उत्तर प्रदेशातील रॅलींवर बंदी घाला

0
6

>> अलाहाबाद उच्च न्यायालयाची पंतप्रधानांना सूचना

ओमिक्रॉनबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सध्या जगभरात ओमिक्रॉनचा फैलाव जगभर आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा विचार करता अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही सूचना केली आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंडपीठात जामीन अर्जांवर सुनावणी सुरू होती. यादरम्यान न्यायालयातील गर्दी पाहून न्यायालयाने पंतप्रधान मोदींना तसे आवाहन केले आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या फैलावाच्या काळातच उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तयारीसुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे उत्तर प्रदेशचे दौरे करत आहेत. तसेच अनेक विकासकामांना गतीही देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधानांना उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. त्याबरोबरच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्याचा विचार करावा अशीही सूचना केली आहे.

राज्यातील निवडणूक रॅली आणि सभा रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत. राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमाने प्रचार करण्यास सांगावा अशीही सूचना यावेळी न्यायालयाने केली आहे.
दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले आहे. देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेबाबत न्यायालयाने मोदींची पाठ थोपटली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात मोफत लसीकरण अभियान चालवले, हे कौतुकास्पद असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.