मौर्य व सहा आमदारांचा समाजवादी पक्षात प्रवेश

0
8

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा त्याग करत समाजवादी पक्षात जात ओबीसी नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी काल लखनऊमध्ये शक्तिप्रदर्शन केले. मौर्य यांच्यासह धर्मसिंह सैनी व भाजपला रामराम ठोकणार्‍या अन्य सहा आमदारांनी काल अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला.

मौर्य यांनी व्हर्च्युअल रॅली ठेवली होती मात्र प्रत्यक्षात मोठी गर्दी उसळल्याने सपा आणि मौर्य यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

मौर्य यांनी योगी सरकारमधून बाहेर पडत भाजपला मोठा हादरा दिला होता. त्यानंतर मंत्री धर्म सिंह सैनी यांच्यासह मौर्य यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनाम्याचे अस्त्र उगारले होते. उत्तर प्रदेशातील या राजकीय भूकंपानंतर मौर्य यांच्यासह धर्म सिंह सैनी, ६ आमदार, डझनभर माजी आमदार यांनी काल समाजवादी पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना मौर्य यांनी येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा केला. उत्तर प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री अखिलेश यादवच असतील आणि २०२४ मध्ये ते देशाचे पंतप्रधानही होतील, असा विश्वास यावेळी सैनी यांनी व्यक्त केला.