वशिल्याने नोकरी मिळवलेल्यांची यादी हाती

0
19

>> गिरीश चोडणकर यांचा गौप्यस्फोट

लाखो रुपये घेऊन वशिल्याने ज्या उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी त्यांच्या नावाची यादी यापूर्वीच तयार झालेली आहे. असे सांगून गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल ‘फूड सेफ्टी ऑफिसर’ ऍसिस्टंट केमिस्ट (फूड), ऍसिस्टंट केमिस्ट (ड्रग्ज), फार्मासिस्ट, एलडीसी, स्टेनो, ड्रायव्हर व एमटीएस ह्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत सादर केली. तसेच सरकारी नोकरभरतीप्रकरणी न्यायालयात धाव घेण्यासाठी सर्व ती तयारी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. ज्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे ते उमेदवार आता पुढे येऊन कॉँग्रेस पक्षाला साथ करत असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

पदांसाठी लाखो रुपये मोजलेल्या व लेखी परीक्षेला अपात्र झालेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका जाळून टाकण्यात आल्या व नंतर त्या नव्याने लिहिल्या. या उत्तरपत्रिका लिहिण्याचे काम नंतर खात्यातीलच काही कर्मचार्‍यांनी केले. त्यावर उमेदवारांचे हजेरी क्रमांक व अन्य तपशील लिहिण्यासाठी कर्मचारी उमेदवारांच्या घरापर्यंत गेल्याचे चोडणकर म्हणाले.

अभ्यासक्रमही ठेवला गुप्त
पदांसाठी पैसे मोजलेल्या उमेदवारांना सोडून अन्य सर्व उमेदवारांना परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय तेही कळवले नसल्याचे चोडणकर म्हणाले. आपण स्वतः शिक्षक असून कोणतीही परीक्षा असल्यास परीक्षेला बसणार्‍या उमेदवारांना परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे याची माहिती द्यावी लागत असल्याचे सांगून उमेदवारांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासच करता आला नसल्याचे चोडणकर म्हणाले. तरीही बर्‍याच हुशार विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले. मात्र, त्यापैकी ज्यांनी पैसे दिले नव्हते त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

अशा गैरपद्धतीने ही नोकरभरती चालू असून चौकशी झाल्यास आपण गोत्यात येऊ यासाठी काही अधिकारी घाबरले असून आता त्यापैकीच काही जणांकडून कॉंगे्रसला बरीच माहिती मिळाली असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

चर्चिल ब्रदर्स फुटबॉल संघाला राज्य सरकारने १ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यावरून तृणमूल कॉंग्रेस हा पक्ष मतांची विभागणी करून भाजपचा विजय घडवून आणण्यासाठी गोव्यात आल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. तसे नसते तर आलेमाव यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करताच त्या संघाला १कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलाच नसता असे चोडणकर यांनी सांगितले.

लैंगिक शोषणप्रकरणी मंत्र्याचे
नाव राज्यपालांकडे उघड

एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या मंत्र्याचे नाव आपण राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे उघड केले असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकारांना सांगितले. कुठल्या मंत्र्याने महिलेचे लैंगिक शोषण केले आहे त्याचे नाव कॉंग्रेसने आम्हाला कळवावे. नाव कळवले की आम्ही त्या मंत्र्यावर कारवाई करू, असे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले होते असे सांगून आता तानावडे यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना त्या मंत्र्याचे नाव विचारावे व त्या मंत्र्यावर आवश्यक ती कारवाई करावी, असे यावेळी चोडणकर म्हणाले.