>> सभागृहाचे संख्याबळ ३६
>> आज करणार भाजपमध्ये प्रवेश
पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे काल दिला. खंवटे आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खंवटे यांच्या राजीनाम्यामुळे सभागृहाचे संख्याबळ ३६ झाले आहे. आत्तापर्यंत ४ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
आमदार खंवटे यांनी सभापती राजेश पाटणेकर यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सादर केले. आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे, असे खंवटे यांनी सांगितले.
गेल्या चार महिन्यांपासून गोव्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. बाहेरून आलेल्या पक्षाकडून गोवेकरांशी खेळ खेळला जात आहे. गोव्यातील राजकारणाला खेळण्याचे दुकान बनवू देणार नाही. गोव्याच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, असेही खंवटे यांनी सांगितले. आमदार खंवटे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले होते.
भाजप प्रवेशाला पर्वरीत विरोध
भाजपच्या पर्वरी गट समितीने माजी आमदार रोहन खंवटे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शविला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड यांनी भाजप मुख्यालयात एका बैठकीचे आयोजन करून पर्वरीचे माजी आमदार रोहन खंवटे यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर पर्वरी गट समितीच्या पदाधिकार्यांचे मत जाणून घेतले. पर्वरीचे माजी आमदार खंवटे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
पर्वरी गट समितीच्या बैठकीला उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार खंवटे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शविला. खंवटे यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्यासाठी काम करणार नाही. खंवटे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांची आठवण यावेळी पदाधिकार्यांनी करून दिली. पर्वरी भाजप मंडळाचे महानंद अस्नोडकर यांनी खंवटे यांच्या भाजप प्रवेशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पर्वरी मतदारसंघात भाजपचे शिस्तबद्ध काम करणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मागील दहा वर्षात भरपूर त्रास करण्यात आलेला आहे. खंवटे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास त्यांच्याविरोधात काम करणार आहे. भाजप मुख्यालयात आयोजित बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, असे अस्नोडकर यांनी सांगितले. पर्वरीचे माजी आमदार खंवटे यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर स्थानिक भाजप मंडळाच्या पदाधिकार्यांची चर्चा झाली. खंवटे यांनी भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आपल्याकडे सादर केलेला नाही. भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आल्यानंतर भाष्य करणे योग्य ठरेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले.
मारहाणीच्या तक्रारीवरील सुनावणी पूर्ण
पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र भाजपचे एक प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांनी खंवटेविरोधात काही महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या मारहाणीच्या तक्रारीसंबंधीची सुनावणी उच्च न्यायालयात पूर्ण झालेली आहे. आता पुढील आठवड्यात त्यावरील निवाडा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत खंवटे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पर्वरी सचिवालयात दोघेही अनपेक्षितपणे समोरासमोर आपले होते. त्यावेळी खंवटे यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार म्हांबरे यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे केली होती. या संबंधीचा खटला उच्च न्यायालयात चालू झाला होता. त्याची सुनावणी आता पूर्ण झाली आहे.