झुवारीनगर वास्को येथे एकाचा संशयास्पद मृत्यू

0
15

>> खून झाल्याचा पोलिसांचा संशय

झुआरीनगर- सांकवाळ येथे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळील अंतर्गत रस्त्यावर शनिवारी रात्री अन्वर शेख (५६) या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले आणि पोलिसांना याबाबत खबर दिली. वेर्णा पोलिसांना खुनाचा संशय व्यक्त केला असून या खून प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

सांकवाळ, झुआरीनगर येथे राहणारे अन्वर शेख हे मध्यरात्री जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात अंतर्गत रस्त्यावर पडलेले एका व्यक्तीला दिसून आले. सदर व्यक्तीने त्वरित याबाबत वेर्णा पोलिसांना कळविले. वेर्णा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने शेख यांना उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

झुआरीनगरातील अन्वर यांच्या कपाळावर अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याचे आणि कपाळाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस तीक्ष्ण जखमा झाल्याचे पोलिसांना तपासणीवेळी आढळले. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून त्याच्या हत्येमागे असलेल्यांचा शोध सुरू केला आहे.
अन्वर शेख हे एमपीटीमध्ये कामाला होते. २०१२ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. अन्वर हे इस्लामपूर, बायणा येथील रहिवासी होते.