सबका साथ!

0
26

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. लवकरच ते भारतीय जनता पक्षात सामील होतील. त्यासाठी भाजप नेते आपल्या संपर्कात आहेत असे ते स्वतःच सांगत आहेत. यापूर्वी कॉंग्रेसमध्ये शिरण्याचा त्यांचा विचार होता, परंतु कॉंग्रेसची धरसोड वृत्ती पाहून त्यांनी आपला निर्णय बदलला आहे. ज्या भारतीय जनता पक्षाविरुद्ध विधानसभेमध्ये आणि बाहेर हे महाशय आजवर रान उठवीत आले, त्याच पक्षाचे बोट धरून ते आगामी विधानसभा निवडणुकीत पाऊल टाकण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. ज्या भाजपने याच खंवटेंवर गैरव्यवहाराचे असंख्य आरोप केले, त्यांच्या अठरा कंपन्यांचा उद्धार केला, त्यांचे हॉटेल, करंजाळेतील सदनिका यांचा करही त्यांनी कसा भरलेला नाही त्याचे पाढे वाचले, अगदी विधानसभा अधिवेशन सुरू असताना धमकी दिल्याच्या आरोपावरून अपरात्री अटकही केली, तोच भाजप आता त्यांच्यासाठी लाल पायघड्या अंथरायला निघाला आहे. ज्यांनी रोहन यांच्यावर पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या, त्या प्रेमानंद म्हांबरेंपासून ज्यांनी रोहन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली, त्या प्रमोद सावंतांपर्यंत सगळी भाजपाई मंडळी आता रोहन यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत आणि ज्यांनी आजवर रोहन यांच्या वाढत्या करिष्म्याचा सामना करीत पर्वरी मतदारसंघामध्ये निर्धाराने भाजपचा झेंडा फडकता ठेवला, सतत त्यांच्याशी राजकीय संघर्ष केला, ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र हाय रे दैवा म्हणून कपाळाला हात लावून बसले आहेत! गोव्याचे राजकारण नैतिकदृष्ट्या किती खालावले आहे त्याची साक्ष द्यायला हे उदाहरण पुरेसे आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या गळाला लागलेले हे तिसरे विरोधी आमदार. प्रथम गोवा फॉरवर्डच्या जयेश साळगावकरांसाठी गळ टाकला गेला. नंतर फोंड्याचे बाहुबली रवी नाईक यांना पक्षात घेतले गेले आणि आता रोहन खंवटे यांना पक्षात घेतले जाणार आहे. ही मालिका एवढ्याने थांबणारी नाही. आणखीही काही नावे रांगेत आहेत, ज्यांच्यासाठी भाजपने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उरावरच पायघड्या अंथरलेल्या आहेत. जयेश यांच्या भाजप प्रवेशानंतर साळगावात तीन दशके पक्षाची इमानेतबारे सेवा करणारे निष्ठावंत भाजप कार्यालयाबाहेर येऊन ढसाढसा रडले. राज्यात पक्षाचे अस्तित्वही नव्हते, तेव्हापासून पक्षासाठी खस्ता खाणारे फोंड्यातील भाजपाचे निष्ठावंत एका फटक्यात दूर फेकले गेेले. आता पर्वरीवासीयांची पाळी आहे. हे असेच चालू राहणार आहे.
ही सगळी आयात चालली आहे, कारण सध्या जी मंडळी पक्षात आहेत त्यापैकी बहुसंख्य मंडळी पुन्हा निवडून येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळे ‘प्लॅन बी’ खाली ही आयत्या उमेदवारांची आयात चालली आहे. गेल्या वेळी सरकारच्या स्थैर्यासाठी घाऊक पक्षांतरे घडविली गेली, परंतु तेव्हा सोबत आलेल्यांपैकी अनेकांचा येत्या निवडणुकीत टिकाव लागणार नाही हे लख्ख दिसू लागल्याने आता संख्याबळ वाढवण्यासाठी पर्याय म्हणून नव्या मतदारसंघांमध्ये ‘विनेबिलिटी’ असलेल्या उमेदवारांमार्फत विजयश्री संपादन करून पुन्हा सत्तेवर येण्याचा जुगार भाजपा खेळू पाहात आहे.
एकीकडे सरकारपक्षाचे तीन आमदार आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर नोकरभरतीमध्ये लाचखोरीचा जाहीर आरोप करतात, दुसरीकडे एका मंत्र्याच्या लैंगिक शोषणाचे गंभीर प्रकरण समोर येते, हे सगळे पक्षाची अपकीर्ती करायला पुरेसे नाही म्हणून की काय वर्षानुवर्षे पक्षकार्य करीत आलेल्या निष्ठावंतांना कचर्‍यासारखे फेकून देत आपल्या विरोधकांशीच शय्यासोबत करायला पक्षनेते निघाले आहेत. या सगळ्यातून पक्षाची जनमानसातील प्रतिमा कशी पराकोटीची ढासळत चालली आहे याकडे लक्ष द्यायला कोणाला सवड नाही. त्यांना दिसते आहे ती फक्त आगामी सत्ता. काहीही करून ती हस्तगत करण्यासाठी हे नीतीशून्य प्रयत्न चालले आहेत आणि गोव्यातील सौदेबाज राजकारणी एकामागून एक सहजपणे या गळाला लागतही राहिले आहेत. ज्यांनी पक्षांतर करून सरकारला स्थैर्य दिले त्यांची किंमत आता संपली आहे. ज्या रोहन खंवट्यांचा आवाज विधानसभेत सतत सरकारचे वाभाडे काढायचा, त्यांचे तोंड आता बंद राहील याची तरतूद झाली आहे. अशा आणखी काही तोफा थंडावायचा प्रयास यापुढील काळात होईल. त्यासाठी साक्षात् देवेंद्राच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न चालले आहेत. मगोचे संभाव्य उमेदवारही भाजप पळवत सुटला आहे. सबका साथ, सबका विकास म्हणतात तो हाच असावा काय?