मगोची तडजोड

0
26

मगोच्या सिंहगर्जना हवेत विरल्या. शेवटी तृणमूल कॉंग्रेससारख्या ‘बाहेर’च्या पक्षापाठी सिंह मांजरागत मुकाट निघाला आहे. ‘बाहेरचे पक्ष गोव्यात येऊन येथील राजकारण गढूळ करीत आहेत’ असे सुदिन ढवळीकर गेल्याच महिन्यात सांगत होते. परंतु याच ‘बाहेरच्या’ पक्षाशी संधान बांधण्याची पाळी भाजपने फटकारलेल्या आणि कॉंग्रेसने झिडकारलेल्या मगोवर आली आहे. मगो पक्ष हा गोव्याच्या मातीत जन्मलेला पक्ष. बहुजनसमाज, महाराष्ट्रवाद आणि मराठी भाषा ही एकेकाळी त्याची प्राणतत्त्वे. यापैकी एकेकाला पक्षाने तिलांजली दिली आणि हा पक्ष गेली काही वर्षे ढवळीकर बंधूंची मिरास बनून राहिला आहे. त्यांनी त्याच्यातली धुगधुगी कायम ठेवली खरी, परंतु वापर मात्र स्वतःचे सत्तासोपान म्हणूनच केला. आताही तृणमूल कॉंग्रेसच्या दावणीला ते भाऊसाहेब बांदोडकरांचा सिंह बांधायला निघाले आहेत, त्यामागे काही वेगळी आकांक्षा दिसत नाही.


मगो आणि तृणमूल ही खरे तर वैचारिकदृष्ट्या दोन विरुद्ध टोके. मगोला ढवळीकर बंधूंनी अगदी सनातनी हिंदुत्वाच्या वाटेने न्यायला सुरुवात केली होती. आपल्या पारंपरिक मतदाराबरोबरच भाजपपासून भ्रमनिरास झालेला हिंदुत्ववादी मतदार जवळ करण्याचा त्याचा आजवर प्रयत्न राहिला. मागील निवडणुकीत गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती केली तेव्हाही हिंदुत्वाच्या समान वैचारिक धाग्याने तिन्ही पक्ष जोडले गेले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल प्रतिकूल लागताच एका रात्रीत आपल्या सोबत्यांवर लाथ मारून मगो भाजपच्या सत्तेत सामील झाला. तेथेही समविचारित्वाचा धागा होता. पुढे भाजपने संधी मिळताच पक्ष फोडला आणि सरकारमधून हाकलले हा भाग वेगळा, परंतु आज तृणमूल कॉंग्रेसमागे फरफटत जात असताना मात्र मगोपाशी त्याचे असे कोणतेही तार्किक समर्थन दिसत नाही. मात्र, बळे बळे ‘तृणमूल हा बंगालमधील हिंदूंचा पक्ष आहे’ असे त्याचे लटके समर्थन करण्यामागे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर लागलेले दिसतात.


ममता बॅनर्जींनी यांच्यावर काय बंगाली जादू केली नकळे, परंतु ज्या पक्षावर अल्पसंख्यकांच्या लांगूलचालनाचा, बांगलादेशी मतांवर निवडून येण्याचा आरोप सतत होत राहिला आहे, निवडणूक हिंसाचार हीच ज्यांची ओळख बनली आहे, असा बाहेरचा पक्ष एका रात्रीत यांच्यासाठी प्रातःस्मरणीय का बरे बनला असेल? अर्थातच, मगोची कमालीची हतबलता यामागे आहे. तृणमूलशी हातमिळवणी म्हणजे भरभक्कम आर्थिक मजबुती आणि प्रशांत किशोरांच्या रणनीतीचा बोनस असा दुहेरी फायदा आहे. त्यामुळेच बहुधा मगो नेत्यांना एकाएकी हे बंगाली रसगुल्ले प्रिय झाले असावेत.
तृणमूलशी हातमिळवणी केल्याने मगोचा काही फायदा होणार आहे का? मगोचे बारा मतदारसंघांमध्ये काम आहे आणि त्या बारा जागा लढण्यात पक्षाला स्वारस्य आहे. जो ह्या बारा जागा सोडील त्यांच्यासोबत जाऊ असा स्वतःचा जाहीर लिलाव मगो नेतृत्वाने पुकारला होता. तृणमूलशी युती करताना ह्या बारा जागा मगोसाठी सोडण्याचे वचन ममता बॅनर्जींनी दिले असले तरी त्याबाबतही काही व्यावहारिक अडचणी आहेत. उदाहरणार्थ – मगोला हळदोण्याची जागा हवी आहे, जिथे तृणमूलमध्ये अलीकडेच सामील झालेले किरण कांदोळकर उभे राहणार आहेत. अर्थात, जागावाटपाच्या ह्या समस्येतून चर्चेद्वारे वाट काढता येते. मात्र, त्यासाठी थोडी त्यागाची तयारीही दोघांना ठेवावी लागेल.
बिगर कॉंग्रेस – बिगर भाजप आघाडीची बात आता मगो पक्ष करू लागला आहे. म्हणजे आम आदमी पक्षालाही सोबत घेण्याचा विचार मगो नेतृत्वाने बोलून दाखवला आहे. परंतु आम आदमी पक्ष स्वबळाच्या निर्णयावर अजून तरी ठाम आहे. ‘आप’लाही सोबत घ्यायचे असेल तर मगोला आणखी काही महत्त्वाच्या जागांवर पाणी सोडावे लागेल. त्याला त्याची तयारी आहे का? ‘आप’चा एकंदर जोश पाहता सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या निर्धारापासून तो परावृत्त होण्याची शक्यता कमी दिसते. इतर सर्व पक्षांपेक्षा ‘आप’ने स्वतःला सत्ताधारी भाजपला पर्याय म्हणून जनतेसमोर प्रस्तुत करण्यात काहीही कसर राखलेली नाही. घोषणांमागून घोषणा तो करीत चालला आहे. तृणमूल यावेळी कॉंग्रेसच्या मतांना प्रामुख्याने खिंडार पाडणार आहे. परंतु ही मते केवळ निवडणूकपूर्व युती आहे म्हणून मगोच्या पारड्यात पडणार आहेत का? तशी शक्यता फारच कमी आहे. परंतु मगोमुळे नवख्या तृणमूलला मात्र संपूर्ण गोव्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची आयती संधी लाभेल. एकेकाळी भाजपाचा भस्मासुर मगोनेच मोठा केला होता. आता तृणमूलला करणार काय? सतत डरकाळ्या फोडणार्‍या सिंहाचे असे मांजर कसे बरे झाले?