भाजपाध्यक्ष नड्डा यांचे गोव्यात आगमन

0
17

>> आज वाळपई आणि डिचोली मतदारसंघांत मेळावे

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस गोव्याच्या दौर्‍यावर आले असून काल बुधवारी त्यांचे रात्री उशिरा गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. त्यांचे दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतिश धोंड यांनी स्वागत केले. यावेळी विमानतळाबाहेर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक तयारीला गती दिली आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून वारंवार गोव्याला भेट देऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. भाजपाध्यक्ष नड्डाही त्याच हेतूने बुधवारी रात्री गोव्यात दाखल झाले. बुधवारी त्यांनी पणजीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ते भाजपचा डॉक्टर सेल, तसेच इतर डॉक्टरांशीही संवाद साधला.
आज गुरुवारी ते सत्तरी आणि डिचोली या दोन तालुक्यांत आयोजित मेळाव्यांना उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. साखळी मतदारसंघातील बूथ समित्यांचाही ते यावेळी आढावा घेतील.

फडणवीसही गोव्यात
दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सोमवारी गोव्यात आले होते. फडणवीस यांनी सोमवारी मांद्रे मतदारसंघातील दोन कार्यक्रमांना
उपस्थिती लावली. बुधवारी त्यांनी केपे आणि मुरगाव येथील मेळाव्यांना उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात
घेऊन निवडणुकीसाठी त्यांना ऊर्जा देण्याची मोहीम फडणवीस यांनी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत ते विविध मतदारसंघांत जाणार असल्याचेही समजते. त्याच अनुषंगाने भाजपाध्यक्ष नड्डा गोव्यात दाखल झाले आहेत.

डिचोलीतील मेळाव्यास १५०० जणांची उपस्थिती ः पाटणेकर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज गुरूवार दि. २५ नोव्हेबेर रोजी दुपारी २ वा. डिचोली मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सुमारे दीड हजार प्रमुख कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थिती लावणार असल्याची माहिती आमदार राजेश पाटणेकर तसेच डिचोली भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर यांनी दिली.
डिचोली मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन झांट्ये सभागृहात करण्यात आल्याची माहिती विश्वास गावकर यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्याना ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सभापती राजेश पाटणेकर, शिल्पा नाईक तसेच इतर नेते उपस्थित असतील. राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.