ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो यांचे कोकण मराठी परिषदेतर्फे अभिनंदन

0
24

गोमंतकीय कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकण मराठी परिषद गोवा या संस्थेने मावजो यांचे अभिनंदन केले आहे. कोकण मराठी परिषदेच्या बैठकीत परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला.

कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी मावजो यांचे अभिनंदन केले आहे.
गोव्यातील साहित्य परंपरेचा हा गौरव आहे. मावजो यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असून त्यांनी गोमंतकीय साहित्यिकांना लेखनासाठी प्रोत्साहन दिले आहे. फुंदासांव द ओरिएंट या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कोकणी, मराठी, इंग्रजी व पोर्तुगीज भाषांतील नवोदित साहित्यिकांसाठी स्पर्धा व कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत, असे कोकण मराठी परिषदेने पत्रकात म्हटले आहे.

कार्मेलिन या कादंबरीद्वारे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. या कादंबरीचे भारतीय भाषांत अनुवाददेखील झाले आहेत. कार्मेलिन या कादंबरीला १९८३ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सूड, सुनामी सायमन, गांथन आदी कादंबर्‍यांसह जागरणां, रुमडफूल, भुरगीं म्हगेली तीं, सपनमोगी, तिश्टावणी आदी पुस्तकांद्वारे मावजो साहित्यप्रेमींमध्ये वाचकप्रिय ठरले आहेत. अखिल भारतीय साहित्यिकांना एकत्र आणून अनेक साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन ते करीत असतात. त्यांनी साहित्यातील विविधतेतील एकता जपण्याचा प्रयत्न केला आहे.