॥ नवजीवन ॥ अनुभव हेच शिक्षण … ‘ऑनलाइन’ मिळेल?

0
46
  • प्रा. रमेश सप्रे

मनात एक भीती जरूर वाटते – की शिक्षणासारखी जीवनाची जडणघडण करणारी विकासाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी महत्त्वाची संस्था अशीच ‘ऑन लाइन’ भावी काळात पर्यायी शिक्षण व्यवस्था बनून राहील का?

डोंबार्‍याचा खेळ आज जवळजवळ नामशेष झालेला. कधीतरी बाजार, बस थांबा, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी ‘गुबु गुब्बु’ असा ढोलक्याचा आवाज ऐकू आला की त्या दिशेनं डोळे वळतात, क्वचित पावलंही वळतात. बरोबर जर एखादं किशोरावस्थेतलं मूल असेल तर मात्र मुद्दाम त्याला तो डोंबार्‍याचा खेळ दाखवावा.
दोन उंच बांबू कात्रीसारखे दोन बाजूंना उभे केलेले असतात. मध्ये एक तार (किंवा दोरी) बांधलेली असते. ती बर्‍यापैकी उंचीवर असते. त्या दोरीवर एक लहान मुलगी (कधी कधी मोठी बाईही) हातात एक बांबू घेऊन, त्याच्या साह्यानं तोल सांभाळत चालत जाते. ही एकप्रकारे तारेवरची कसरत असते. त्यात ते बांबू, ती तार किंवा दोरी, हातात धरलेला बांबू ही सारी साधनं असतात. साध्य असतं खाली न पडता तारेवर (दोरीवर) चालणं.

हे चित्र डोळ्यासमोर आणलं की हल्ली जो ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा प्रयोग (नाइलाजानं) चालू आहे तो याच प्रकारचा आहे हे लक्षात येतं. मुलांच्या दृष्टीनं शिकणं ही अशी तारेवरची कसरत बनलीय. पडद्यावर शिक्षिका बोलत- शिकवत- दाखवत असते. इकडे मुलं मोबाइलच्या छोट्या पडद्यावर शिकत असतात. खरं तर हा सारा प्रकार आभासी (व्हर्च्युअल) आहे. रूप- शब्द हे दोनच अनुभव मुलांना मिळतात. स्पर्श- रस- गंध अर्थात् शिक्षिकेचं जिवंत अस्तित्व जाणवत नाही. फक्त चित्र-वाणी. तीही दूरचित्रवाणी?
या संदर्भात एक संवाद पाहू या.

एक छोटी चुणचुणीत मुलगी. ‘मोठ्या शिशु’वर्गातली. (काय भयंकर शब्द आहे नाही ‘सिनियर के.जी.साठी. ‘छोटा शिशु’ म्हणजे ज्यूनियर के.जी. हा शब्दप्रयोगही मजेशीरच आहे. असो.) तसं पाहिलं तर आज घरी- दारी- शेजारी- बाजारी, लहान, कोवळ्या मुलांना ‘मिनी ऍडल्ट’ म्हणूनच बघितलं जातं. मिनि-ऍडल्ट म्हणजे ‘शिशु तरुण’! वाईट म्हणजे शाळेत निरागस बालकांना ‘मिनी ऍडल्ट’ म्हणून वागवलं जातं. काही अपवाद सोडले तर अभ्यासक्रम, वातावरण, शिकवण्याची पद्धत, शिक्षिकांची मानसिकता सारं या वरून खाली (तरुणाकडून बालकाकडे, तरुणावस्थेकडून बालकावस्थेकडे) पाहणार्‍या दृष्टीचं (व्हिजन), दृष्टिकोनाचं (पर्सेप्शन) प्रतीक असतं. म्हणून ‘पेडॅगॉमी ऑफ द ऑप्रेस्ड’ म्हणजे पददलितांचं (शोषण, जुलूम सहन करणार्‍यांचं) शिक्षण’ अशा नावाचं काही दशकांपूर्वी गाजलेल्या पुस्तकाचा विषय समाजातील ‘शोषित, वंचित’ लोकांच्या शिक्षणाविषयी होता. पण कोणाही सहृदयी, शिक्षणाविषयी आस्था असलेल्या व्यक्तीनं पूर्वप्राथमिक (शिशुवर्ग) नि प्राथमिक (बालकवर्ग) या पातळीवरील शिक्षणपद्धतीचा विचार केला तर समाजातील सर्वांत शोषित, वंचित, पददलित’ वर्गात ही मुलंच अधिक प्रमाणात दिसून येतात. – हे सारं विवेचन विषयांतर नसून विषय समांतर आहे.
तर आपण त्या प्रसंगाकडे वळू या. एका हुशार मुलीला, चिन्मयीला, काही प्रश्‍न विचारले सध्याच्या ‘ऑन लाइन’ शिक्षणाबद्दलच्या तिच्या अनुभवाबद्दल.

आधीच सांगितलं पाहिजे की एखादी कर्कश्श आवाजात बोलणारी शिक्षिका, ऊठसूठ मारणार्‍या बाई अशा ‘टीचर्स (शिक्षिका)’ प्रत्यक्षापेक्षा पडद्यावरच (सु)सह्य वाटतात. मुलांना पडद्याचं (स्क्रीनचं) एक प्रकारचं कवच मिळतं. असो.

तर चिन्मयीला विचारलं, ‘शाळेची आठवण येते का?’ ‘बाईंना भेटावं असं वाटतं का?’ ‘मित्र-मेत्रिणीं’शी बोलावं अशी इच्छा होत नाही का?’- अशा प्रश्‍नांना चिन्मयीचं एकच उत्तर होतं. जसे ‘भाकरी का करपली? घोडा का अडला? विड्याची पानं का कुजली? – उत्तर एकच ‘फिरवली नाही म्हणून!’…
चिन्मयीचं उत्तर होतं ‘नाही. कारण शाळा- बाई- मित्रमैत्रिणी पडद्यावर (ऑन लाइन) दिसतातच. मग दुसरे प्रश्‍न विचारले- ‘तुझ्या आवडत्या मित्रमैत्रिणींबरोबर लपाछपी, लंगडी असे खेळ पडद्यावर खेळता येतील?’ – चिन्मयी विचारात पडली. पुढच्या प्रश्‍नानं काहीशी चक्रावून गेली. ‘तुझ्या बाईंना तुला लॉलीपॉप द्यायचाय. तो पडद्यावर दिला तर चालेल?’- नंतर ठासून म्हणाली, ‘कसा चालेल? तो हातात नको का द्यायला?’
या प्रश्‍नोत्तरात छोट्या मंडळींसाठी ‘ऑन लाइन’ शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट होतात. म्हणजे सांगाडा व्यवस्थित दिसतो पण जिवंतपणा, चैतन्य अनुभवता येत नाही.

आज काही वरच्या वर्गातली (८ वीपासून) मुलं जरी प्रत्यक्ष शाळेला जायला लागली असली तरी खालच्या वर्गातली, विशेषतः बालवर्गातली मुलं अजून घरीच आहेत. एकूण ‘ऑन लाइन’ पूर्णपणे, निश्चित ‘ऑफ् लाइन’ खरं तर ‘लाइव्ह – जिवंत’ शिकणं- शिकवणं सुरू झालेलंच नाहीये. दुसर्‍या विषाणूचं ग्रहण एकूण समाज जीवनाला न लागो यासाठी प्रयत्न नि प्रार्थना मात्र करत राहू या.

मनात एक भीती जरूर वाटते – की शिक्षणासारखी जीवनाची जडणघडण करणारी विकासाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी महत्त्वाची संस्था अशीच ‘ऑन लाइन’ भावी काळात पर्यायी शिक्षण व्यवस्था बनून राहील का?
अंगणात खेळत असलेल्या चिन्मयी नि तन्मय या छोट्यांना पौष्टिक पण रुचकर चिक्की देताना प्रश्‍न विचारला ‘तुम्हाला काय व्हायला आवडेल- फुलपाखरु की मधमाशी?’ दोघं एकदम् उद्गारली- ‘फुलपाखरु!’ समोर असलेल्या झाडांवर फुलपाखरंही उडत बागडत होती नि मधमाशाही रुणुझुणू गुंजत होत्या. त्यांच्यावर लक्ष वेधून विचारलं- ‘फुलपाखरं फुलांवर का बसताहेत?’ त्यांचं उत्तर ‘मध खायला’ अन् ‘मधमाशा?’ ‘त्याही मध खायलाच ना?’ या त्यांच्या उत्तरावर आजोबा हसून म्हणाले, ‘मध खायला नाही, चाखायला नि नंतर मधाच्या पोळ्याकडे न्यायला. साठवण्यासाठी. कुणासाठी? आपल्यासाठी म्हणजे माणसांसाठी!’ यावर तन्मय म्हणाला, ‘मला मधमाशी व्हायला आवडेल!’
आजोबांनी गोड समारोप केला- फुलपाखराचे रंग घेऊया नि मधमाशीकडून मध’… हे ऑनलाइन जमेल? अनुभवता येईल? अन् अनुभव म्हणजेच शिक्षण… अनुभव म्हणजेच जीवन! खरंय ना?