दाबोळी येथे सोमवारी पहाटे दोनच्या दरम्यान पार्क केलेल्या ट्रेलरला कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मणिपूर येथील रहिवासी एलिझा देवी लैश्राम (१९) हिचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलिझा देवी आणि अन्य एक युवक दक्षिण गोव्यातील एका हॉटेलात सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविवारी उत्तररात्री दाबोळी विमानतळावरून मणिपूरला रवाना होण्यासाठी कारमधून जात होते. कार विमानतळाच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विमानतळाजवळ पार्क केलेल्या एका ट्रेलरवर ती धडकली.
पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, कारमध्ये मागे बसलेल्या एलिझा हिला जागीच आपला जीव गमवावा लागला, तर चालक दत्तराज देसाई आणि १९ वर्षीय प्रशिक्षणार्थी युवक गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात हलवले. वास्को पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्नील नाईक करत आहेत.