मगो-तृणमूल युतीवर शिक्कामोर्तब

0
19

>> ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत १३ डिसेंबरला होणार अधिकृत घोषणा

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगो) केंद्रीय समितीच्या बैठकीत आगामी फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार्‍या गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेस पक्षाशी निवडणूकपूर्व युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा आणि पक्षाचे उपाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याच्या निर्णयाला दुजोरा देत अधिकृत घोषणा १३ डिसेंबरला होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मगोने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलसमोर १२ जागांचा प्रस्ताव ठेवला असून, प्राथमिक चर्चा यशस्वी झाली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी १३ डिसेंबर रोजी गोवा दौर्‍यावर येणार आहेत, त्यावेळी निवडणूक युतीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
मगो आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील युतीमध्ये आणखी राजकीय पक्ष सहभागी होऊ शकतात. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पक्षाकडून सर्वेक्षण केले जात आहे. भाजप आणि कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच मुख्य उद्देश आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले. मगोचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघातच पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. तृणमूल कॉंग्रेस पक्ष हा नवीन राजकीय पक्ष असला तरी राज्यातील अनेक नेते या पक्षात प्रवेश करीत आहेत. आमच्या अटी मान्य झाल्यानंतर निवडणूक युतीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजप, कॉंग्रेस वगळून कुणाशीही युतीस तयार : ढवळीकर
मगोमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याची ताकद आहे; परंतु राज्यातील राजकारण खालच्या पातळीवर गेल्याने निवडणूकपूर्व युतीचा निर्णय घ्यावा लागत आहे. मगोचे काही उमेदवार फोडण्याचे प्रयत्न काही पक्षांकडून सुरू आहेत. भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाशी निवडणुकीसाठी युती करण्याची पक्षाची तयारी आहे. मगोने १९९९ वर्षी भाजपला गोव्यात आणले, त्याच भाजपने मगोला संपविण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस आदी पक्षांशी निवडणूक युतीबाबत चर्चा सुरू होती, असे दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

तृणमूल-मगोची युती पूर्ण ताकदीनिशी लढणार : फालेरो
मगो आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील गोवा विधानसभा निवडणूक युतीचे तृणमूलच्या नेत्यांनी काल स्वागत केले आहे. गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमूल-मगो यांच्यातील आघाडी पूर्ण ताकदीनिशी काम करेल, असे तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोव्यावर प्रेम करणार्‍या आणि भाजप सरकार पुन्हा नको असलेल्या सर्वांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन यावेळी माजी आमदार किरण कांदोळकर यांनी केले.

भाजप स्वबळावर लढण्यास तयार

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची स्पष्टोक्ती

भारतीय जनता पक्ष (भाजप) गोवा विधानसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्यास तयार असून, राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.
मगोने तृणमूल कॉंग्रेस पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्याशी युतीबाबत यापुढे चर्चा केली जाणार नाही. यापूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते मगोशी युतीबाबत चर्चा करीत होते, असेही तानावडे यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांच्याकडून भाजप प्रवेशासाठी अद्यापपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. नाईक यांच्याकडून पक्ष प्रवेशासाठी प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. भाजप प्रवेशासाठी त्यांना अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतरच पुढील बाबी घडतील, असेही तानावडे यांनी सांगितले.

महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या त्या मंत्र्याचे नाव कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जाहीर करावे. भाजपकडून त्वरित त्या मंत्र्यावर कारवाई केली जाईल. त्या मंत्र्याचे नाव जाहीर झाल्याशिवाय कारवाई करणे शक्य नाही. तसेच त्या पीडित महिलेने पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली पाहिजे, असेही तानावडे यांनी सांगितले.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. राज्यातील मतदारांकडून भाजपला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मगोने तृणमूल कॉंग्रेस पक्षासोबत घेतलेल्या युतीच्या निर्णयानंतर काल व्यक्त केली.

अन्य पक्षांतील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार : फडणवीस
भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल गोव्यात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत इतर पक्षांतील काहीे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोव्यातील इतर पक्षांतील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही नेत्यांनी भाजप प्रवेशासाठी संपर्क साधलेला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत देखील चर्चा होणार आहे.