लवू मामलेदार यांनी दिला तृणमूल कॉंग्रेसचा राजीनामा

0
18

मगो पक्षाचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी काल तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. तृणमूल कॉंग्रेस पक्ष व मगो पक्षाची युती झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर मामलेदार यांनी तृणमूल पक्षाचा राजीनामा दिला आहे.

लवू मामलेदार यांचे दीपक व सुदिन ढवळीकर या बंधूंबरोबर वैर असून त्यांच्याबरोबरचे संबंध विकोपाला गेल्यानंतर ढवळीकर बंधूंनी लवू मामलेदार यांची मगो पक्षातून हकालपट्टी केली होती. तृणमूल कॉंग्रेस पक्षाने मगो पक्षाशी युती केल्यामुळे अगदी सुरूवातीच्या काळात तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेले मामलेदार ही नाराज झाले होते.

ज्या अर्धी तृणमूल कॉंग्रेस पक्षाने मगो पक्षाशी युती केली आहे त्यावरून तृणमूल कॉंग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही हे स्पष्ट होत असल्याचे लवू मामलेदार यांनी काल तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर बोलताना स्पष्ट केले. तृणमूल कॉंग्रेस पक्ष हा गोव्यातील धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्यासाठी आला असल्याचा आरोपही मामलेदार यांनी केला आहे.