राज्यातील कोरोनाची स्थिती गेला महिनाभर बर्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसते आहे. ही निश्चितच समाधानकारक बाब आहे, परंतु त्यामुळे जी सार्वत्रिक गाफिलता आणि कोविडसंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबतची बेफिकिरी दिसते, ती घातक ठरू शकते. सरकारने जनतेला ह्याचे स्मरण करून देणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील कोविड रुग्णांची संख्या जेमतेम अडीचशेच्या आत आहे हे खरे आहे, परंतु तरीही दरदिवशी नवनवीन तीस – पस्तीस रुग्णांची भर पडतेच आहे. गोवा हे देशातील पहिले संपूर्ण लसीकरण झालेले राज्य असल्याची शेखी जरी राज्य सरकार मिरवीत असले, तरीही रोज सापडणारे नवनवे रुग्ण पाहता, केवळ लसीकरण हा कोरोनाला दूर ठेवण्याचा उपाय ठरू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यास तज्ज्ञांच्या समितीने जरी सरकारला हिरवा कंदील दर्शवला असला तरी सरकार तशा प्रकारच्या निर्णयाची घिसाडघाई न करता ज्या सावधगिरीने पावले टाकत आहे, ती सावधगिरी व दक्षता गरजेचीच आहे. शाळांचे वर्ग सुरू करायचे की नाहीत याचा निर्णय सर्वस्वी शाळा व्यवस्थापनांवर सोपवण्यात आला आहे. उद्या कुठे काही विपरीत घडले तर दोष सर्वस्वी शाळांच्या व्यवस्थापनांवर फोडणे यामुळे जरी सरकारला शक्य होणार असले, तरी त्यामुळे सरकारची जबाबदारी संपत नाही. शाळा सुरू करण्याबाबत जो जो निर्णय घेतला जाईल, त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल, शाळा व्यवस्थापनांना नव्हे. परराज्यांत काही शाळांमध्ये मुलांना कोरोना संसर्ग झाल्याच्या बातम्या अजूनही अधूनमधून येत असतात व पालकांच्या चिंतेत भर घालत असतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने, सावधपणे यासंदर्भातील निर्णय घेणेच हितकारक ठरेल. शाळांमध्ये वर्ग भरवण्यास काही प्रमाणात परवानगी देण्यात आलेली असली तरी जाहीर स्वरुपाचे कार्यक्रम करण्यास किंवा प्रार्थनासभा भरवण्यास मनाई करण्यात आली आहे ती सद्यपरिस्थितीत उचित आहे. कोरोना हा असा दबक्या पावलांनी घाला घालणारा आजार आहे जो कधी डंख मारील आणि त्याचा वणवा पुन्हा भडकेल सांगता येत नाही.
लवकरच वर्षअखेर येणार आहे. पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल. शिवाय जणू काही कोविड अस्तित्वातच नाही अशा थाटात नववर्षाच्या स्वागताचे जल्लोष सर्वत्र सुरू होण्याचा धोका आहे. ‘सनबर्न’ संगीत महोत्सवाला सरकार परवानगी देणार नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्टपणे सांगितले हे रास्त पाऊल आहे. पर्यटनमंत्र्यांना जरी या महोत्सवामध्ये बेधुंद नाचण्यात विलक्षण रस दिसत असला, तरी त्यातून कोरोनाचा विळखा पुन्हा राज्याला पडू शकतो. त्यामुळे ह्या महोत्सवासाठी पर्यटनमंत्र्यांनी वकिली करू नये.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच पूर्ववत होईल असे संकेत कालच केंद्र सरकारने दिलेले आहेत. याचाच अर्थ पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे गोव्यात येऊन लवकरच थडकू लागतील. शिवाय चार्टर फ्लाइटस्चा जोर आता वाढू लागेल तो वेगळाच. अजूनही कोरोनाचे सावट जगातील अनेक देशांत गंभीर स्वरूपात आहे. काही देशांमध्ये पुन्हा नवी लाट उफाळलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय प्रवासी पुन्हा राज्यात तिसर्या लाटेचे लोण घेऊन येणारच नाहीत याची खात्री कोणी देऊ शकत नाही. देशी पर्यटकांचीही वर्दळ राज्यात वाढली आहे. ना मास्क, ना सामाजिक अंतर, ना सॅनिटायझेशन अशा बेबंद प्रकारे हे पर्यटन राज्यात बोकाळलेले दिसते. विशेषतः कॅसिनोंसमोरील बेशिस्त गर्दी पाहिली, तर पोलीस यंत्रणा कारवाईत किती कुचकामी आहे हेही स्पष्ट दिसून येते. या कॅसिनोंशी कोणाकोणाचे लागेबांधे आहेत म्हणून ही गोमंतकीय जनतेच्या जिवावर बेतू शकणारी सूट त्यांना देण्यात येते आहे? राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून इंद्रदेव शुक्लांनी पदभार स्वीकारला आहे. ते पूर्वी कनिष्ठ पदावर गोव्यातील पोलीस सेवेत होते. आता सर्वोच्च पदी आलेले हे इंद्रदेव कॅसिनोंतील विनामास्क अप्सरांना आणि गंधर्वांना आवरतील अशी आशा आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांनी गोमंतकीयांनाही कोविडपासून संरक्षण देण्यास प्राधान्य दिले तर बरे होईल. महाराष्ट्रात तिसरी लाट डिसेंबरमध्ये थडकेल अशी शक्यता तेथील आरोग्यमंत्र्यांनी वर्तवलेली आहे, कारण अजूनही तेथील लसीकरण पूर्ण झालेले नाही. हीच स्थिती अन्य राज्यांत आहे. त्यामुळे गोव्याने लसीकरणात आघाडी घेतली असली तरीही संसर्गाचा धोका कायम राहतोच हे विसरले जाऊ नये. लवकरच निवडणुकांचे धामधुमीचे दिवस यायचे आहेत. त्यामुळे कोरोनाचे प्रमाण जरी कमी असले तरी चिंता कायम आहे! राज्यातील कोरोनाची स्थिती गेला महिनाभर बर्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसते आहे. ही निश्चितच समाधानकारक बाब आहे, परंतु त्यामुळे जी सार्वत्रिक गाफिलता आणि कोविडसंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबतची बेफिकिरी दिसते, ती घातक ठरू शकते. सरकारने जनतेला ह्याचे स्मरण करून देणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील कोविड रुग्णांची संख्या जेमतेम अडीचशेच्या आत आहे हे खरे आहे, परंतु तरीही दरदिवशी नवनवीन तीस – पस्तीस रुग्णांची भर पडतेच आहे. गोवा हे देशातील पहिले संपूर्ण लसीकरण झालेले राज्य असल्याची शेखी जरी राज्य सरकार मिरवीत असले, तरीही रोज सापडणारे नवनवे रुग्ण पाहता, केवळ लसीकरण हा कोरोनाला दूर ठेवण्याचा उपाय ठरू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यास तज्ज्ञांच्या समितीने जरी सरकारला हिरवा कंदील दर्शवला असला तरी सरकार तशा प्रकारच्या निर्णयाची घिसाडघाई न करता ज्या सावधगिरीने पावले टाकत आहे, ती सावधगिरी व दक्षता गरजेचीच आहे. शाळांचे वर्ग सुरू करायचे की नाहीत याचा निर्णय सर्वस्वी शाळा व्यवस्थापनांवर सोपवण्यात आला आहे. उद्या कुठे काही विपरीत घडले तर दोष सर्वस्वी शाळांच्या व्यवस्थापनांवर फोडणे यामुळे जरी सरकारला शक्य होणार असले, तरी त्यामुळे सरकारची जबाबदारी संपत नाही. शाळा सुरू करण्याबाबत जो जो निर्णय घेतला जाईल, त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल, शाळा व्यवस्थापनांना नव्हे. परराज्यांत काही शाळांमध्ये मुलांना कोरोना संसर्ग झाल्याच्या बातम्या अजूनही अधूनमधून येत असतात व पालकांच्या चिंतेत भर घालत असतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने, सावधपणे यासंदर्भातील निर्णय घेणेच हितकारक ठरेल. शाळांमध्ये वर्ग भरवण्यास काही प्रमाणात परवानगी देण्यात आलेली असली तरी जाहीर स्वरुपाचे कार्यक्रम करण्यास किंवा प्रार्थनासभा भरवण्यास मनाई करण्यात आली आहे ती सद्यपरिस्थितीत उचित आहे. कोरोना हा असा दबक्या पावलांनी घाला घालणारा आजार आहे जो कधी डंख मारील आणि त्याचा वणवा पुन्हा भडकेल सांगता येत नाही.
लवकरच वर्षअखेर येणार आहे. पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल. शिवाय जणू काही कोविड अस्तित्वातच नाही अशा थाटात नववर्षाच्या स्वागताचे जल्लोष सर्वत्र सुरू होण्याचा धोका आहे. ‘सनबर्न’ संगीत महोत्सवाला सरकार परवानगी देणार नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्टपणे सांगितले हे रास्त पाऊल आहे. पर्यटनमंत्र्यांना जरी या महोत्सवामध्ये बेधुंद नाचण्यात विलक्षण रस दिसत असला, तरी त्यातून कोरोनाचा विळखा पुन्हा राज्याला पडू शकतो. त्यामुळे ह्या महोत्सवासाठी पर्यटनमंत्र्यांनी वकिली करू नये.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच पूर्ववत होईल असे संकेत कालच केंद्र सरकारने दिलेले आहेत. याचाच अर्थ पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे गोव्यात येऊन लवकरच थडकू लागतील. शिवाय चार्टर फ्लाइटस्चा जोर आता वाढू लागेल तो वेगळाच. अजूनही कोरोनाचे सावट जगातील अनेक देशांत गंभीर स्वरूपात आहे. काही देशांमध्ये पुन्हा नवी लाट उफाळलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय प्रवासी पुन्हा राज्यात तिसर्या लाटेचे लोण घेऊन येणारच नाहीत याची खात्री कोणी देऊ शकत नाही. देशी पर्यटकांचीही वर्दळ राज्यात वाढली आहे. ना मास्क, ना सामाजिक अंतर, ना सॅनिटायझेशन अशा बेबंद प्रकारे हे पर्यटन राज्यात बोकाळलेले दिसते. विशेषतः कॅसिनोंसमोरील बेशिस्त गर्दी पाहिली, तर पोलीस यंत्रणा कारवाईत किती कुचकामी आहे हेही स्पष्ट दिसून येते. या कॅसिनोंशी कोणाकोणाचे लागेबांधे आहेत म्हणून ही गोमंतकीय जनतेच्या जिवावर बेतू शकणारी सूट त्यांना देण्यात येते आहे? राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून इंद्रदेव शुक्लांनी पदभार स्वीकारला आहे. ते पूर्वी कनिष्ठ पदावर गोव्यातील पोलीस सेवेत होते. आता सर्वोच्च पदी आलेले हे इंद्रदेव कॅसिनोंतील विनामास्क अप्सरांना आणि गंधर्वांना आवरतील अशी आशा आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांनी गोमंतकीयांनाही कोविडपासून संरक्षण देण्यास प्राधान्य दिले तर बरे होईल. महाराष्ट्रात तिसरी लाट डिसेंबरमध्ये थडकेल अशी शक्यता तेथील आरोग्यमंत्र्यांनी वर्तवलेली आहे, कारण अजूनही तेथील लसीकरण पूर्ण झालेले नाही. हीच स्थिती अन्य राज्यांत आहे. त्यामुळे गोव्याने लसीकरणात आघाडी घेतली असली तरीही संसर्गाचा धोका कायम राहतोच हे विसरले जाऊ नये. लवकरच निवडणुकांचे धामधुमीचे दिवस यायचे आहेत. त्यामुळे कोरोनाचे प्रमाण जरी कमी असले तरी चिंता कायम आहे!