१८ वर्षांवरील १ लाख ३० हजार गोमंतकीयांनी अद्याप कोविडसाठीच्या लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली व या सर्वांनी लवकरात लवकर दुसरा डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही केले. या १ लाख ३० हजार लोकांना एका आठवड्याच्या आत दुसरा डोस देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कोविडवर विजय मिळवण्यासाठी ह्या सर्वांनी लशीचा दुसरा डोस घेण्याची गरज असून ह्या १ लाख ३० हजार लोकांनी विनाविलंब हा दुसरा डोस घेण्याची गरज असून त्याबाबत हलगर्जीपणा करू नये. तसे केल्यास कोविडवर विजय मिळवण्याच्या काळात अडथळे येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रशिया व जॉर्जिया ह्या देशांतून आलेल्या व कोरोना विषाणूचे उत्परिवर्तीत रूप असलेल्या ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व सध्या विलगीकरणात ठेवलेल्या नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ह्या ५ विदेशी नागरिकांपैकी तिघेजण हे रशियातून तर अन्य २ जण हे जॉर्जिया ह्या देशातून आले असल्याचे ते म्हणाले. हे पाचही जण एका जहाजावर काम करणारे कर्मचारी आहेत, असे सांगून त्यांच्या चाचणीचे अहवाल ‘जिनोम सिल्वेन्सिंग’साठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे पाचही जण आपल्या देशांतून आल्यानंतर सुमारे १२ ते १३ दिवसांनतंर कोविड पॉझिटिव्ह झालेले असून त्यामुळे त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असल्याची शक्यता कमीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात चोवीस तासांत नवे ६५ कोरोनाबाधित
राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद नाही. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्येत पुन्हा वाढ झाली असून रूग्णसंख्या ४४१ एवढी झाली आहे.
राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात कोविड १९ मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही. राज्यातील सातवीपासूनचे वर्ग घेण्यास मान्यता देण्यात आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३८८ एवढी आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २८ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८६ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत ३५७९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६५ नमुने बाधित आढळून आले. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने ९ जणांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले. तर, बर्या झालेल्या एका रुग्णाला इस्पितळातून घरी पाठविण्यात आले.
मडगावातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मडगावातील सक्रिय रूग्णसंख्या ७५ झाली आहे. नावेली येथील रूग्णसंख्या ४७ आहे. तर, पणजीतील रूग्णसंख्या ४४ एवढी आहे.