>> इस्पितळात ४३ जण दाखल
>> गुरूवारी ९७१ जण कोरोनामुक्त
राज्यात गेल्या चोवीस तासांत उच्चांकी नवीन ३७२८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आणखी चार कोरोना बळींची नोंद झाली आहे. इस्पितळांत ४३ बाधितांना दाखल करून घेण्यात आले आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३९.४१ टक्के एवढे आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १६ हजार ८८७ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५४३ एवढी आहे. राज्यात मागील चार दिवसांपासून इस्पितळामध्ये दाखल होणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असलेली दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासात ४३ जणांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहेत. इस्पितळातून बरे झालेल्या १२ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
गेल्या चोवीस तासांत नवीन ९४५९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३७२८ नमुने बाधित आढळून आले.
९७१ जण कोरोनामुक्त
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ९७१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८३ टक्के एवढे खाली आले आहे.
९९३ जणांना बुस्टर डोस
राज्यात १३ जानेवारीला ४९०९ जणांना कोविड लस देण्यात आली आहे. राज्यात आणखी ९९३ जणांना बुस्टर डोस देण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील ६६९ मुलांना कोविड लशीचा डोस देण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना
लसीकरणावर भर देण्याची सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. पंतप्रधान मोदी यांनी कोविड रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी इस्पितळामध्ये दाखल होणार्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
२०-२१ जानेवारी दरम्यान प्रतिदिन १०-१५ हजार रुग्ण ः डॉ. साळकर
राज्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता येत्या २० जानेवारीच्या आसपास दिवसाला सुमारे १० ते १५ हजार नवीन कोरोना रुग्ण सापडू शकतात, असा इशारा डॉ. शेखर साळकर यांनी काल दिला.
राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू आहे. गेल्या बुधवार व गुरूवारी ३ हजारांवर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी ३० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे येत्या २० जानेवारीच्या आसपास दरदिवशी १० ते १५ हजार कोरोना रुग्ण सापडू शकतात. त्यामुळे आगामी आठ ते दहा दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास सरकारी इस्पितळांवर ताण येऊ शकतो. कारण सरकारी इस्पितळातील अनेक डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनापासून स्वतःला वाचविण्यासाठी मास्क, सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज आहे. येत्या २५ जानेवारीनंतर कोरोना रुग्णांच्या प्रमाणात हळूहळू घट होऊ शकते, असेही डॉ. साळकर यांनी सांगितले.
राज्यात गोमेकॉ आणि खासगी इस्पितळात सध्या ११० ते ११५ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या १४ हजारांवर गेली असली तरी गोमेकॉमध्ये केवळ ७ गंभीर आजारी रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेक रुग्ण को-मोर्बिड असल्याने इस्पितळात उपचार घेत आहेत. तज्ज्ञ समितीने सरकारी इस्पितळातील रुग्णांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त व सरकारी इस्पितळातील रुग्णसंख्या ४०० पेक्षा जास्त झाल्यास संचारबंदीची शिफारस केल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.