कोण होणार मुख्यमंत्री?

0
36

गोव्यासाठी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून तरुण वकील आणि सामाजिक कार्यकर्ता अमित पालेकरचे नाव आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जनतेपुढे ठेवले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केजरीवालांनी नुकतीच केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी अमितचे नाव घोषित केले आहे. आपल्या पक्षाचे सरकार आले तर अमूक व्यक्ती मुख्यमंत्री असेल हे निवडणुकीआधीच स्पष्ट करणे हे चांगल्या राजकारणाचे लक्षण आहे, परंतु अलीकडच्या काळात कोणतीही निवडणूक ही एवढी अडथळ्यांची शर्यत बनू लागली आहे की मुळात आधी स्वतः निवडून येणे आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी पुरेसे बहुमत पक्षापाशी असणे ह्या गोष्टी फार दुष्प्राप्य ठरतात. त्यामुळे आधीच एखाद्याचे नाव घोषित करणे राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे ठरू शकते. त्यामुळे तसे पाहता ही घोषणा करून केजरीवाल एक जुगारच खेळले आहेत.
केजरीवाल यांच्या या घोषणेमागे दोन ठोकताळे आहेत. एक म्हणजे अमित हा विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना तोडीस तोड ठरावा असा तरुण, तडफदार आणि विशेषत्वाने नवा कोरा चेहरा आहे आणि दुसरे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे म्हणजे तो भंडारी समाजातील आहे. गोव्यात सर्वाधिक संख्या असलेल्या भंडारी समाजाचा मुख्यमंत्री देणार ह्या घोषणेवरच केजरीवालांच्या निवडणूक प्रचाराची खरी मदार आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या मनात प्रतिमा कुतिन्होचे नाव आहे, कारण ख्रिस्ती उपमुख्यमंत्र्याची घोषणाही केजरीवालांनी केलेली आहे. पण अर्थात ह्या सार्‍या जर – तरच्या गोष्टी. मुख्यमंत्रिपदाच्या आसनापर्यंतचा मार्ग फार दूरचा आणि काटेरी आहे. आपला भारतीय समाज हा मूर्तिपूजक समाज आहे. त्याला एखादी गोष्ट मूर्तरूपात समोर ठेवली तर आवडते. ह्याच सामाजिक मानसिकतेचा विचारही मुख्यमंत्रिपदाचा किंवा पंतप्रधानपदाचा चेहरा आधी घोषित करण्यामागे असते. परंतु अलीकडच्या काळात राजकारणच एवढे अस्थिर आणि बिनभरवशाचे झालेले आहे की अशी निवडणूकपूर्व घोषणा करण्याची प्रथाही मागे पडू लागली आहे. निवडणुकीनंतरच जेथे मुख्यमंत्री निवडताना नेत्यांच्या नाकीनऊ येतात, तेथे आधीच एखाद्या नावावर शिक्कामोर्तब करणे तर दूरचीच बात!
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तोच असेल असे गृहित धरता येते. परंतु विरोधी कॉंग्रेस पक्षाला मात्र अजूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करता आलेला नाही ही शोकांतिका आहे. गेल्या वेळी सर्वाधिक जागा मिळूनही केवळ मुख्यमंत्री ठरवता न आल्याने कॉंग्रेसच्या हातचे सरकार गेले होते, परंतु त्यापासून काही धडा पक्षाने घेतल्याचे दिसत नाही. यावेळी तर पक्षामध्ये दिगंबर कामत सोडल्यास मुख्यमंत्रिपदाचे अनुभवी दावेदारच उरलेले नाहीत. लुईझिन तृणमूलमध्ये चालते झाले. राणे राजकीय निवृत्तीच्या वाटेवर आहेत, तर रवी भाजपाच्या आसर्‍याला गेले आहेत. ज्येष्ठताक्रमाने दुसरे असलेले आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आपल्या धरसोड वृत्तीमुळे दावेदारी गमावून बसले आहेत.
परंतु तरीही कॉंग्रेस दिगंबर यांचे नाव पुढे करू पाहात नाही, कारण बहुजन समाजातील प्रतिस्पर्धी चेहर्‍यांपुढे एक सारस्वत चेहरा ठेवणे निवडणुकीत परवडणारे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक आहे. मगोच्या सुदिन ढवळीकरांना मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आहे आणि ते ज्येष्ठताक्रमाने वरच्या जागेवरही आहेत, परंतु मगोशी युती करणार्‍या तृणमूलला काही त्यांचे नाव घोषित करावेसे वाटलेले नाही.
अमित पालेकर तसे पाहता राजकारणात अगदीच नवखा आहे. आम आदमी पक्षातला त्याचा प्रवेशच गेल्या ऑक्टोबरमधला आहे. ओल्ड गोव्याच्या वादग्रस्त बांधकाम प्रकरणात उपोषण केल्याने आणि त्याचा डंका देशभर वाजवण्यात आल्याने अमितकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवेळी प्राणवायूच्या कमतरतेने जे मृत्युकांड गोव्यात चालले होते, त्याविरुद्ध अमितने न्यायालयाचे दरवाजे खटखटावले होते. त्यामुळे राजकीय कारणांसाठी का होईना, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्याने आपली ओळख निर्माण केलेली आहे. गोमेकॉ नोकरभरती घोटाळ्याला त्यानेच वाचा फोडली होती. त्यामुळे असा धडाडीचा चेहरा गोव्यापुढे ठेवून केजरीवाल दिल्लीचा चमत्कार गोव्यात घडवू पाहात आहेत. पण केवळ एखादा चेहरा जनतेपुढे, विशिष्ट समाजापुढे ठेवणे पुरेसे आहे का? याचे योग्य उत्तर मतदार देणार आहे.