आहे. दरम्यान, कॉंग्रेसने आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी ३१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
गोवा फॉरवर्डला मांद्रे मतदारसंघ बहाल
कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील निवडणूक आघाडीनुसार मांद्रे मतदारसंघ गोवा फॉरवर्डला देण्यात आला आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी ट्विटद्वारे काल दिली. काणकोण आणि सांत आंद्रे मतदारसंघात कॉंग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केल्याने गोवा फॉरवर्डने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कॉंग्रेसने मांद्रे मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडला असून, तेथून दीपक कळंगुटकर रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, फातोर्डा आणि मये मतदारसंघ सुद्धा गोवा फॉरवर्डला देण्यात आले आहेत.
मतदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची आपणास विनंती केली आहे. आपण नेहमीच लोकांसाठी काम केले. यापुढेही राज्य व लोकांसाठी काम करीन. माझ्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. मतदार हेच आपल्यासाठी सर्वोच्च आहेत.
- आलेक्स रेजिनाल्ड,
माजी आमदार
माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कुडतरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रेजिनाल्ड हे तीन वेळा कुडतरी मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवार निवडून आले आहेत. तृणमूल कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर रेजिनाल्ड यांनी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यानंतर आता त्यांनी अपक्ष लढण्याचे निश्चित केले आहे.
मायकल लोबोंच्या
पत्नीला उमेदवारी जाहीर
हल्लीच भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो यांना शिवोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. साळगाव मतदारसंघात भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या केदार नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हळदोणा मतदारसंघात ऍड. कार्लूस पेरेरा आणि प्रियोळ मतदारसंघात डॉ. दिनेश जल्मी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.